ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 14 - भारतातील सर्वात मोठी ऑटोमोबाईल कंपनी असलेल्या टाटा मोटर्सच्या व्यावसायिक वाहन विभागाच्या प्रमुखपदी गिरीश वाघ यांची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच ते कार्यकारी समितीचे सदस्यही असतील. रवींद्र पिसारोडी यांनी टाटा मोटर्सच्या कार्यकारी संचालकपदाचा राजीनामा दिल्यानंतर आठवडयाभराने गिरीश वाघ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. 
 
टाटा मोटर्स एका महत्वाच्या परिवर्तनाच्या टप्प्यावर असताना पीसारोडी यांची एक्झिट आणि गिरीश वाघ यांची नियुक्ती झाली आहे. अधिक परिणामकारक पद्धतीने काम करण्यासाठी कंपनीमध्ये अंतर्गत पातळीवर मोठे फेरबदल करण्यात आले असून, 1400 लोकांना आपली नोकरी गमवावी लागली आहे तर, अनेकांच्या जबाबदा-या बदलण्यात आल्या आहेत. 
 
गिरीश वाघ तात्काळ नवीन जबाबदारी स्वीकारणार असून, रवींद्र पिसारोडी यांच्याकडून काही गोष्टी समजून घेणार आहेत असे टाटा मोटर्सकडून जारी करण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. 46 वर्षीय गिरीश वाघ मॅकेनिकल इंजिनीयर आहेत. 1992 साली थेट कॅम्पस इंटरव्हयूमधून त्यांची टाटा मोटर्समध्ये निवड झाली. त्यांनी कंपनीच्या टाटा इंडिका, टाटा नॅनो आणि टाटा एसीई एलसीव्ही प्रोजेक्टमध्ये महत्वाची भूमिका बजावली आहे. 
 
दरम्यान टाटा मोटर्सने भन्नाट आयडिया आणली असून सर्व पदं रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीत टीमवर्कला वाव मिळावा तसंच कर्मचा-यांना आपली गुणवत्ता दाखवण्याची संधी मिळावी यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कंपनीत सर्वजण एकाच स्तरावर येणार आहेत. कंपनीत कोणीह बॉस नसेल आणि सर्वजण कर्मचारी म्हणूनच ओळखले जातील. टाटा मोटर्सकडून जनरल मॅनेजर, सीनिअर जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर. प्रेसिडेंट आणि व्हाईस प्रेसिडेंट ही पदं बरखास्त करण्यात येणार आहेत. 
 
कंपनीतील प्रत्येक टीमच्या प्रमुखाला "हेड" असं पद देण्यात येईल. आणि त्यापुढे त्या व्यक्तीचं नाव आणि कामाचा किंवा डिपोर्टमेंटचा उल्लेख असेल. तसंच जे कर्मचारी स्वतंत्र आहेत, कोणत्याही टीमचा भाग नाहीत त्यांचं नाव आणि विभागाचं नाव असेल.