Meetings of the gipsy community in Mehkar on Saturday | उन्नती पर्वातंर्गत शनिवारी मेहकरात फासेपारधींचा मेळावा
उन्नती पर्वातंर्गत शनिवारी मेहकरात फासेपारधींचा मेळावा


बुलडाणा: भटकंतीला पसंती देणाऱ्या व विकासाच्या मुख्य प्रवाहापासून अद्यापही दूर असलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील फासेपारधी समाजाच्या विकासासाठी पोलिस प्रशासनाने पुढाकर घेऊन सुरू केलेल्या ‘उन्नती पर्व’ उपक्रमातंर्गत फासेपारधी समाजाचा दुसरा मेळावा आता मेहकरपोलिस पोलिस स्टेशन परिसरात १६ फेब्रुवारी रोजी सकाळी आयोजित करण्यात आला आहे.
दोन फेब्रुवारी रोजी या उपक्रमास प्रारंभ झाला असून त्यातंर्गतचा हा मेळावा घाटावरील भागात घेण्यात येत असून घाटावरील ५४ गावातील ८६८ कुटुंबातील फासेफारधी समाजबांधव या मेळाव्यात सहभागी होणार आहेत. फासेपारधी समाजातील युवकांसाठी पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षण, स्वयंरोजगार प्रशिक्षण, वाहन, चालक प्रशिक्षण, मोफत घरकुूल वाटप, अतिक्रमित घरांच्या जागा नियमित करणे, जातीचे दाखले, जात वैधता प्रमाणपत्र, रेशनकार्ड यासह विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याच्या दृ्ष्टीने या प्रकल्पातंर्गत १२ प्रकारच्या सुविधा उपलब्ध करण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनातर्फे करण्यात येत असून या उपक्रमाचा दुसरा टप्पा आता सुरू होत आहे.
मेहकर पोलिस ठाण्याच्या परिसरात अमरावतीचे पोलिस उपमहानिरीक्षक श्रीकांत तरवडे, जिल्हाधिकारी डॉ. निरुपमा डांगे,  प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक भागवताचार्य गजाननदादा शास्त्री महाराज, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ,  प्रकल्पाचे समन्वयक मुक्तेश्वर कुळकर्णी, मुकूंद जोशी हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्यात घाटावरील ५४ गावात आढळणार्या फासेपारधी समाजातील जवळपास दोन हजार नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात समाविष्ठ करण्याच्या दृष्टीकोणातून एक कृती आराखडा मेळाव्याच्या माध्यमातून तयार करण्यात येणार आहे. यापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलिस अधीक्षक कृष्ण प्रकाश यांच्या कार्यकाळातही अशाच प्रकारचा पूनर्वसन प्रकल्प राबविण्यात आला होता. दरम्यान, या  मेळाव्यात तथा उपक्रमात विविध शासकीय योजना राबविणारे अधिकारी, कर्मचारी यांनीही सहकार्य करून हा उपक्रम यशस्वी करण्यास हातभार लावावा, असे आवाहन जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनी केले आहे.


Web Title: Meetings of the gipsy community in Mehkar on Saturday
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.