ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 20 - मार्केटमध्ये दमदार आणि स्टायलिश बाईक अशी दबदबा असणा-या रॉयल एन्फिल्डला लवकरच एक नवा प्रतिस्पर्धी मिळणार आहे. रॉयल एन्फिल्ड टक्कर देण्यासाठी होंडा मैदानात उतरत असून दमदार बाईक्सच्या पंगतीत जाऊन बसणार आहे. कंपनी एक प्रयोग म्हणून याकडे पहात असली तरी यामध्ये रॉयल एन्फिल्डला आपला प्रतिस्पर्धी मानत पुढची वाटचाल केली जाणार आहे. 
 
सीबीआरपेक्षा दोन पावलं पुढे टाकत होंडा आता अशी बाईक तयार करणार आहे जी दिसायला मोठी असेल सोबतच पॉवरफुल असेल. एशिअन होंडा मोटर्स कंपनी लिमिटेडचे प्रमुख नोरिअक यांनी दिलेल्या माहितीनुसार कंपनीने 'या प्रोजक्टवर काम करण्यासाठी एक टीम तयार केली आहे. या टीममध्ये थायलँड आणि जपानमधील काही निवडक तज्ञांचा समावेश आहे, ज्यांना भारतात पाठवून बाईकच्या डिझाईनची जबाबदारी देण्यात आली आहे'. 
 
'जर भारतात या बाईकची निर्मिती झाली, तर बाईक जपानलाही निर्यात केली जाईल', अशी माहिती नोरिअक यांनी दिली आहे. होंडाजवळ आधीपासूनच 300-500 सीसीमध्ये दोन बाईक (रिबेल 300 आणि रिबेल 500) आहेत. अमेरिकन बाजारात या बाईक मागील अनेक काळापासून वापरात आहेत. आता पॉवरफुल बाईक आणून रॉयल एन्फिल्डला टक्कर कशी देता येईल, यावर कंपनींचं लक्ष आहे.
 
2016 -17 मध्ये रॉयल एन्फिल्डच्या एकूण 5.92 लाखांहून जास्त युनिट्सची विक्री करण्यात आली असून 13,819 युनिट्स निर्यात करण्यात आली आहे. होंडा प्रतिस्पर्धी म्हणून बाजारात येत असली तरी रॉयल एन्फिल्डला टक्कर देणं त्यांच्यासाठी सोपं नसणार आहे असं जाणकारांनी सांगितंल आहे. रॉयल एन्फिल्डला बाजारात प्रचंड मागणी असून त्यांचा ग्राहक खेचणं सोपं नसणार आहे. रॉयल एन्फिल्डच्या 'हिमालयन' बाईकचे ग्राहक फक्त भारतात नसून संपुर्ण देशभरात आहेत.