मेहकर : लाखो रुपये खचरूनही सारंगपूरवासी तहानलेले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2018 11:47 PM2018-02-04T23:47:11+5:302018-02-04T23:49:54+5:30

सारंगपूर येथे लाखो रुपयांची महाजल योजना राबवूनही गावकर्‍यांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. या ठिकाणी बांधलेली पाण्याची टाकी अतिशय जीर्ण झाली असून, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचा आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. 

Mehkar: Thousands of people from Sarangpur, even without spending millions of rupees! | मेहकर : लाखो रुपये खचरूनही सारंगपूरवासी तहानलेले!

मेहकर : लाखो रुपये खचरूनही सारंगपूरवासी तहानलेले!

Next
ठळक मुद्देपाणी घ्यावे लागते विकत पाण्याची टाकी झाली जीर्ण 

लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: मेहकर तालुक्यात उन्हाळय़ामध्ये अनेक गावांमध्ये पाणी समस्या निर्माण होत असते. काही गावांमध्ये दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. ज्या गावात सतत पाणीटंचाई निर्माण होते, अशा गावातील पाणीटंचाई दूर करण्यासाठी महाजल योजना राबविण्यात आली होती; मात्र सारंगपूर येथे लाखो रुपयांची महाजल योजना राबवूनही गावकर्‍यांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. या ठिकाणी बांधलेली पाण्याची टाकी अतिशय जीर्ण झाली असून, त्यामुळे परिसरातील ग्रामस्थांचा आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. 
उन्हाळय़ाच्या दिवसामध्ये मेहकर तालुक्यात जवळपास ७0 टक्के गावांमध्ये दरवर्षी पाणीटंचाई निर्माण होत असते. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पंचायत समिती व महसूल विभागाच्या वतीने उपाययोजना करण्यात येतात. ज्या गावात दरवर्षी पाणीटंचाई असते अशा गावामध्ये मागील दोन, तीन वर्षांच्या काळात महाजल योजने अंतर्गत लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत; मात्र या योजनेचा गावकर्‍यांना  फायदा झालेला दिसत नाही. संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या संगनमताने महाजल योजना पूर्णपणे रखडली असून शासनाचे लाखो रुपये वाया गेले आहेत. असाच प्रकार पैनगंगा नदीच्या तिरावर असलेल्या सारंगपूर गावी पाहायला मिळत आहे. सारंगपूर हे गाव पैनगंगा नदीच्या अगदी काठावर आहे; मात्र या गावात उन्हाळय़ाच्या दिवसामध्ये पाणीटंचाई उद्भवते. सारंगपूर येथील पाणीटंचाई दूर व्हावी यासाठी या गावात महाजल योजना राबविण्यात आली होती. या योजनेवर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. या योजनेंतर्गत विहीर, पाण्याची टाकी, पाइपलाइन ही सर्व कामे केलेली आहेत. विहिरीला पाणीच नाही, पाण्याची टाकी बांधलेली असून, टाकी कित्येक वर्षांपासून कोरडीच आहे. या पाण्याच्या टाकीचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, टाकीला ठिकठिकाणी भेगा पडल्या आहेत. सदर टाकी अतिशय जीर्ण झाल्याने कधी कोसळेल, हे सांगता येत नाही. सदर टाकी गावामध्ये बांधलेली असल्याने गावकर्‍यांच्या जीवित्वास धोका निर्माण झाला आहे. गावातील पाणी समस्या मिटावी यासाठी गावकर्‍यांनी संबंधित अधिकार्‍याकडे निवेदने, तक्रारी व काही वेळेस उपोषणही केलेले आहे; मात्र अधिकार्‍यांवर याचा कोणताच फरक पडलेला दिसत नाही. त्यामुळे गावकर्‍यांना खासगी विहिरीवरून विकत पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवरून  चौकशी होऊन जीर्ण झालेल्या पाण्याच्या टाकीसंदर्भात उपाययोजना करावी व पाणी प्रश्न दूर करावा, अशी मागणी होत आहे.   

पाण्याची टाकी दुरुस्त करण्याची रासपची मागणी
सारंगपूर येथे कित्येक वर्षांपासून बांधण्यात आलेली पाण्याची टाकी जीर्ण झाल्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे.  या टाकीपासून गावकर्‍यांना धोका निर्माण झाला आहे. सदर टाकीची दुरुस्ती करावी अथवा  पर्यायी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रासपचे मेहकर तालुकाध्यक्ष गजानन बोरकर यांनी तहसीलदार संतोष काकडे यांच्याकडे केली आहे.

ग्रामपंचायतने ठराव देऊनही अधिकार्‍याकडून टाळाटाळ
सारंगपूर येथील जीर्ण झालेली पाण्याची टाकी पाडून पर्यायी व्यवस्था करण्यासाठी ग्रामपंचायतने ठराव घेऊन ग्रामीण पाणीपुरवठा मेहकर यांच्याकडे दिलेला आहे; मात्र अधिकार्‍याकडून कारवाई करण्यास टाळाटाळ करण्यात येत आहे.

सारंगपूर येथे महाजल योजनेतून पाण्याची टाकी बांधलेली आहे. सदर टाकी जीर्ण झाल्याने गावकर्‍यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. सदर टाकी पाडावी यासाठी संबंधित विभागाकडे ग्रामपंचायतने ठराव दिलेला आहे.
- दीपक हुंबाड, ग्रामसेवक, सारंगपूर

Web Title: Mehkar: Thousands of people from Sarangpur, even without spending millions of rupees!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.