शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणपडताळणीसाठी आॅनलाईन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 05:33 PM2018-06-23T17:33:16+5:302018-06-23T17:36:39+5:30

बुलडाणा : राज्य परीक्षा परिषदेमार्फत १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची गुणपडताळणी करण्याची संधी राज्य परीक्षा परिषदेने उपलब्ध करून दिली आहे.

Online application for merit scholarship examination | शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणपडताळणीसाठी आॅनलाईन अर्ज

शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणपडताळणीसाठी आॅनलाईन अर्ज

Next
ठळक मुद्देयावर्षी गुणपडताळणीसाठी आॅनलाईन अर्ज करावा लागणार आहे. अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसापर्यंत गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये कळविण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी ३० जूनची मुदत परीक्षा परिषदेकडून ठेवण्यात आली आहे.

 - ब्रम्हानंद जाधव

बुलडाणा : राज्य परीक्षा परिषदेमार्फत १८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल गुरूवारी जाहीर करण्यात आला. विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची गुणपडताळणी करण्याची संधी राज्य परीक्षा परिषदेने उपलब्ध करून दिली आहे. मात्र यावर्षी गुणपडताळणीसाठी आॅनलाईन अर्ज करावा लागणार असून अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसापर्यंत गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये कळविण्यात येणार आहे. अर्ज करण्यासाठी ३० जूनची मुदत परीक्षा परिषदेकडून ठेवण्यात आली आहे. राज्य परीक्षा परिषदेमार्फत २०१६-१७ पासून पूर्व माध्यमिक व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप बदलून इयत्ता चौथीच्या ऐवजी पाचवी व सातवीच्या ऐवजी आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येत आहे. १८ फेब्रुवारी रोजी राज्यभरात ही परीक्षा घेण्यात आली होती. राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल गुरुवारी दुपारी तीन वाजता आॅनलाईन जाहीर झाला. यामध्ये पाचवीचा निकाल २३.०९ टक्के; तर आठवीचा १२.६४ टक्के लागला आहे. दोन्ही इयत्तांचा मिळून शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल केवळ १८.५८ टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना परिषदेच्या संकेतस्थळावर हा निकाल उपलब्ध करून दिल्यानंतर या निकालाविषयी काही हरकती असल्यास निकालाच्या छायांकित प्रतीसह परिषदेकडे अर्ज करता येतो. तसेच गुणपडताळणी करण्यासाठीही अर्ज करता येतो. मात्र यावर्षी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षेची गुणपडताळणी करून घ्यायची असल्यास अर्ज करण्याची आॅनलाईन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी २१ ते ३० जून या कालावधीत विद्यार्थ्यांना संबंधित शाळांच्या लॉगीनमध्ये आॅनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. मुदतीमध्ये आॅनलाईन प्राप्त झालेल्या अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर ३० दिवसांपर्यंत कळविण्यात येणार आहे. मुदतीत आॅनलाईन आलेले गुणपडताळणी अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध केल्या जाणार आहे

 नावासह इतर दुरूस्तीसाठी आॅनलाईन प्रक्रिया

शिष्यवृत्ती परीक्षेच्या गुणपत्रिकेवर विद्यार्थ्यांचे नाव, अडनाव, वडीलांचे नाव, आईचे नाव, शहरी/ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरूस्तीसाठी आॅनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी ३० जूनपर्यंत संबंधित शाळेच्या लॉगीनमध्ये आॅनलाईन अर्ज उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे अर्ज आॅनलाईन व्यतिरिक्त अन्य कोणत्याही पद्धतीने पाठविल्यास स्वीकारले जाणार नाहीत.

प्रत्येक पेपरला ५० रुपये शुल्क

गुणांच्या पडताळणीसाठी विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरकरीता ५० रुपये शुल्क ठेवण्यात आलेला आहे. यावर्षी गुणांच्या पडताळीची प्रक्रिया आॅनालाईन राबविण्यात येत असताना पेपरची ५० रुपये शुल्काची रक्कमही आॅनलाईन पेमेंटद्वारेच भरणे आवश्यक असल्याच्या सुचना राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त सुखदेव डेरे यांनी दिल्या आहेत.

निकाल घसरला

राज्य परीक्षा परिषदेकडून घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेसाठी इयत्ता पाचवीचे ४ लाख ७५ हजार ८८५ विद्यार्थी बसले होते. त्यापैकी १ लाख ९ हजार २२५ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले. तर इयत्ता आठवीसाठी ३ लाख ५८ हजार ९०२ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी ४५ हजार ३९७ विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. दोन्ही वर्गाचे विद्यार्थी मिळून राज्यात ८ लाख ३१ हजार ७८६ विद्यार्थ्यांपैकी केवळ १ लाख ५४ हजार ६८१ विद्यार्थीच पात्र ठरले आहेत. त्यामुळे उर्वरित ८२ टक्के विद्यार्थी हे अपात्र ठरल्याने निकालाची टक्केवारी घसल्याचे दिसून येते.

Web Title: Online application for merit scholarship examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.