GST has made it easier to do business - Jettley | जीएसटीने व्यवसाय करणे केले अधिक सोपे -जेटली

नवी दिल्ली : वस्तू व सेवाकराने (जीएसटी) व्यावसायिकांवरील कर अनुपालन बोजा कमी केला असून, बाजाराच्या विस्ताराच्या माध्यमातून व्यवसाय करणे अधिक सोपे झाले आहे, असे प्रतिपादन केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी केले आहे. जीएसटी आणि नोटाबंदी यांचा अर्थव्यवस्थेला मध्यम व दीर्घ कालावधीत फायदा होईल, असेही ते म्हणाले.
चालू वित्त वर्षाच्या दुसºया तिमाहीत वृद्धीदर वाढल्याच्या पार्श्वभूमीवर जेटली यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, जीएसटीने व्यवसाय करणे खूपच सोपे झाले आहे. प्रत्येक व्यावसायिकाची बाजारपेठ विस्तारली आहे. आता संपूर्ण देशच एक बाजारपेठ झाली आहे. त्याचा व्यावसायिकांना लाभच होत आहे.
 
पाच तिमाहींपासून सुरू असलेली वृद्धीदराची घसरण जुलै-सप्टेंबर तिमाहीत थांबून अर्थव्यवस्था ६.३ टक्क्यांनी विस्तारित झाली आहे. त्याआधीच्या तिमाहीत वृद्धीदर ५.७ टक्क्यांवर घसरून तीन वर्षांच्या नीचांकावर गेला होता. घसरण थांबल्यामुळे सरकार उत्साहित झाले आहे.
जेटली यांनी सांगितले की, गेल्या वर्षी करण्यात आलेल्या नोटाबंदीचा अर्थव्यवस्थेवरील परिणाम केवळ एक-दोन तिमाहींपुरताचा मर्यादित होता. जीएसटीचा परिणाम तर एकाच तिमाहीपुरता मर्यादित राहिला. उद्योगांनी आपले साठे रिकामे केल्यामुळे जीएसटीचा प्रतिकूल परिणाम फार काळ टिकू शकला नाही. हा आमचा निष्कर्ष आहे. जीडीपीच्या आकड्यांवरून असे दिसून येते की, सरकारने केलेल्या या संरचनात्मक सुधारणा अर्थव्यवस्थेसाठी मध्यम व दीर्घ कालावधीत लाभदायक ठरतील. नोटाबंदी आणि जीएसटी या दोन्ही सुधारणांचा चांगला लाभ अर्थव्यवस्थेला होईल.

जेटली म्हणाले की, जीएसटीने व्यावसायिकांवरील कर अनुपालनाचा बोजा मोठ्या प्रमाणात कमी केला आहे. कारण नव्या व्यवस्थेत व्यावसायिकांना वेगवेगळ्या प्रकारची विवरणपत्रे भरण्याची गरज नाही. जीएसटीचे एकच एक विवरणपत्र आता भरावे लागत आहे. जीएसटीच्या करांचे दरही व्यवहार्य केले जात आहेत. व्यावसायिकांना आता इन्स्पेक्टरांचा सामना करण्याचीही गरज राहिलेली नाही.