पोलीस पाटलांचे मानधन तीन महिन्यांपासून रखडले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2019 03:49 PM2019-03-17T15:49:25+5:302019-03-17T15:49:38+5:30

खामगाव: गावगाड्याच्या शांतता व सुव्यवस्थेसाठी महत्वाची भुमिका बजावणाऱ्या पोलीस पाटलांचे मानधन गत तीन महिन्यांपासून रखडले आहे.

 Police patil honororium pending from three months | पोलीस पाटलांचे मानधन तीन महिन्यांपासून रखडले!

पोलीस पाटलांचे मानधन तीन महिन्यांपासून रखडले!

googlenewsNext

- देवेंद्र ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: गावगाड्याच्या शांतता व सुव्यवस्थेसाठी महत्वाची भुमिका बजावणाऱ्या पोलीस पाटलांचे मानधन गत तीन महिन्यांपासून रखडले आहे. अनेकदा पोलीस पाटलांचे मानधन तीन-तीन महिने होत नसल्याने त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
खामगाव तालुक्यात सुमारे १४२ गावे आहेत. ९६ ग्रामपंचायती आहेत. तालुक्यात सध्या सुमारे ८८ पोलीस पाटील कार्यरत आहेत. गाव, परिसरातील शांतता व सुव्यवस्था कायम ठेवण्यात पोलीस पाटलांची महत्वाची भुमिका आहे. गावातील वाद शक्यतो गावातच मिटविण्यात पोलीस पाटलांचे महत्वपूर्ण योगदान राहते. महसूल व पोलीस प्रशासनातील दुवा म्हणून पोलीस पाटील गावोगावी काम पाहतात. असे असताना पोलीस पाटलांचे मानधन नियमित होत नसल्याची परिस्थिती आहे. काही वेळा वर्षातून काही महिने दरमहा तर अनेकदार तीन-तीन महिन्यातून एकदा पोलीस पाटलांना मानधन मिळते. सध्या जानेवारी महिन्यापासून मानधन थकीत आहे. यामुळे पोलीस पाटलांना आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत आहे. परिणामी दरमहा नियमित मानधन मिळावे, अशी मागणी पोलीस पाटील करीत आहेत.
नवीन मानधन एप्रीलपासून!
सध्या पोलीस पाटलांना दरमहा ३ हजार रूपये मिळते. परंतु शासनाने नुकत्याच काढलेल्या आदेशानुसार मानधनात वाढ करण्यात आली आहे. परंतु ही वाढ १ एप्रील २०१९ पासून लागू होणार असल्याची माहिती पोलीस पाटील संघटनेने दिली. वाढीव मानधनानुसार पोलीस पाटलांना दरमहा ६ हजार ५०० रूपये मिळणार आहेत. यातील ५०० रूपये कल्याण निधीत जमा करावे लागणार आहेत.
आर्थिक परिस्थिती बेताची!
पुर्वी गावचे पाटील श्रीमंत होते. वर्षानुवर्षे एकाच घरात पाटीलकी असायची. मुळात घरची परिस्थिती चांगली असल्याने मानधनाचा विषय फारसा ऐरणीवर येत नव्हता. परंतु सध्या पोलीस पाटलांच्या नियुक्तीसाठी एक प्रक्रीया राबविण्यात येते. त्यानुसार पात्रता धारण करणारे अनेक जण अर्ज करतात. परिणामी सध्या अनेक गावात आर्थिक परिस्थिती चांगली नसलेले व्यक्तीही पोलीस पाटील म्हणून कारभार पाहत आहेत. त्यामुळे वेळेवर मानधन मिळण्याची अनेकांना नितांत गरज असल्याचे दिसून येते.

गत तीन महिन्यांपासून मानधन जमा झाले नाही. त्यामुळे आर्थिक नियोजन कोलमडत आहे. दरमहा नियमित मानधन मिळाल्यास आर्थिक प्रश्न सुटण्यास मदत होईल.
- विलास बनसोडे, पोलीस पाटील, राहूड तथा
तालुकाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य गाव कामगार संघटना.

Web Title:  Police patil honororium pending from three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.