ठळक मुद्देदिवाळीच्या पृष्ठभूमीवर गर्दी वाढली

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: एका दिवसावर दिवाळी सण आला असल्याने  जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतमाल विक्रीसाठी  शेतकर्‍यांची गर्दी वाढली आहे. नवीन सोयाबीन बाजारात आले  असून, या सोयाबीनवर दिवाळी साजरी करण्यासाठी बाजार  समिती शेतकर्‍यांनी गजबजली आहे. 
मूग, उडीद या पिकांपाठोपाठ आता सोयाबीन पीकही कृषी उत्पन्न  बजार समित्यांमध्ये विक्रीसाठी येत आहे. दिवाळीचा सण  तोंडावर आल्यामुळे सोयाबीन विक्रीसाठी बाजार समितीमध्ये  शेतकर्‍यांची एकच गर्दी होत आहे. गत चार वर्षांपासून  दुष्काळाचा सामना करणार्‍या शेतकर्‍यांना यावर्षी खरिपातील  सोयाबीन पिकाचे समाधानकारक उत्पन्न झाले आहे. 
खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच पावसाने हजेरी लावल्याने  जिल्ह्यातील बहुतांश भागात सोयाबीनचे पीक चांगले झाले.  मध्यंतरीच्या काळात पावसाने विश्रांती घेतल्याने थोड्या बहुत  प्रमाणात सोयाबीन उत्पादनला फटका बसला; मात्र सुरुवातीला  झालेल्या चांगल्या पावसामुळे यावर्षी सोयाबीन उत्पन्नात वाढ  झाली; परंतु तरीसुद्धा जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समि तीमध्ये तसेच खासगी बाजारामध्ये सोयाबीनला चांगले भाव  मिळत नाहीत. 
त्यामुळे अनेक शेतकर्‍यांनी आतापर्यंत  सोयाबीन विक्रीकरिता  काढले नव्हते; परंतु आता दिवाळी सण तोंडावर आल्याने तसेच  बी-बियाणे आणि पेरणीसाठी घेतलेले कर्ज फेडण्याकरिता  अनेकांनी आपले सोयाबीन  विक्रीसाठी काढले आहे. दिवाळी  सण थाटामाटात साजरा करण्यासाठी सोयाबीन व इतर शेतमाल  विकल्याशिवाय शेतकर्‍यांकडे दुसरा पर्याय नाही. त्यामुळे अनेक  शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची विक्री  करण्यासाठी गर्दी करत आहेत.   दिवाळी सण एका दिवसावर  आल्याने  जिल्ह्यातील सर्वच बाजार समित्या शेतकर्‍यांनी  गजबजल्या असल्याचे दिसून येत आहे.

बाजार समितीसमोर लागताहेत वाहनांच्या रांगा!
सोयाबीनला योग्य भाव नसला तरी दिवाळी सणाचा खर्चासाठी  सोयाबीनची विक्री करणे शेतकर्‍यांसाठी गरजेचे आहेत. त्यामुळे  दिवाळी सणाचा खर्च भागविण्यासाठी गत चार दिवसांपासून कृषी  उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक मोठय़ा प्रमाणात  वाढली आहे.  बाजार समितीमध्ये सकाळपासूनच विविध  सोयाबीन विक्रीसाठी आलेल्या शेतकर्‍यांची गर्दी दिसून आली  आहे. बाजार समितीसमोर शेतमाल विक्रीसाठी आलेल्या  वाहनांच्या रांगा लागत आहेत.