ज्ञानगंगा अभयारण्यावरून उड्डाणपूल उभारण्याच्या हालचाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 04:54 PM2018-07-18T16:54:45+5:302018-07-18T16:57:16+5:30

बुलडाणा : बंदिस्त स्वरुपाच्या ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या बुलडाणा-खामगाव (राष्ट्रीय महामार्ग) या मार्गावर १५ किमीचा उड्डाणपुल उभारण्यासंदर्भातील संकल्पीत मुद्द्यावर हालचाली सुरू झाल्या आहेत.

Movement for flyover from Gyanganga Wildlife Sanctuary | ज्ञानगंगा अभयारण्यावरून उड्डाणपूल उभारण्याच्या हालचाली

ज्ञानगंगा अभयारण्यावरून उड्डाणपूल उभारण्याच्या हालचाली

googlenewsNext
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेला अजिंठा ते खामगाव हा रस्ता ज्ञानगंगा अभयारण्यातून जातो. जड वाहने तथा अज्ञात प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे जवळपास सहा ते आठ बिबट ठार झाले होते. परिणामी या मार्गावरील वरवंड फाटा ते बोथा दरम्यान जड तथा प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली होती.

- नीलेश जोशी

बुलडाणा : बंदिस्त स्वरुपाच्या ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणाऱ्या बुलडाणा-खामगाव (राष्ट्रीय महामार्ग) या मार्गावर १५ किमीचा उड्डाणपुल उभारण्यासंदर्भातील संकल्पीत मुद्द्यावर हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रस्तावीत उड्डाणपुलासाठी ५५० कोटी रुपये खर्च अपेक्षीत असून मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचे एम. एस. रेड्डी यांच्या प्रमुख उस्थितीमध्ये १७ जुलै रोजी ही बैठक बुलडाण्यात झाली.
अलिकडील काळात राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळालेला अजिंठा ते खामगाव हा रस्ता ज्ञानगंगा अभयारण्यातून जातो. मात्र २२ हजार हेक्टरवर पसरलेल्या या अभयारण्यातून जाणाऱ्या रस्त्यावर २०१३ ते २०१५ दरम्यान या मार्गावर जड वाहने तथा अज्ञात प्रवाशी वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे जवळपास सहा ते आठ बिबट ठार झाले होते. यामध्ये एका गर्भवती बिबटाचाही समावेश होता. परिणामी या मार्गावरील वरवंड फाटा ते बोथा दरम्यान जड तथा प्रवाशी वाहतूक बंद करण्यात आली होती. सोबतच रात्री दम्यान, ही वाहतूक वरवंड बंगला येथून उंद्री मार्गे वळविण्यात आली होती. त्यामुळे जिल्हा मुख्यालयाचा जवळच्या मार्गाने खामगावशी असलेला संपर्क तुटला होता. सोबतच जड वाहतूकीसह आपतकालीन स्थितीत ये-जा करण्याच्या समस्या निर्माण झाल्या होत्या. या पृष्ठभूमीवर २२ मे रोजी बुलडाणा जिल्ह्यातील समस्यांसदर्भात मुख्यमंत्र्यांचे अपर सचिव प्रविण परदेशी यांनी मुंबई मंत्रालयात वरिष्ठ अधिकारी आणि बुलडाणा येथे स्थानिक अधिकाऱ्यांची व्हीसीद्वारे बैठक घेतली होती. त्यावेळी या बैठकीत सहभागी असलेले माजी आमदार विजयराज शिंदे यांनी हा ज्ञानगंगा अभयारण्यातील रस्त्याचा मुद्दा उपस्थित केला होता. अधिकारी व अपर सचिव प्रविण परदेशी यांच्यामध्ये झालेल्या चर्चेदरम्यान, या रस्त्याच्या संदर्भात एक समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यातंर्गत १७ जुलै रोजी बुलडाण्यात ही बैठक घेण्यात आली. या बैठकीस सीसीएफ एम. एस. रेड्डी, वन्यजीवचे अकोला येथील उपवनसंरक्षक मनोजुकमार खैरनार, धिरज पाटील, बुलडाण्याचे कार्यकारी अभियंता चंद्रशेखर शिखरे,राष्ट्रीय महामार्गाचे नागपूर येथील अधीकारी तथा अन्य काही अधिकारी आणि माजी आमदार विजयराज शिंदेंच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.

१५ किमीचा उड्डाणपुल
ज्ञानगंगा अभयारण्यातून जाणार्या मार्गापैकी १५ किलोमीटरचा रस्ता हा अतिसंवेदनशील तथा संवेदनशील क्षेत्रात मोडतो. त्यामुळे अभयारण्यातून जाणार्या या रस्त्यावर १५ किमीचा उड्डाणपुल उभारण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. सोबच बैठकीचे इतिवृत्त झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून राष्ट्रीय वन्यजीव मंडळास याबाबतचा प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. वर्तमान स्थितीत उड्डाणपुलासाठी सुमारे ५५० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षीत असल्याचा प्राथमिक अंदाज असल्याचे सुत्रांनी सांगितले. मात्र उड्डाणपूल उभारण्याच्या दृष्टीने अद्याप मोठा पल्ला गाठणे बाकी आहे. हा उड्डाणपूल झाल्यास वन्यजीवांच्या दृष्टीने संवेदनशील असलेल्या क्षेत्रात मानवी हस्तक्षेप होणार नाही तथा जिल्हा मुख्यालयाशी घाटाखालील खामगाव परिसरातील भागाचा जवळच्या मार्गाने संपर्क कायम राहील. वाहनांचा वाढलेला अतिरिक्त इंधन खर्च ही वाचेल, असे सुत्रांचे म्हणणे आहे.


राष्ट्रीय वन्यजीव मंडळास यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. राज्य शासनासही तो पाठविला जाईल. राष्ट्रीय वन्यजीव मंडळ त्यावर योग्य तो निर्णय घेईल.
- मनोजकुमार खैरनार, जिल्हा उप वनसंरक्षक (वन्यजीव), अकोला

Web Title: Movement for flyover from Gyanganga Wildlife Sanctuary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.