lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > हवाई प्रवाशांच्या विविध सेवांबाबत ९१७ तक्रारी

हवाई प्रवाशांच्या विविध सेवांबाबत ९१७ तक्रारी

एअर इंडियाच्या ६८ तक्रारी प्रलंबित; विविध सुविधांसाठी प्रवाशांवर ४ कोटी ७६ लाख खर्च

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2019 06:06 AM2019-02-23T06:06:38+5:302019-02-23T06:07:13+5:30

एअर इंडियाच्या ६८ तक्रारी प्रलंबित; विविध सुविधांसाठी प्रवाशांवर ४ कोटी ७६ लाख खर्च

 9 17 complaints about the various services of air travelers | हवाई प्रवाशांच्या विविध सेवांबाबत ९१७ तक्रारी

हवाई प्रवाशांच्या विविध सेवांबाबत ९१७ तक्रारी

खलील गिरकर 

मुंबई : देशांतर्गत हवाई प्रवास करताना प्रवासात भेडसावणाऱ्या विविध सेवांबाबत प्रवाशांनी जानेवारी महिन्यात ९१७ तक्रारी केल्या आहेत. त्यापैकी ८४९ तक्रारींचे निरसन करण्यात आले असून एअर इंडियाच्या ६८ तक्रारी अद्याप प्रलंबित आहेत. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)च्या अहवालात याबाबत माहिती देण्यात आली आहे.

देशांतर्गत प्रवाशांनी केलेल्या या तक्रारींचे प्रमाण प्रति १० हजार प्रवाशांमागे ०.७३ टक्के आहे. सर्वांत जास्त २९७ तक्रारी इंडिगोच्या सेवांबाबत करण्यात आल्या आहेत. त्याखालोखाल २५९ तक्रारी एअर इंडियाबाबत आहेत. त्यातील १९१ तक्रारींचे निरसन करण्यात आले असून, उर्वरित ६८ तक्रारी प्रलंबित आहेत. जेट एअरवेज व जेट लाइटबाबत २४३ प्रवाशांनी तक्रारी केल्या आहेत. स्पाइसजेटबाबत ६१ तक्रारी, गो एअरबाबत २८, विस्तारा व एअर एशियाबाबत प्रत्येकी १४ तर, ट्रुजेटबाबत १ तक्रार दाखल झाली होती. एअर इंडिया वगळता इतर सर्व विमान वाहतूक कंपन्यांनी त्यांच्या सेवेबाबतच्या तक्रारींचे निरसन केले आहे.
विमान रद्द होणे, विमानाला विलंब होणे तसेच अन्य कारणांमुळे विमानात प्रवेश नाकारणे अशा विविध प्रकारांचा फटका ३ लाख ५ हजार ६९९ प्रवाशांना बसला. त्यांना तिकिटाचा परतावा, दुसºया विमानाने प्रवास करण्याची मुभा देणे व इतर सुविधा पुरविण्यासाठी एकूण ४ कोटी ७६ लाख ३७ हजार रुपये खर्च करण्यात आले. विमानात प्रवेश नाकारल्यामुळे ३,१५६ प्रवाशांना पुरविण्यात आलेल्या सुविधा व भरपाईपोटी १ कोटी ६९ लाख ९५ हजार रुपये खर्च करण्यात आले. विमानाचे उड्डाण रद्द झाल्याच्या विविध घटनांमध्ये ३७ हजार ८१९ प्रवाशांना फटका बसला. त्यांना पुरविण्यात आलेल्या विविध सुविधा व भरपाईपोटी ७० लाख १८ हजार रुपये खर्च करण्यात आले. विमानाच्या उड्डाणाला विलंब झाल्याचा फटका सर्वाधिक २ लाख ६४ हजार ७२४ प्रवाशांना बसला. त्यांना पुरविण्यात आलेल्या सुविधांवर २ कोटी ३६ लाख २४ हजार रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती डीजीसीएने अहवालात दिली आहे.
दोन तासांपेक्षा जास्त विलंब झाल्याचा फटका सर्वांत जास्त इंडिगोच्या ९६,६२० प्रवाशांना बसला. त्याखालोखाल एअर इंडियाच्या ७१,२४९ प्रवाशांना, स्पाइसजेटच्या ५०,८८२, एअर एशियाच्या १८,९८७, विस्ताराच्या १८,१३५, जेटच्या ५,७२८ तर गो एअरच्या ३,०६९ प्रवाशांना विलंबाचा फटका बसला. विमानात प्रवेश नाकारल्याचा फटका जेटच्या १,६४९, एअर इंडियाच्या १,१२१, स्पाइसजेटच्या ३५८, इंडिगोच्या ४, एअर एशियाच्या ९ तर विस्ताराच्या १५ प्रवाशांना बसला.

इंडिगोच्या प्रवाशांना सर्वांत जास्त फटका
विमान रद्द झाल्याचा सर्वांत जास्त फटका इंडिगोच्या १२,८०० प्रवाशांना बसला. त्याखालोखाल जेट एअरवेजच्या ७,४१७ प्रवाशांना, एअर इंडियाच्या ६,६०५ प्रवाशांना, गो एअरच्या ७४१ प्रवाशांना व एअर एशियाच्या ६५५ प्रवाशांना विमान रद्द झाल्याचा फटका बसला आहे.

Web Title:  9 17 complaints about the various services of air travelers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.