खामगावात पोळा सण उत्साहात साजरा 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 08:06 PM2018-09-09T20:06:49+5:302018-09-09T20:07:28+5:30

खामगाव येथील फरशी भागात रविवारी वृषभ राजाचा सण पोळा उत्साहात साजरा करण्यात आला.

Pola festival celebrated in Khamgaon | खामगावात पोळा सण उत्साहात साजरा 

खामगावात पोळा सण उत्साहात साजरा 

googlenewsNext

खामगाव - येथील फरशी भागात रविवारी वृषभ राजाचा सण पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. अल्प पाऊस,  पीक परिस्थतीही फारशी समाधानकारक नसताना शेतक-यांनी शेतात राब-राब राबणारा तसेच आपला खराखुरा सोबती असलेल्या वृषभराजाचा पोळा सण उत्साहात साजरा केला. खामगाव शहरात दरवर्षीप्रमाणे फरशी येथे पोळा भरला.

शहरातील शेतकरी आपल्या बैलांना सजवून फरशी येथे पोळ्यात घेऊन आले. येथे शिवाजीराव देशमुख व देवेंद्र देशमुख यांच्या हस्ते सर्वप्रथम मानाची बैलाची पूजा करण्यात आली. देशमुख वाड्यामधील परंपरागत गुढी तसेच इतरही मानाच्या गुढ्या फरशी येथे आणण्यात आल्या होत्या. फरशी येथे तोरण बांधण्यात आले होते. बैलाची पुजा अर्चा करून ठोंबरा वाटून तोरण तोडून पोळा फोडण्यात आला. विविध रंगबेरंगी झुला सजवून अनेक शेतक-यांनी बैलांच्या शिंगांना आकर्षक रंग देवून अंगावर झुला टाकुन शिवाजीनगर पोलीस स्टेशनजवळ बैलांचा पोळा भरला होता. आकर्षक रंगांनी सजवून नटलेल्या वृषभराजास मोठ्या थाटामाटात शेतकºयांनी पोळ्यात आणले होते. शहरातील दाळफैल, सुटाळपुरा, गोपाळ नगर, यासह शिवाजीनगर सतीफैल भागातील शेतक-यांनी आपले बैल वाजत गाजत फरशीवरील पोळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आणले होते. 

बॉक्स........ 
पोळा कोरडाच गेला, वरुण राजाचा अभिषेक नाही
खामगाव परिसरात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा दडी मारली आहे. निदान पोळ्याच्या दिवशी वृषभराजावर वरूणराजाचा अभिषेक होईल, अशी आशा शेतक-यांना होती. मात्र ऐन पोळ्याचा दिवसही कोरडाच गेला.   

 
बैलांचे स्नान घरीच 
बैल पोळ्यात नेण्याआधी सकाळी शेतकरी बांधव  बैलांना आंघोळ घालतात अर्थात बैल धुतात. आजुबाजुला असलेल्या नदी-नाल्यात वाहत्या पाण्यात बैल धुण्याची मजा काही औरच असते. परंतु यावर्षी खामगाव  परिसरात अद्याप एकाही नदीला तसेच नाल्याला पूर गेला नाही. त्यामुळे  शेतक-यांना बकेटमध्ये पाणी घेवूनच बैलांना आंघोळ घालावी लागली.

Web Title: Pola festival celebrated in Khamgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.