ठळक मुद्देनळगंगा प्रकल्पाअंतर्गत रब्बी हंगामासाठी शेतकर्‍यांना मिळणार पाणी रब्बी हंगामासाठी पाणी वाटपाची नियोजन बैठक 

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरा : चालु २0१७-१८ च्या रब्बी हंगामासाठी पाणी वाटपाची नियोजन बैठक गुरूवारी नळगंगा प्रकल्प येथील विश्राम गृहावर पार पडली. बैठकीत नळगंगा प्रशासक दोन पाणी पाळ्या देण्यावर तर पाणी वापर संस्था चार पाणी पाळ्यांवर ठाम राहिल्याने सदर नियोजन बैठक चांगलीच गाजली. सरतेशेवटी तीन पाणी पाळ्यांवर सर्वांचे एकमत झाले.
प्रकल्पाव्दारे मलकापूर, नांदुरा व मोताळा तालुक्यातील शेतीकरीता कॅनालव्दारे पाणी उपलब्ध होत असते. धानोरा (वि.), उमाळी व नळगंगा अशा तीन सिंचन शाखाअंतर्गत ३२ पाणी वापर संस्थामार्फत वाटपाचे पाणी शेतीकरीता देण्यात येते. नळगंगा धरणात सध्या २८.७३ दलघमी जलसाठा असून त्यापैकी मार्गावरील ४.९५ दलघमी जलसाठा राखीव असून २३.९८ दलघमी जलसाठा वापरण्या योग्य आहे. यापैकी बाष्पीभवन ६.२७ दलघमी, पिण्याकरीता २.९२ दलघमी, कॅरीओव्हर ४.६0 दलघमी, तर इतर लॉसेस १.२0 दलघमी असा १४.९९ दलघमी पाणीसाठा  सध्या उपलब्ध आहे. त्यापैकी जलाशय उपसा (मोटारीव्दारे) 0.८४ दलघमी तर कॅनालव्दारे ८.१५ दलघमी जलसाठा शेतीसाइी वापरता येणार आहे. जलाशय उपसा (मोटारीव्दारे) २१0 हेक्टर तर कॅनालव्दारे ८१५ हेक्टर क्षेत्र ओलीत करता येणार आहे. प्रकल्पाअंतर्गत असणार्‍या नळगंगा सिंचन शाखा २४५ हे. उमाळी सिंचन शाखा ३२५ हेक्टर, तर धानोरा सिंचन शाखेला २४५ हे. क्षेत्रफळ ओलीताचे उद्दीष्ट असून दोन पाणी पाळ्या देण्यात येणार असल्याचे नळगंगा प्रकल्प प्रशासनाने सांगितले असता सर्वच ३२ पाणी वापर संस्थांनी क्षेत्रफळ कमी करून चार पाणी पाळ्या देण्याची मागणी केली. परंतु तांत्रिकदृष्ट्या हे शक्य नसल्याचे उपविभागीय अधिकारी अग्रवाल यांनी सांगितले. त्यामुळे किमान तीन पाणी पाळ्या द्याव्यात अशी मागणी पाणीवापर संस्थांनी केली. यावर दोन्ही बाजुंनी साथक-बाधक चर्चा होवून उपलब्ध पाणी साठय़ानुसार तीन पाणी पाळ्या देण्यावर सर्वांचे एकमत झाले. सदर रब्बी हंगाम पाणी नियोजन बैठक पाटबंधारे उपविभाग मलकापूरचे उपविभागीय अधिकारी जी.आर. अग्रवाल, नळगंगापूर सिंचन शाखाधिकारी व्ही.आर. राजपूत, अभियंता आर.डी. पाटील यांचे उपस्थितीत पार पडली.

पाणी वाटपाबाबत साशंकताच !
मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे नळगंगा प्रकल्पाचा कारभार सध्या प्रभारींच्या खांद्यावर असून धानोरा सिंचन शाखाधिकारी नागरे रूजू झाल्यापासून रजेवर आहेत. उपविभागीय अधिकार्‍यांचा प्रभार अग्रवाल यांचेकडे आहे. कार्यकारी अभियंताही सध्या प्रभारी असल्याने प्रकल्पाचे पाणी वाटप, नियोजनानुसार होईल की नाही यात शंकाच आहे.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.