शेतकऱ्यांभोवती परराज्यातील भांडवलदारांचा पाश; अवैध सावकारीचा नवा प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 04:51 PM2018-06-17T16:51:33+5:302018-06-17T16:51:33+5:30

Loop of the other state capitalists around farmers | शेतकऱ्यांभोवती परराज्यातील भांडवलदारांचा पाश; अवैध सावकारीचा नवा प्रकार

शेतकऱ्यांभोवती परराज्यातील भांडवलदारांचा पाश; अवैध सावकारीचा नवा प्रकार

Next
ठळक मुद्देशेतक-यांचा आर्थिक परिस्थितीचा गैरफायदा घेण्यासाठी परराज्यातील काही भांडवलदार घाटाखालील तालुक्यांमध्ये दाखल झाले आहेत.शेतातील पीक तारण घेवून पैसे वाटण्याचा प्रकार काही ठिकाणी घडत असून शेतकऱ्यांभोवती एक नवा पाश यानिमित्त्ताने आवळल्या जातोय. हंगामात ठरलेल्या दराने पैसे परत केले नाही, तर  आलेले पीक घेवून जाणार असल्याच्या अटीवर हा व्यवहार करण्यात येत आहे.  

- अनिल गवई
 
खामगाव: आर्थिक बाबतीत खचलेल्या शेतकऱ्यांना पीक तारणावर कर्ज देण्याचा नवा फंडा परराज्यातील भांडवलदारांनी अवलंबिला आहे. परराज्यातील सावकार बियाणांसोबतच पैसे देत, शेतकऱ्यांकडून व्यवहार करीत असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. घाटाखालील विविध तालुक्यांमध्ये पर राज्यातील भांडवलदारांनी पाश आवळला आहे.
एरवी कोणतेही सोंग घेता येत असले, तरी पैशाचे सोंग घेता येत नाही. त्यामुळेच आर्थिक बाबतीत खचलेल्या  माणसाचा गैरफायदा सहज घेता येतो. सध्या सर्वात जास्त आर्थिक परिस्थिती जर कोणाची खराब असेल, तर ती शेतक-यांची.  म्हणूनच अशा अनेक शेतक-यांचा गैरफायदा घेण्यासाठी परराज्यातील काही भांडवलदार घाटाखालील तालुक्यांमध्ये दाखल झाले आहेत. शेतातील पीक तारण घेवून पैसे वाटण्याचा प्रकार काही ठिकाणी घडत असून शेतकऱ्यांभोवती एक नवा पाश यानिमित्त्ताने आवळल्या जातोय. विशेष म्हणजे यातील काही जण बियाणे मार्केटिंगच्या निमित्तानेही  शेतक-यांशी संपर्क ठेवून आहेत. त्यामुळे बोगस बियाणेही शेतकऱ्यांच्या माथी मारल्या जाण्याची शक्यता आहे.  गेली दोन-तीन वर्षे असलेली दुष्काळी परिस्थिती तसेच शेतमालाला नसलेले भाव यामुळे शेतकऱ्यांजवळ पैसा नाही. बोटावर मोजण्याइतके सधन कास्तकार सोडले तर आर्थिक तंगीने पिचलेल्या शेतक-यांची संख्याच अधिक आहे. याला सरकारी धोरणही जबाबदार आहे. शेतकऱ्यांच्या मालाचे हक्काचे पैसेही त्यांना मिळत नाहीत.
 शासकीय तूर व हरभरा खरेदीचे पैसेही शेतकऱ्यांच्या कामी पडताना दिसत नाहीत. घाटाखालील  हजारो शेतकऱ्यांनी शासकीय खरेदी तूर विक्रीसाठी आणली. यातही अनेक अडचणी आल्या. शेवटी ७० दिवस खरेदी सरू राहीली. त्यानंतर खरेदी बंद झाल्याने माल तसाच पडून राहिला. हरभऱ्याचेही तेच झाले. शेवटी क्विंटलमागे १ हजार रुपयांचे अनुदान जाहीर करण्यात आले. परंतु शेतकऱ्यांचा माल तसाच पडून राहिल्याने व बाजारात भाव नसल्याने पेरणीसाठी करण्यात आलेले हे एकमेव नियोजनही फेल गेले.  परिणामी,  सध्या अनेक शेतकऱ्यांकडे पैसाच शिल्लक नाही. जो-तो आपापल्या परीने जुळवाजुळव करण्याचा प्रयत्न करत आहे. अशातच आंध्रप्रदेश व कर्नाटक सह काही राज्यातून अवैध सावकारी करण्याच्या उद़देशाने काही भांडवलदार खामगाव तालुक्यातील निपाणा, बोरजवळा, निमकवळा, रोहणा, वर्णा, शेगाव तालुक्यातील जलंब, माटरगाव,  संग्रामपूर तालुक्यातील बावनबीर, टुनकी, सोनाळा, जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा, हनवतखेड, पळशी सुपो भेंडवळ, नांदुरा तालुक्यातील जिगाव, अलमपूर, निमगाव तसेच मलकापूर तालुक्यातील काही गावांमध्ये दाखल झाले आहेत. 

 
पीक घेवून जाणार असल्याची अट!
आर्थिक परिस्थिती खराब असलेल्या शेतक-यांना ते आपल्या पाशात अडकविण्याचा प्रयत्न करीत आहे. नगदी पैसे देताना शेतीमधील पीक तारण म्हणून मागत आहेत. हंगामात ठरलेल्या दराने पैसे परत केले नाही, तर  आलेले पीक घेवून जाणार असल्याच्या अटीवर हा व्यवहार करण्यात येत आहे.  
 
व्याज आकारणीबाबत स्पष्टता नाही!
शेतक-यांना भांडवलदारांकडून पैसे देण्यात येत असले, तरी त्यावर किती व्याज आकारण्यात येते, याबाबत स्पष्टता नाही. साधारणपणे ५ ते १० टक्के व्याज आकारण्यात येत असल्याची माहिती आहे. शेतक-यांच्या शेतातील पीकच तारण असल्याने शेवटी जो हिशेब होईल, त्याप्रमाणे येणारी रक्कम ही शेतक-यांना द्यावीच लागणार आहे. हाताशी पैसा नसल्याने अनेक शेतकरी अशा नव्या सावकारीचे शिकार होत आहेत.
 

 
 गटशेतीबाबत शेतकºयांशी संपर्क ठेवून असणा-या  कंपन्यांचे प्रतिनिधी बºयाचदा ये-जा करतात.  परंतु याव्यतिरिक्त जर कोणी शेतक-यांचे शोषण करत असेल, तर अशा व्यक्तींवर कडक कारवाई करण्यात येईल. असा प्रकार घडत असल्यास शेतकºयांनीही तक्रारींसाठी पुढे यावे.
- एम.आर. कृपलानी, उपनिबंधक, खामगाव.

 
गावात काही कंपन्यांचे लोक येत आहेत. बियाणांसोबतच पैशांबाबतही विचारणा करीत असून, काही कागदपत्र घेवून पेरणीसाठी मदत करीत आहेत. पिकयेईपर्यंत पैसे परत न केल्यास पिक द्यावे लागेल, असा करार त्यांच्याकडून केला जात आहे.
- जनार्दन कळस्कार, शेतकरी, वर्णा

 

Web Title: Loop of the other state capitalists around farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.