मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृद्ध महिलेवर बिबट्याचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 06:35 PM2018-06-08T18:35:24+5:302018-06-08T18:35:24+5:30

बुलडाणा : सहकारी महिलांसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तालुक्यातील दत्तपूर येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना आठ जून रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली.

Leopard attack an old woman who went for a morning walk | मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृद्ध महिलेवर बिबट्याचा हल्ला

मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या वृद्ध महिलेवर बिबट्याचा हल्ला

googlenewsNext
ठळक मुद्देदत्तपूर गावातील पाच ते सात महिला आठ जून रोजी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या.दहीद फाट्यानजीक ७० वर्षीय वृद्ध महिला शांताबाई श्यामराव जाधव या काहीशा मागे पडल्या होत्या.त्यावेळी अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात काहीशा धाडसी असलेल्या या वृद्ध महिलेची बिबट्याशी झटापट झाली.

बुलडाणा : सहकारी महिलांसोबत मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या तालुक्यातील दत्तपूर येथील ७० वर्षीय वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना आठ जून रोजी पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास घडली. दरम्यान, या घटनेत गंभीर जखमी झालेल्या महिलेवर बुलडाण्यातील खासगी रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. बुलडाणा शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या दत्तपूर गावातील पाच ते सात महिला आठ जून रोजी पहाटे मॉर्निंग वॉकसाठी गेल्या होत्या. बुलडाणा-अजिंठा मार्गावरून त्या जात होत्या. दरम्यान, दहीद फाट्यानजीक ७० वर्षीय वृद्ध महिला शांताबाई श्यामराव जाधव या काहीशा मागे पडल्या होत्या. त्यावेळी अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. त्यात काहीशा धाडसी असलेल्या या वृद्ध महिलेची बिबट्याशी झटापट झाली. तिच्या ओरडण्याचाही आवाज समोर गेलेल्या महिलांना आला. तेव्हा त्यांनी मागे बघितले असता बिबट्याने वृद्ध महिलेवर हल्ला केल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. या महिलांनी जोरजोराने आरडाओरड केली. त्यांच्या आवाजाने बिबट्याने नंतर तेथून पळ काढला मात्र या हल्ल्यात शांताबाई जाधव या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना लगोलग बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्यानंतर त्यांना लगोलग खासगी रुग्णालयामध्ये चांगली उपचार मिळेल, या आशेने रेफर केले आहे. घटनेची माहिती मिळताच वनपाल राजू चव्हाण, राजू शिंपे, वनरक्षक विष्णू काकड यांनी रुग्णालयात पोहोचून महिलेची विचारपूस केली. सोबतच तिच्या उपचारासाठी तातडीने पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली आहे. ग्रामस्थांमध्ये दहशत गेल्या चार महिन्यापूर्वी दत्तपूर गावानजीक पैनगंगा नदीकाठी असलेल्या शेतातील विहीरीत बिबट्याच्या पिल्लू मृतावस्थेत आढळले होते. त्यामुळे या भागात मादी बिबटाचा वावर असल्याचे स्पष्ट झाले होते. मादी बिबटाचे पिल्लू तिला मिळाल्यामुळे हे मादी बिबट परिसरात ये-जा करणार्यांवर हल्ला करू शकते, असा कयास व्यक्त केला जात होता. त्यासाठी वनविभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचेही आवाहन केले होते. मात्र आता वृद्ध महिलेवर बिबट्याने हल्ला केल्याने दत्तपूर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. मात्र हल्ला करणारे बिबट हे मादी बिबटच होते का? याबाबत पुष्टी होऊ शकलेली नाही.

Web Title: Leopard attack an old woman who went for a morning walk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.