मुंबई : निर्यात करणा-या संस्थांसाठी सोन्याच्या आयातीचे नियम सरकारने कडक केले आहेत. त्यानुसार, आता या संस्थांना केवळ निर्यात करण्यासाठीच सोने आयात करता येईल. देशांतर्गत बाजारात विक्री करण्यासाठी या संस्था सोने आयात करू शकणार नाहीत.
यासंबंधीचे परिपत्रक सरकारने जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, निर्यातदार संस्थांना सोन्याची आयात इनपुट म्हणून करता येईल; पण हे आयात सोने वस्तू उत्पादन करून त्यांना पूर्णपणे निर्यात करावे लागेल. नामांकित संस्थेने मंजूर केलेल्या काळापैकी उरलेल्या काळासाठी हा नियम या संस्थांना लागू राहील.
या क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले की, काही शेजारी देशांसोबत भारताचा मुक्त व्यापार करार आहे. त्याचा फायदा काही निर्यातदार संस्था घेत आहेत. भारताच्या सोने आयातीत सुमारे एक चतुर्थांश वाटा असलेल्या या संस्था शेजारील देशांतून सोने आयात करतात. मुक्त व्यापारामुळे या आयातीवर त्यांना कोणताही कर द्यावा लागत नाही. हे सोने या संस्था देशातच विकतात. त्यामुळे सरकारने त्यांच्यावर बंधने घातली आहेत. एका खाजगी बँकेच्या व्यावसायिकाने सांगितले की, शेजारील देशातील आयात केलेले सोने काही संस्था स्थानिक बाजारात स्वस्तात विकीत असल्याचे गेल्या काही महिन्यांपासून निदर्शनास येत आहे. कर द्यावा लागत नसल्यामुळे त्यांना स्वस्तात सोने विकणे परवडते. त्याचा बँकांना फटका बसत होता. सरकारने आता त्यांना स्थानिक बाजारात सोने विकण्यास बंदी घातली आहे. याचा फायदा बँकांना हाईल.
सूत्रांनी सांगितले की, भारत हा जगातील दुसºया क्रमांकाचा सोने वापरणारा देश आहे. २०१७ मध्ये प्रत्येक महिन्यात सरासरी ७५ टन सोने भारताने आयात केले आहे. सप्टेंबरमध्ये हा आकडा घसरून ४८ टनांवर आला होता.