खडकपूर्णा पाण्याचा वाद सामंजस्याने सोडविणार-मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2019 07:24 PM2019-02-14T19:24:49+5:302019-02-14T19:24:55+5:30

बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्यावर निर्माण झालेला प्रादेशिक वाद सामंजस्याने सोडविण्यास प्राधान्य देणार आहे.

Will resolve the dispute with Khadakapurna water supply- Chief Minister | खडकपूर्णा पाण्याचा वाद सामंजस्याने सोडविणार-मुख्यमंत्री

खडकपूर्णा पाण्याचा वाद सामंजस्याने सोडविणार-मुख्यमंत्री

Next

- नीलेश जोशी
सिंदखेड राजा: बुलडाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्यावर निर्माण झालेला प्रादेशिक वाद सामंजस्याने सोडविण्यास प्राधान्य देणार असून लवकरच यासंदर्भात पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि सिंदखेड राजाचे आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांच्यासह उभय बाजूंच्या नेत्यांची एक बैठक घेण्यात येणार असल्याचे सूतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सिंदखेड राजा येथे केले.

सिंदखेड राजा विकास आराखड्यातील १३ कोटी रुपयांच्या विकास कामांच्या भूमिपूजन प्रसंगी ते सिंदखेड राजामध्ये आले होते. यावेळी स्थानिक जिजामाता विद्यालयाच्या प्रांगणात आयोजित जाहीर सभेत १४ फेब्रुवारी रोजी दुपारी ते बोलत होते. खडकपूर्णा प्रकल्पावरून जालना जिल्ह्यातीलल परतूर, मंठा आणि जालना  या तीन तालुक्यातील ९२ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला खडकपूर्णा प्रकल्पाचे पाणी देण्यावरून उभय बाजूने वाद आहे. सिंदखेड राजा व देऊळगाव राजा तालुक्यातून या योजनेला पाणी देण्यास विरोध आहे. या प्रश्नी पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांचे प्रजासत्ताक दिनी जवळपास २२ गावात प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले होते. तर जालना तालुका भाजपने या प्रश्नी बुलडाणा जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन खडकपूर्णा प्रकल्पाच्या पाण्यावर हक्क सांगत प्रसंगी विरोध झाल्यास जशास तसे उत्तर देऊ अशी भूमिका स्वीकारली होती. सप्टेंबर २०१८ पासून हा वाद उफाळला आहे. या प्रश्नी देऊळगाव राजा तालुक्यात आंदोलनेही झाली होती. सिंदखेड राजा येथील जाहीर सभेत प्रास्ताविकास जालना ९२ गावे पाणीपुरवठा योजनेला स्थगिती देऊन लोअर दुधना प्रकल्पावरून त्यांना पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली होती. 

 त्यानुषंगाने आपल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे सूतोवाच केले. दरम्यान, पिण्याच्या पाण्याच्या मुद्द्यावर भांडण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री म्हणाले. दरम्यान, ज्या नदी खोऱ्यात जादा पाणी आहे अशा खोऱ्यातील पाणी हे तुटीच्या नदीखोऱ्यात वळविण्यात येणार असून त्यासंदर्भातील राज्याचा एकात्मिक जल आराखड्यास नुकतीच मान्यता देण्यात आली असून महाराष्ट्र हे असा आराखडा करणारे देशातील पहिले राज्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान वैनगंगा-पैनगंगा नदीजोड प्रकल्पामुळे विदर्भातील वर्धा, अकोला, वाशिम, बुलडाण्यासह सहा जिल्हे आणि मराठवाड्यातील तीन जिल्ह्यांना लाभ होणार असल्याचे खा. प्रतापराव जाधव यांनी आपल्या भाषणात सांगितले असता त्या संदर्भात बोलताना  मुख्यमंत्र्यांनी उपरोक्त बाब स्पष्ट केली.

Web Title: Will resolve the dispute with Khadakapurna water supply- Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.