नवी दिल्ली : ‘फोर्ब्स’ नियतकालिकाने जाहीर केलेल्या २0१७ मधील भारतातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत रिलायन्स उद्योग समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी सलग १0 व्या वर्षी सर्वोच्च स्थानी आले आहेत. त्यांची संपत्ती ३८ अब्ज डॉलर म्हणजेच अडीच लाख कोटी रुपये झाली आहे.

फोर्ब्सने जारी केलेल्या ‘इंडिया रिच लिस्ट २0१७’ या अहवालानुसार, विप्रो उद्योग समूहाचे प्रमुख अजीम प्रेमजी दुसºया स्थानी असून, त्यांची संपत्ती १९ अब्ज डॉलर झाली आहे. त्यांनी दोन स्थानांची प्रगती केली आहे. गेल्या वर्षी दुसºया स्थानी असलेले सन फार्माचे दिलीप शांघवी नवव्या स्थानी घसरले आहेत. त्यांची संपत्ती १२.१ अब्ज डॉलर झाली आहे.

मुकेश अंबानी यांची संपत्ती तब्बल ६७ टक्क्यांनी वाढली आहे. त्यांच्या संपत्तीत वर्षभरात १५.५ अब्ज डॉलरची भर पडली. ते आशियातील पहिल्या पाच श्रीमंतांच्या यादीत गेले आहेत. त्यांचे धाकटे बंधू मुकेश अंबानी फारच खाली ४५ व्या स्थानी असून त्यांची संपत्ती ३.१५ अब्ज डॉलर आहे. गेल्या वर्षी ते ३२ व्या स्थानी होते.

योगगुरू रामदेव बाबा यांच्या पतंजली आयुर्वेदचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण यांनी मोठी झेप घेतली आहे.
गेल्या वर्षी ४८ व्या स्थानी असलेले बालकृष्ण यंदा १९ व्या स्थानी आले आहेत. त्यांची संपत्ती ६.५५ अब्ज डॉलर म्हणजेच ४३ हजार कोटी रुपये झाली आहे.

भारतातील पहिल्या १00 श्रीमंतांच्या यादीत ७ महिलांचा समावेश आहे. ओ. पी. जिंदाल उद्योग समूहाच्या चेअरपर्सन सावित्री जिंदाल १६ व्या स्थानी असून त्यांची संपत्ती ७.५ अब्ज डॉलर आहे. लुपिनच्या बिगरकार्यकारी चेअरमन मंजू देशबंधू गुप्ता ३.४0 अब्ज डॉलरच्या संपत्तीसह ४0 व्या स्थानी आहेत. हॅवेल्स इंडियाच्या विनोद राय गुप्ता आणि त्यांचे पुत्र अनिल हे ४८ व्या स्थानी आहेत.

बेनेट, कोलमन अ‍ॅण्ड कंपनीच्या इंदू जैन आणि त्यांच्या दोन मुलांची संपत्ती ३ अब्ज डॉलर असून ते ५१ व्या स्थानी आहेत. टाफेच्या मल्लिका श्रीनिवासन, यूएसव्ही इंडियाच्या लीना तिवारी (७१ वे स्थान), बायोकॉनच्या संस्थापक किरण मुजुमदार-शॉ (७२ वे स्थान) यांचा या यादीत समावेश आहे. मुजुमदार-शॉ या स्वबळावर अब्जाधीश झालेल्या महिलांच्या यादीत प्रथम स्थानी आहेत.