Two police officers die with heart attack | दोन पोलीस अधिकाऱ्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
दोन पोलीस अधिकाऱ्यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

मेहकर : जिल्हा पोलिस दलातील दोन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकपदावर कार्यरत असलेल्या दोन अधिकाऱ्यांचा २१ एप्रिल रोजी ह्रदयविकाराच्या झटक्याने उपचारादरम्यान मेहकर येथे मृत्यू झाला.
जानेफळ पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक प्रकाश विश्वनाथ कंकाळ (५५) आणि लोणार पोलिस ठाण्याततील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक वंसतराव काळदाते (५७) अशी मृत्यू पावलेल्या पोलिस अधिकार्यांची नावे आहेत. दुर्देवी योगायोग म्हणजे दोघांवरही मेहकर येथील एका खासगी रुग्णालयात अगदी लगतच्याच कॉटवर उपचार करण्यात आले. मात्र नियतीला त्यांचा जगण्यासाठीचा संघर्ष भावला नाही. त्यातच उपचारादरम्यान या दोन सहाय्यक पोलिस उपनिरीक्षकांचा मृत्यू झाला. २१ एप्रिल रोजी पहाटेदरम्यान त्यांना ह्रदय विकाराचा झटका आला होता. त्यामुळे दोघांनाही मेहकर येथील एका रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या दोन्ही पोलिस अधिका-यांवर मेहकर आणि शेंदुर्जन येथे शासकीय इतमामात पोलिस प्रशासनाच्या वतीने अंत्यंस्कार करण्यात आले आहेत. बुलडाणा पोलिस दलातील हे दोन्ही अधिकारी अत्यंत अनुभवी होते. प्रकाश कंकाळ यांच्या पार्थिवावर शेंदुर्जन येथे त्यांच्या मुळ गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान वसंतराव काळदाते यांच्या पार्थिवावर मेहकर येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बुलडाणा पोलिस दलाच्या कुटुंबातील दोन अत्यंत अनुभवी असे जवान आम्ही दुर्देवाने गमावले आहेत. एकाच वेळी एकाच हॉस्पीटलमध्ये लगतच्याच कॉटवर त्यांच्यावर उपचार सुरू होते. दुर्देवाने त्यांचा मृत्यू झाला. संपूर्ण पोलिस दल गंभीरपणे त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी उभे आहे. दरम्यान, शासकीय मदत देण्याच्या अनुषंगाने पोलिस दलातर्फे शासकीय मदत देण्याची प्रक्रियाही शिघ्रगतीने पूर्ण करण्यात येईल.
(डॉ. दिलीप भुजबळ पाटील, पोलिस अधीक्षक, बुलडाणा)


Web Title: Two police officers die with heart attack
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.