जयपूर : राजस्थानमध्ये पुढील चार वर्षांत पेट्रोलियम आणि पेट्रो रसायन क्षेत्रांमध्ये किमान ७० हजार कोटींची गुंतवणूक केली जाईल. यापैकी ४३ हजार कोटी रुपये बाडमेर जिल्ह्यातील पचपदरा येथे तेल शुद्धीकरण कारखाना स्थापण्यासाठी आणि २७ हजार कोटी रुपये केअर्न इंडियाच्या तेल विहिरी निर्माण करण्यात गुंतविण्यात येतील. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी मंगळवारी ही माहिती दिली.
तेल शुद्धीकरण कारखाना आणि पेट्रो रसायन संकुलासाठी एचपीसीएल आणि राजस्थान सरकार यांच्यातील सामंजस्य करारावेळी ते बोलत होते. एचपीसीएलच्या तेल शुद्धीकरण कारखाना विभागाचे संचालक विनोद एस. शिनॉय आणि राजस्थान सरकारच्या पेट्रोलियम आणि खनिकर्म विभागाच्या प्रमुख सचिव अपर्णा अरोरा यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी कोटा जिल्ह्यात सिटी गॅस नेटवर्क स्थापन करण्यासाठी राजस्थान राज्य गॅस लिमिटेड आणि गेल यांच्यादरम्यान आणखी एक द्विपक्षीय व्यापार करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
प्रधान म्हणाले, सामंजस्य करारामुळे ४० हजार कोटींची बचत झाली आहे. या कारखान्यात एचपीसीएलची ७४ टक्के आणि राजस्थान सरकारची २६ टक्के भागीदारी असेल. कारखान्यातून बीएस-६ दर्जाच्या (मानक) ९ दशलक्ष मेट्रिक टन पेट्रोलियम पदार्थांचे उत्पादन घेण्यात येईल. येत्या चार वर्षांत हा कारखाना बांधून पूर्ण करण्यात येईल.
को-आॅपरेटिव्ह फेडरॅलिजमला प्रोत्साहन दिल्याबद्दल राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे शिंदे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले.
तत्पूर्वी एचपीसीएलचे चेअरमन आणि प्रबंध संचालक मुकेश कुमार सुराणा यांनी केंद्र आणि राज्य सरकारचे आभार मानले. राजस्थानचे खाण आणि पेट्रोलियम राज्यमंत्री सुरेंद्रपाल सिंग यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. या कार्यक्रमाला पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे सचिव कपिलदेव त्रिपाठी आणि राज्यस्थान सरकारचे वरिष्ठ मंत्री व अधिकारी उपस्थित होते.