मुंबई : ई-वाणिज्य बाजाराचे क्षेत्र येत्या चार वर्षांत म्हणजे २०२१ पर्यंत ५० ते ५५ अब्ज डॉलर होण्याची शक्यता आहे. सध्या ही बाजारपेठ ६ ते ८ अब्ज डॉलरची आहे. ‘रिटेलर्स असोसिएशन आॅफ इंडिया’ने बोस्टन कन्सल्टिंग ग्रुपसोबत केलेल्या पाहणी आणि अभ्यासातून हा अंदाज व्यक्त केला आहे.
डिजिटलमधील या संधीचा अभ्यास करून असा निष्कर्ष काढला आहे की, इलेक्ट्रॉनिक व घरगुती वस्तू, फर्निचर, तयार कपडे, आरोग्याशी संबंधित वस्तू, चैनीच्या वस्तू आणि खाद्यपदार्थांच्या बाबतीत ही वाढ होऊ शकते. या अहवालात म्हटले आहे की, २०२५ पर्यंत इलेक्ट्रॉनिक्समध्ये सर्वाधिक संधी आहेत. या क्षेत्राची व्याप्ती मोठ्या प्रमाणावर वाढेल. सध्या १३ ते १५ टक्के असलेला या क्षेत्राचा हिस्सा २०२५ पर्यंत ३८ ते ४२ टक्के होईल. खाद्यपदार्थांशी संबंधित ई-वाणिज्य कारभार एक टक्क्यांच्या वृद्धीच्या तुलनेत तीन टक्क्यांपर्यंत वाढेल. तीन वर्षांत एकट्या डिजिटल खरेदीत मोठी वाढ झाली आहे. डिजिटल खरेदी २०१३ मध्ये ३ टक्के होती. ती २०१६ मध्ये २३ टक्के झाली आहे. ग्राहकांवरील डिजिटलचा प्रभाव ९ टक्क्यांवरून ३० टक्क्यांपर्यंत वाढला आहे. आॅनलाइन खरेदी वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे, खरेदीतील सुविधा आणि यात मिळणारी सूट हे आहे.