बंगळुरू : कॉग्निजंट या प्रख्यात आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. ही कंपनी लवकरच तब्बल ६ हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार आहे. कंपनीतील दोन तृतीयांश कर्मचाऱ्यांना घरी पाठवण्याचा व्यवस्थापनाचा विचार असल्याचे तेथील अधिकाऱ्यांनी सांगितले. आजच्या घडीला कंपनीत २ लाख ६५ हजार कर्मचारी काम करीत आहेत.
व्यवसायात वाढ होत नसल्याने कंपनीने कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे, असे सांगण्यात येते. कॉग्निजंट ही कंपनी ज्यांच्या कामाविषयी समाधान वाटत नाही, अशा दोन ते तीन कर्मचाऱ्यांना कामावरून काढत आली आहे, पण यंदा मात्र, खूपच मोठी कपात करण्याचा निर्णय व्यवस्थापनाने घेतला असून, त्याचा कर्मचाऱ्यांच्या कामगिरीशी काहीच संबंध नाही.
कंपनीच्या प्रवक्त्याच्या म्हणण्यानुसार, कामगिरीमध्ये कमी पडणाऱ्या वा असमाधानकारक कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दरवर्षी कमी केले जातेच. दिलेले टार्गेट जे पूर्ण करू शकत नाहीत, त्यांना नोकरीत ठेवण्यात काहीच हशील नसतो. (वृत्तसंस्था)