मुंबई : दसरा आणि दिवाळीच्या काळात वाहन खरेदी करण्याची धूम पाहायला मिळते. यंदा मात्र चित्र वेगळे होते. त्यामुळे कार उत्पादक कंपन्यांसाठी यंदाची दिवाळी निराशाजनक राहिली. यंदा ग्राहकांनी कार बाजाराकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले आहे.
धनत्रयोदशीपासून नेहमीप्रमाणे कारविक्रीला गती मिळेल, या अपेक्षेने कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात गाड्या डिलरांकडे पाठविल्या होत्या. तथापि, यातील बहुतांश गाड्या विकल्याच गेलेल्या नाहीत. दिल्लीतील मारुती नेक्साच्या एका डिलरने सांगितले की, व्यावसायिक अजूनही जीएसटी समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत. एकूणच रोख रकमेचाही बाजारात अभाव आहे. त्यामुळे यंदा कारविक्री वाढली नाही. गेल्या वर्षी धनत्रयोदशीला ३0 हजार मारुती कार विकल्या गेल्या होत्या. यंदाही जवळपास तेवढ्याच गाड्या विकल्या गेल्या.
दिल्लीतील ह्युंदाई मोटार इंडियाच्या एका डिलरने सांगितले की, यंदा गाड्यांची उपलब्धता चांगली होती. चांगल्या योजनाही होत्या. तरीही यंदा दिवाळीत आमची विक्री वाढली नाही. बाजारात पैसा नसल्यामुळे ग्राहक कार खरेदीचा निर्णय पुढे ढकलत आहेत. ह्युंदाईच्या मुंबईतील एका डिलरने सांगितले की, गेल्या वर्षी धनरतेरसला आम्ही २00 गाड्या विकल्या होत्या. यंदा फक्त १00 गाड्या विकल्या गेल्या.
होंडा कार्स इंडियाचे विक्री
व विपणन वरिष्ठ उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सेन यांनी सांगितले की, छोटे व्यावसायिक अडचणीत आहेत. कार खरेदी करणे त्यांच्या प्राधान्यक्रमात नाही. ह्युंदाईचे विक्री व विपणन संचालक राकेश श्रीवास्तव यांनी सांगितले की, यंदाच्या दिवाळीतील सरासरी विक्री देशातील एकूण विक्रीच्या १0 टक्के राहिली. व्यावसायिक आणि व्यापाºयांनी बाजाराकडे पाठ फिरविली नसती, तर ती वाढली असती.
>विक्री कमी होण्याची कारणे काय?
ग्राहक कार बाजारापासून दूर राहिल्याची कारणे डिलर आणि कार उत्पादक कंपन्यांच्या कार्यकारी अधिकाºयांनी
दिली आहेत. ती अशी...
वस्तू व सेवाकराबाबत अनिश्चितता आहे.
बाजारात पैसा नसल्यामुळे ग्राहक कार खरेदीचा निर्णय पुढे ढकलत आहेत.
रोख रकमेचाही
बाजारात अभाव आहे.
महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्राचे विक्री व विपणन वरिष्ठ उपाध्यक्ष विजय नक्रा यांनी सांगितले की, दोन दिवाळ्यांमधील विक्रीची तुलना करणे चूक आहे. गेल्या वर्षीची दिवाळी महिना अखेरीस आली होती. यंदाचे तसे नाही. त्यामुळे यंदाची विक्री थोडी कमी राहिली आहे.
टोयोटा किर्लोस्कर मोटर्सचे
एन. राजा यांनी सांगितले की, यंदाच्या दिवाळीत आमची विक्री १५ टक्के वाढली. गुजरातसारख्या काही पूर्वेकडील राज्यांत जीएसटीआधी कारवर अधिक कर होता. जीएसटीमुळे तो कमी झाला. त्याचा फायदा कंपनीला मिळाला.