Lokmat Money > बिझनेस न्यूज > लाईफटाईम सेवा असूनही इनकमिंगसाठी ३५ रुपयांचे रिचार्ज करण्याची सक्ती

लाईफटाईम सेवा असूनही इनकमिंगसाठी ३५ रुपयांचे रिचार्ज करण्याची सक्ती

सन २००३ मध्ये आयडिया कंपनीच्या लाईफटाईम इनकमिंग सुविधेसाठी ५०० रुपये व १ हजार रुपये भरलेल्या ग्राहकांना इनकमिंग सुविधा सुरु ठेवण्यासाठी पुन्हा दरमहा ३५ रुपये भरण्याची सक्ती केली जात आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 04:28 AM2019-01-22T04:28:46+5:302019-01-22T04:29:07+5:30

सन २००३ मध्ये आयडिया कंपनीच्या लाईफटाईम इनकमिंग सुविधेसाठी ५०० रुपये व १ हजार रुपये भरलेल्या ग्राहकांना इनकमिंग सुविधा सुरु ठेवण्यासाठी पुन्हा दरमहा ३५ रुपये भरण्याची सक्ती केली जात आहे.

Despite the Lifetime service charge, it is compulsory to recharge 35 rupees for incoming | लाईफटाईम सेवा असूनही इनकमिंगसाठी ३५ रुपयांचे रिचार्ज करण्याची सक्ती

लाईफटाईम सेवा असूनही इनकमिंगसाठी ३५ रुपयांचे रिचार्ज करण्याची सक्ती

मुंबई : सन २००३ मध्ये आयडिया कंपनीच्या लाईफटाईम इनकमिंग सुविधेसाठी ५०० रुपये व १ हजार रुपये भरलेल्या ग्राहकांना इनकमिंग सुविधा सुरू ठेवण्यासाठी पुन्हा दरमहा ३५ रुपये भरण्याची सक्ती केली जात आहे. मात्र, आयडिया कंपनीने त्याबाबत जाहीर सूचना दिली असल्याचे स्पष्टीकरण व्होेडाफोन आयडियाच्या प्रवक्त्यांनी दिले आहे.
लाईफटाईम म्हणजे आयुष्यभरासाठी असा सर्वसाधारण समज आहे. मात्र प्रत्यक्षात लाईफटाईम म्हणजे संबंधित कंपनीचा परवाना संपुष्टात येईपर्यंतचा कालावधी असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. महाराष्ट्र व गोवा सर्कलमधील परवाना २०१४-१५ मध्ये संपुष्टात आला होता. आयडिया कंपनीचे व्होडाफोन मध्ये विलीनीकरण झाल्यानंतर महाराष्ट्र व गोवा सर्कलमधील अशा सर्व ग्राहकांना आॅक्टोबर २०१८ पासून दरमहा २८ दिवसांसाठी २४ रुपये आकारण्यात येत आहेत. त्याशिवाय ६ महिन्यांच्या कालावधीसाठी १५० रुपयांची सुविधा उपलब्ध आहे. या सर्व बाबींमध्ये भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या नियमांचे पूर्णत: पालन केले जात असून कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन झाले नसल्याचा दावा व्होडाफोन आयडियाचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुदीप भल्ला यांनी केला आहे. तर, ग्राहकांमध्ये मात्र याबाबत नाराजी आहे.
यासेवेचा ग्राहकांना फटका बसला असून प्रत्यक्षात त्यांनी २००३ मध्ये दिलेल्या ५०० व १००० रुपयांच्या बदल्यात केवळ कंपनीचा परवाना असलेल्या मुदतीपर्यंत इनकमिंग सेवा पुरवण्यात आली आहे. परवान्याची मुदत संपल्यानंतर या ग्राहकांना दरमहा इनकमिंग सुविधा सुरु ठेवण्यासाठी रिचार्ज करावे लागत आहे.
याबाबत एका ग्राहकाने आयडियाच्या कॉलसेंटरशी संपर्क साधून त्यांच्यासोबत केलेल्या संभाषणाची आॅडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती. तसेच कंपनीकडून समाधानकारक माहिती मिळत नसल्याने ग्राहक व कॉल सेंटरचे प्रतिनिधी यांच्यामध्ये खडाजंगी होत असल्याचे या क्लिपमध्ये स्पष्ट झाले.
आयडिया महाराष्ट्र व गोवा सर्कलमध्ये १८० दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी टेरिफ प्लॅनवर असलेल्या ग्राहकांसाठी रिचार्ज करावा लागेल व जे ग्राहक रिचार्ज करणार नाहीत त्यांची सेवा स्थगित करण्यात येईल, अशी जाहीर सूचना वर्तमानपत्रामध्ये जाहिरातीद्वारे देण्यात आली होती. याकडे कंपनीच्या प्रवक्त्यांनी लक्ष वेधले आहे. त्याशिवाय ग्राहकांना एसएमएसद्वारे माहिती देण्यात आली होती. मात्र ग्राहकांनी त्याकडे लक्ष दिलेले नसल्याने त्यांना फसवणूक झाल्याचा गैरसमज झाल्याचे सांगण्यात आले. ग्राहकांनी गोंधळून जावू नये असे आवाहन त्यांनी केले आहे.

Web Title: Despite the Lifetime service charge, it is compulsory to recharge 35 rupees for incoming

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.