Akshaya Tritiya goes to gold at 33 thousand rupees! | अक्षय्य तृतीयेला सोने ३३ हजार रुपयांवर जाणार!
अक्षय्य तृतीयेला सोने ३३ हजार रुपयांवर जाणार!

- चेतन ननावरे

मुंबई : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर झळाळी आलेल्या सोन्याच्या दराने मुंबईतही प्रति तोळ्यासाठी ३२ हजार रुपयांपर्यंत मजल मारली आहे. सीरियावरील हल्ला आणि तब्बल ११ वर्षांनंतर आलेल्या सुवर्ण योगामुळे खरेदीचा उत्साह पाहता, सोन्याचा दर प्रति तोळ्यासाठी ३३ हजार रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता मुंबई ज्वेलर्स असोसिएशनने व्यक्त केली आहे.
असोसिएशनचे प्रवक्ते कुमार जैन यांनी सांगितले की, अक्षय्य तृतीयेआधीच सोन्याने एक नवा उच्चांक गाठला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, या आधी कधीच अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोन्याने प्रति तोळ्यासाठी ३० हजार रुपयांचा आकडा ओलांडला नव्हता. मात्र, यंदा प्रथमच मुंबईत सोन्याने प्रति तोळ्यासाठी ३२ हजार रुपयांवर मजल मारली आहे. चढ्या दरामुळे सोने खरेदीची मागणी घटण्याची शक्यता वाटत होती. मात्र, तब्बल ११ वर्षांनंतर आलेल्या सुवर्ण योगाचे निमित्त साधत ग्राहकांकडून दराची पर्वा न करता, खरेदीला पसंती दिली जात आहे. परिणामी, बाजारात तेजीचे वातावरण आहे. अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानली जाते. त्यात सुवर्ण योगाची भर पडल्याने सोन्याचे चढे दर असतानाही ग्राहकांकडून बुकिंग केली जात आहे. त्यामुळे शनिवारपासूनच सोने खरेदीची बुकिंग केली जात आहे. तर मंगळवारी सुवर्ण योगाच्या मुहूर्तावर आणि बुधवारी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर ग्राहकांकडून सोनेखरेदीसाठी गर्दी होण्याची शक्यताही जैन यांनी व्यक्त केली आहे.
सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांची हिरमोड होऊ नये, म्हणून सर्वत्र आॅफर्सचा भडिमार सुरू झाला आहे. एका खासगी कंपनीचे संचालक सचिन कोठारी यांनी सांगितले की, चढ्या दराचा परिणाम ग्राहकांवर
होऊ नये, म्हणून अक्षय्य तृतीयेपर्यंत सोन्याच्या सर्व प्रकारच्या खरेदीवरील बनावट खर्च वगळण्यात आला
आहे, तसेच अक्षय्य १९ एप्रिलपर्यंत सोन्याची घरपोच सेवाही ग्राहकांना मोफत उपलब्ध करून देण्यात
येणार आहे.

४५० कोटी रुपयांची उलाढाल होणार!
एरव्ही दररोज २५० कोटींची उलाढाल करणाऱ्या सराफा बाजारात अक्षय्य तृतीयेला ४५० कोटी रुपयांची उलाढाल होण्याची शक्यता सराफा बाजाराने व्यक्त केली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, २०१९ सालच्या अक्षय्य तृतीयेलाही आजच्या प्रमाणेच चढा दर मिळण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.

- ११ वर्षांनंतर ‘सर्वार्थ सिद्धियोग’! अक्षय्य तृतीया आणि ‘सर्वार्थ सिद्धियोग’ असा महासंयोग तब्बल ११ वर्षांनंतर आला आहे. मंगळवारी रात्री १२पासून बुधवारी रात्री १२पर्यंत हा मुहूर्त असल्याचे जैन यांनी सांगितले.

गेल्या पाच वर्षांतील दर...
वर्ष दर (रुपये/तोळा)
२४ एप्रिल २०१२ २८,८५०
१३ मे २०१३ २६,८२५
२ मे २०१४ २८,८१५
२४ एप्रिल २०१५ २६,६६५
९ मे २०१६ २९,८५०
२८ एप्रिल २०१७ २८,९५०


Web Title: Akshaya Tritiya goes to gold at 33 thousand rupees!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.