करनीती भाग १८६
सी. ए. उमेश शर्मा
अर्जुन (काल्पनिक पात्र) : कृष्णा, जीएसटीमध्ये करदात्याला इनपुट टॅक्स क्रेडिटसंबंधी काय तरतुदी आहेत?
कृष्ण : (काल्पनिक पात्र) : अर्जुना, एक्साइज व व्हॅट कायद्यांतर्गत एक्साइज व व्हॅटच्या आयटीसी संदर्भात वेगवेगळ्या तरतुदी आहेत. जीएसटीमध्ये आयटीसी मिळण्यासाठी तरतुदी दिल्या आहेत.
अर्जुन : कृष्णा, इनपुट टॅक्स क्रेडिट म्हणजे खरेदी करणाऱ्या करपात्र व्यक्तीला वस्तू किंवा सेवावर आकारलेला सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी आणि यूटीजीएसटी होय. इनपुट टॅक्समध्ये कच्चा माल, इनपुट सेवा आणि भांडवली वस्तू यांवर भरलेला कर समाविष्ट होतो. आयटीसीमध्ये रिव्हर्स चार्जद्वारे भरलेला कर आणि आयात केलेल्या वस्तूवर भरलेला आयजीएसटीचा समावेश होतो. भांडवली वस्तूवर भरलेल्या कराचे क्रेडिट आपण एकाच टप्प्यात घेऊ शकतो.
अर्जुन : कृष्णा, इनपुट टॅक्स क्रेडिट घेण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?
कृष्ण : अर्जुना, एखाद्या नोंदणीकृत करपात्र व्यक्तीला आयटीसी घेण्यासाठी पुढील चार अटींची पूर्तता करावी लागेल.
१) त्या व्यक्तीकडे टॅक्स इन्वाइस किंवा डेबिट नोट किंवा कोणतेही
असे कर भरल्याचे दस्तऐवज
असायला हवेत.
२) त्या व्यक्तीला वस्तू किंवा सेवा मिळालेली पाहिजे.
३) पुरवठा करणाऱ्याने सरकारला त्या पुरवठ्यावरचा कर भरला पाहिजे आणि
४) त्याने कलम ३९ च्या अंतर्गत रिटर्न भरलेला पाहिजे.
अर्जुन : कृष्णा, काही वेळा वस्तू काही कारणास्तव हरवतात, नष्ट होतात, तर त्या वस्तूंशी निगडित आयटीसी घेता येतो का?
कृष्ण : अर्जुना, नाही. हरवलेल्या, चोरी झालेल्या, नष्ट झालेल्या किंवा राइट आॅफ केलेल्या वस्तूंशी संबंधित इनपुट टॅक्स क्रेडिट घेता येणार नाही. त्याचप्रमाणे, ज्या वस्तू भेटवस्तू किंवा नमुना (फ्री सँपल) म्हणून दिल्या, त्यावरचा इनपुट टॅक्स क्रेडिटसुद्धा घेता येणार नाही.
अर्जुन : जर एखाद्या व्यक्तीने आयटीसीचा लाभ घेण्यात आलेल्या भांडवली वस्तूचा पुरवठा केला, तर करावर त्याचा काय परिणाम होईल.
कृष्ण : अर्जुना, जर अशा भांडवली वस्तुंचा पुरवठा केला, ज्यावर आयटीसीचा लाभ घेतलेला आहे, तर आयटीसी एवढी रक्कम किंवा भांडवली वस्तुंच्या व्यवहार मूल्यावरील कर यामध्ये जी रक्कम जास्त असेल, ती रक्कम करदात्याला भरावी लागेल.
अर्जुन : कृष्णा, जीएसटीमध्ये कोणकोणत्या वस्तू व सेवांचा आयटीसी मिळत नाही?
कृष्ण : अर्जुना, जीएसटीमध्ये अन्न व पेय, अचल संपती, प्रवासी वाहन, आउट डोअर कॅटरिंग, सौंदर्य उपचार, आरोग्य सेवा, सौंदर्य प्रसादने आणि प्लॅस्टिक सर्जरी, क्लब, आरोग्य केंद्राची सदस्यता शुल्क, प्रवासी
वाहने, जीवन विमा, आरोग्य विमा, वैयक्तिक वापराच्या वस्तू, वर्क कॉन्ट्रेक्ट सेवा यावरचा आयटीसी मिळत नाही.
अर्जंुन : कृष्णा, जर करदात्याने ज्याच्याकडून खरेदी केले, त्याला मोबदला नाही दिला, तर काय
होईल?
कृष्ण : अर्जुना, करदात्याला १८० दिवसांत करासहीत मोबदला खरेदी करणाऱ्याला द्यावा लागेल, नाहीतर त्याचा आयटीसी रिव्हर्स होईल.
जेव्हा मोबदला दिला जाईल, तेव्हा आयटीसी मिळेल.

अर्जुना, अगोदर वस्तू विकणाऱ्या व्यापाऱ्याला सेवांचा आयटीसी मिळत नव्हता. त्याचप्रमाणे, सेवांचा पुरवठा करणाऱ्याला वस्तूचा आयटीसी मिळत नव्हता. परंतु आता जीएसटीमध्ये वस्तू व सेवांचा आयटीसी एकमेकांना मिळू शकतो. मात्र, करदात्याने आयटीसीच्या तरतुदी समजून घेऊनच कर भरावा, नाहीतर त्याला व्याज व दंडासहीत कर भरावा लागेल.