पुरूषांच्या छळाचे प्रमाणही वाढतेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2018 02:49 PM2018-09-19T14:49:46+5:302018-09-19T14:49:52+5:30

Men's persecution also increases | पुरूषांच्या छळाचे प्रमाणही वाढतेच

पुरूषांच्या छळाचे प्रमाणही वाढतेच

googlenewsNext

- अनिल गवई

खामगाव:  पत्नीकडून आणि सासरवाडीतील नातलगांकडून त्रास झालेल्या पुरुषांच्या तक्रारींमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे.  छळ झालेल्या पुरूषांची   तक्रार पोलिस घेत नाहीत. त्यामुळे देशपातळीवर पुरूषांच्या संरक्षणासाठी विविध संघटना स्थापन झाल्या आहेत.  पुरुष हक्क समितीकडे धाव घेणाºया अशा पीडित पुरुषांची संख्या वाढत  गेल्या ्रतीन वर्षांमध्ये तब्बल अडीच हजारावर पुरूषांनी विविध समित्यांकडे धाव घेतल्याची आकडेवारी समोर येत आहे. 

कौटुंबिक कलहात महिलाच नव्हे तर पुरूषांचाही छळ होत असल्याचे विविध घटनांवरून समोर येत आहे. लेकीच्या संसारात माहेरकडील मंडळीचा वाढता हस्तक्षेप, सासरच्या लोकांनी संसारामध्ये मध्यस्थी करणे, पत्नीचे कान भरुन तिला माहेरी घेऊन जाणे, घरातील लोकांनी अपमानास्पद वागणूक देणे, एकमेकांवर संशय असणे, अशा तक्रारी वाढीस लागल्या आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून पुरूषांच्या हक्कासाठी लढणाºया संघटना तयार झाल्या आहेत. देशपातळीवर या संघटनांनी आपले जाळं विणलं आहे. यामध्ये ‘सेव्ह इंडियन फॅमिली फांऊडेशन’ ही देशपातळीवर संघटना असून, पुरूष हक्क संरक्षण समिती ही राज्यतपातळीवर कार्यरत आहे. याशिवाय विदर्भ परिवार बचाव संघटन, पुरूष जागृती संघटना आणि बुलडाणा जिल्ह्यातील सामाजिक समझोता मंडळ पुरूषांच्या हक्कासाठी लढत आहेत. पुरूषांचा छळ होत असल्याच्या १४७२ तक्रारी गेल्या तीन वर्षांमध्ये सेव्ह इंडियन फॅमिली फांऊडेशन आणि पुरूष हक्क संरक्षण समिती आणि विदर्भ परिवार बचाव संघटनेकडे प्राप्त झाल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

समझोत्यासाठीही समितीचे प्रयत्न!

 तक्रारींमध्ये पत्नी सोडून इतर महिलांनी विनाकारण खोटे गुन्हे दाखल केले, मानसिक त्रास दिला, ब्लॅकमेल केले, या तक्रारी देखील समितीकडे येतात. ही सर्व प्रकरणे न्यायालयात न नेता संबंधीत तक्रारदार व त्याचे नातेवाईक यांना एकत्र बोलवण्यात येते. त्यानंतर या दोघांमध्ये समझोता करण्याचा प्रयत्न करण्यात येतो. शक्य नसल्यास प्रकरण आपसात मिटविण्याचा सल्ला दिल्या जातो. 

छळामुळे पुरूषांच्या आत्महत्यांमध्ये वाढ!

छळाने कंटाळलेल्या पुरूषांच्या आत्महत्यांमध्ये दरवर्षी वाढ होत असल्याचे नॅशनल क्राईम रेकार्ड ब्युरोच्या अहवालात नमूद करण्यात आले. दरवर्षी एक कोटी लोकसंख्येत साधारणपणे १४ हजाराच्यावर पुरूष आत्महत्या करीत असल्याचे या अहवालावरून दिसून येते. तसेच महिलांच्या तुलनेत पुरूषांच्या आत्महत्येचे प्रमाण अधिक असल्याचेही अहवालातील आकडेवारीवरून स्पष्ट होते. पुरूषांना कायदेशीर आधार मिळत नसल्याने पुरूष चुकीच्या मार्गाने जाण्याची शक्यता असल्यामुळे पुरूष हक्क समिती सारख्या संघटनांकडून आधार देण्यासाठी प्रयत्न केले जातात.


नागपूर नंतर अमरावतीत सर्वाधिक तक्रारी!

सेव्ह इंडियन फॅमिली फांऊडेशनकडून उपलब्ध आकडेवारीत सर्वाधिक तक्रारी या नागपूर येथील आहेत. त्यापाठोपाठ अमरावती शहराचा दुसरा क्रमांक लागतो. अहमद नगर येथील पुरूष हक्क समितीकडे गेल्या तीन वर्षांमध्ये १७१ तक्रारी दाखल झाल्याची  नोंद आहे. तर सेव्ह इंडियन फांऊडेशनकडे राज्यभरातून १२००च्या वर तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती आहे.


छळ झालेल्या महिलांना  कायदेशीर आधार मिळतो. मात्र, पुरूषांच्या बाबतीत तसे नाही.  पुरुषाचा छळ होत असेल तर प्रशासकीय यंत्रणादेखील त्याला योग्य मदत करीत नाही. त्यामुळे एकाकी पडलेल्या पुरूषांना सेव्ह इंडियन फॅमिली फांऊडेशनकडून मदत दिली जाते. कुटुंब संस्था टिकविण्यासाठी तसेच पिडीत पुरूषांना न्याय देण्याची संघटनेची भूमिका आहे. गेल्या काही दिवसांपासून पुरूषांच्या छळात वाढ झाली आहे.

- राजेश वखारिया, अध्यक्ष, सेव्ह इंडियन फॅमिली फांऊडेशन, मध्यभारत

Web Title: Men's persecution also increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.