नवी दिल्ली - गेल्यावर्षी 8 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या नोटाबंदीच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या चलन तुटवड्यामुळे देशभरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. रोकड मिळवण्यासाठी बँकांच्या रांगात तासनतास उभे राहत असल्याने लोक हवालदिल झाले होते. दरम्यान, बँकेच्या रांगेत चार तास उभे राहिल्यानंतरही रोख रक्कम न मिळाल्याने हताश होऊन ढसाढसा रडणाऱ्या नंद लाल या वृद्धांचा  व्हिडिओ नोटाबंदीच्या काळात व्हायरल झाला होता. त्यानंतर जनमानसात तीव्र प्रतिक्रिया उमटून सरकारवर चहुबाजूंनी टीका होऊ लागली होती. दरम्यान, नोटाबंदीच्या वर्षपूर्तीवेळी हे गृहस्थ पुन्हा एकदा चर्चेत आहेत. 
माजी सैनिक असलेले 80 वर्षीय नंद लाल हे गुरुग्राममधील भीमनगर भागात एका भाड्याच्या खोलीत राहतात.  गतवर्षी गुरुग्राम येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेसमोर चार तास उभे राहिले होते. मात्र त्यांना पैसे मिळाले नव्हते. तसेच गर्दीमुळे उडालेल्या गोंधळात कुणीतरी धक्का देऊन त्यांना पाडले होते. घरभाडे आणि मोलकरणीला पगार देण्यासाठी त्यांना रोख रक्कम हवी होती. ती न मिळाल्याने त्यांची फार अडचण झाली. मात्र वर्षभरानंतर नोटाबंदीवेळी उद्धभवलेली परिस्थिती आणि झालेला त्रास याबाबत नंद लाल यांचे मत बदललेले आहे. 
इकॉनॉमिक टाइम्सने नोटाबंदी बाबत नंद लाल यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ते म्हणाले,"नोटाबंदीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये मला अडचणींचा सामना करावा लागला. रोख रक्कम मिळाली नाही. त्यामुळे घरभाडे, मोलकरणीचा पगार देता आला नाही. बँकेच्या रांगेत धक्काबुक्की झाली. मात्र नंतर अडचणींचा सामना करावा लागला नाही. परिस्थिती सुधारली. आता मी माझ्या मोलकरणीला बँकेत पाठवते आणि ती माझ्यावतीने आवश्यक तेवढे पैसे काढून मला आणून देते."
माजी सैनिक असलेल्या नंद लाल यांनी 1991 पर्यंत त्यांनी लष्करात सेवा केली होती. आता नोटाबंदीचा निर्यण योग्य होता की अयोग्य असे विचारते असता ते म्हणतात,"मी एक सैनिक आहे. मी 20 वर्षे देशाची सेवा केली आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचेही मी पालन करेन. सरकार जे निर्णय घेते ते देशाच्या विकासासाठी असतात. मी सैनिक आहे. त्यामुळे मी प्रत्येक निर्णयात सरकारसोबत आहे."
 नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर आतापर्यंत 15.28 लाख कोटी किमतीच्या चलनातून बाद झालेल्या नोटा बँकांमध्ये परत आल्याची माहिती रिझर्व्ह बँकेने दिली होती. तसेच अधिक तपासानंतर अचूक आकडा हाती येईल, असेही रिझर्व्ह बँकेने सांगितले होते. मात्र 8 नोव्हेंबर 2017 रोजी जाहीर केलेल्या नोटाबंदीमुळे काळ्या पैशाला लगाम लागेल, तसेच अन्य लाभ होतील असा दावा सरकारकडून करण्यात येत आहे.  
दरम्यान,  नोटाबंदीच्या निर्णयानंतर चलनातून बाद झालेल्या सुमारे 99 टक्के नोटा चलनात परत आल्याचे समोर आल्यापासून नोटाबंदीच्या फसलेल्या निर्णयावर चौफेर टीका होत आहे. 


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.