The Amravati anti-aircraft missile factory, invested 400 crores | अमरावतीत विमानविरोधी क्षेपणास्त्रांचा कारखाना, ४०० कोटींची गुंतवणूक
अमरावतीत विमानविरोधी क्षेपणास्त्रांचा कारखाना, ४०० कोटींची गुंतवणूक

- चिन्मय काळे
मुंबई  - अमरावतीमध्ये मोठी गुंतवणूक येऊ घातली आहे. भारत डायनॅमिक्स लिमिटेड (बीडीएल) कंपनी लष्करासाठीच्या विमानविरोधी क्षेपणास्त्रांचा कारखाना तेथे उभारणार आहे. कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक व्ही. उदय भास्कर यांनी ही माहिती दिली.
ते म्हणाले, कंपनीने तेलंगणातील इब्राहिमपट्टणम् व अमरावतीमध्ये दोन कारखाने उभारण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावतीचा प्रकल्प कंपनीच्या सध्याच्या तीन कारख़ान्यांपेक्षा मोठा असेल. या प्रकल्पासाठी ५४० एकर जागा ताब्यात आली असून, तिथे ४०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाईल.
हा प्रकल्प ‘ग्रीन फिल्ड’ श्रेणीतील असेल. विमानविरोधी क्षेपणास्त्रे तयार करण्यासाठी संरक्षण मंत्रालय विदेशातील तंत्रज्ञान येथे आणत आहे. त्यासाठी जागतिक निविदा काढल्या आहेत. विदेशी संरक्षण उत्पादन कंपनीच्या तंत्रज्ञानाच्या आधारे अमरावतीत विमानविरोधी क्षेपणास्त्रे तयार केली जाणार आहेत, असे उदय भास्कर यांनी स्पष्ट केले.
‘मेक इन इंडिया’मार्फत केंद्र सरकार संरक्षण क्षेत्रात विदेशी तसेच खासगी कंपन्यांना ‘रेड कार्पेट’ घेऊन सज्ज आहे. सरकारच्या अखत्यारीतील या कंपनीची ही गुंतवणूक खासगी कंपन्यांच्या शर्यतीत महत्त्वाची ठरत आहे.

काय आहे क्षेपणास्त्र?
आकाशातून जमिनीवर हल्ला झाल्यास वापर
आर्मीच्या ताब्यातील क्षेपणास्त्रे
सध्या नऊ प्रकारची क्षेपणास्त्रे
केवळ एक स्वदेशी, उर्वरित विदेशी
मारक क्षमता १६ ते २० किमी

डीआरडीओ नाही, थेट निर्मिती
बीडीएलची रणगाडाविरोधी तोफ सोडल्यास बाकी सर्व उत्पादने मूळ डीआरडीओची आहेत. डीआरडीओने तंत्रज्ञान विकसित करून बीडीएलने केवळ त्याचे उत्पादन केले. अमरावती प्रकल्पासाठी संरक्षण मंत्रालयाने बीडीएलची निवड केली आहे. यामुळेच हा प्रकल्प विशेष आहे.
- व्ही. उदय भास्कर


Web Title:  The Amravati anti-aircraft missile factory, invested 400 crores
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.