- विजयकुमार सैतवाल । लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : वस्तू व सेवा करामुळे (जीएसटी) सोन्यावरील कर तीन पट वाढल्याने सुवर्ण व्यवसायात असलेल्या मंदीत आणखी भर पडली आहे. पर्यायाने ग्राहकी निम्म्यावर आली आहे. त्यात खरेदीसह मजुरीवरील जीएसटीने ग्राहकांसह व्यावसायिकांमध्येही संभ्रम आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीला दोन आठवडे झाले तरी सुवर्ण व्यवसायाला झळाळी येत नसल्याचे चित्र आहे.
जीएसटीपूर्वी सोन्यावर १.२ टक्के मूल्यवर्धीत कर (व्हॅट) लागत होता. जीएसटी लागू झाल्यानंतर सोन्यावरील कर जवळपास तीनपट वाढून आता ३ टक्के जीएसटी लागत आहे. चालू भावाप्रमाणे पूर्वी एक तोळ््यामागे साधारण ३०० रुपये कर लागायचा, आता ८५० ते ९०० रुपये मोजावे लागत आहेत.
जुलै, आॅगस्ट हे महिने सुवर्ण बाजारासाठी मंदीचेच असतात. शेतकऱ्यांकडील पैसा पेरणीत अडकलेला असतो व लग्न सराईदेखील संपलेली असते. त्यामुळे साधारण ३० टक्केच ग्राहकी असते. त्यात यंदा याच काळात जीएसटी लागू झाल्याने मंदीत आणखी भर पडली. सुवर्ण बाजारातील ही स्थिती दरवर्षाच्या मंदीच्या काळाप्रमाणे आहे की जीएसटीचा परिणाम आहे, याबाबत व्यावसायिकांमध्ये संभ्रम आहे.
कारागीर बसून
जळगावातील सोने देशभरात प्रसिद्ध असून येथे कलाकुसरीचे अलंकार तयार करणाऱ्यांमध्ये
बंगाली कारागिरांची संख्या मोठी आहे. मजुरीवरील जीएसटीबाबत संभ्रम असल्याने बहुतांश कारागीर काम करीत नसल्याचे सांगण्यात आले.
नोंदणीअभावी अडले घोडे
कच्चा माल जेथून घेतला जातो, त्यातील अनेकांची जीएसटीची नोंदणी बाकी आहे. त्यामुळे सराफ व्यावसायिक नोंदणीशिवाय माल घेण्यास तयार नाही. हादेखील एक परिणाम असल्याचे सांगितले जात आहे.

सध्या सुवर्णबाजारात मंदी असून जीएसटीमुळे संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. कारागीरदेखील काम करायला तयार नाही.
- गौतमचंद लुणिया, जिल्हाध्यक्ष, सुवर्ण व्यवसाय असोसिएशन

जीएसटीनंतर बाजारपेठेत मंदीची स्थिती आहे. ग्राहकी मंदावली आहे.
- स्वरुप लुंकड, सचिव, सुवर्ण व्यवसाय असोसिएशन