शेतकरी कुटूंबाची भूतदया;  माकडांच्या कळपास दररोज पाजतात पाणी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 04:29 PM2019-06-04T16:29:01+5:302019-06-04T16:34:17+5:30

सोयंदेव येथील शेतकरी कुटुंब तहानेने व्याकूळ झालेल्या ६० ते ७० माकडांना दररोज पाणी पाजण्याचे काम करीत आहे.

Farmer's family give water to monkeys everyday | शेतकरी कुटूंबाची भूतदया;  माकडांच्या कळपास दररोज पाजतात पाणी 

शेतकरी कुटूंबाची भूतदया;  माकडांच्या कळपास दररोज पाजतात पाणी 

Next
ठळक मुद्दे बाळाभाऊ खरात यांचे शेत गावाजवळच आहेतेथील पाण्याचा साठा पाहून माकडांनी बाळाभाऊ यांचे शेताकडे मोर्चा वळविला. तहानेने व्याकूळ झालेल्या माकडांना हाकलून देऊनही ती तेथून जाईनात.

- अशोक इंगळे 
लोकमत न्यूज नेटवर्क
सिंदखेडराजा : दुष्काळी परिस्थितीत पाणीटंचाईची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. पाण्यासाठी माणसांची वणवण भटकंती होत असून जनावरांचे हाल होत आहे. सोयंदेव येथील शेतकरी कुटुंब तहानेने व्याकूळ झालेल्या ६० ते ७० माकडांना दररोज पाणी पाजण्याचे काम करीत आहे. शेतकरी कुटूंबाची भूतदया माणूसकिचा परिचय देणारी आहे.
सोयंदेव येथील शेतकरी बाळाभाऊ खरात, पत्नी मंदोधरी बाळाभाऊ खरात, मुुुलगा किरण खरात, सूूून गीता किरण खरात व भाऊ रावसाहेब खरात हे गावाशेजारी असलेल्या शेतात राहतात. शेतात विहीर, हौद असल्याने झाडे हिरवीगार आहेत. उन्हाचा पारा चढत असल्याने अंगाची लाहीलाही होते. त्यामुळे थंड विसाव्यावर माणसेच काय जंगली प्राणीही येऊ लागले. जंगलातील माकडांची पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती सुरु होती. तहानेने व्याकूळ माकडांची तगमग वाढली. बाळाभाऊ खरात यांचे शेत गावाजवळच आहे. त्यांच्या शेतावर पुरेसे पाणी आहे. आपल्या घरी लागणारे धुणीभांड्यासह लागणारे पाणी व जनावरांना लागणारे पाणी वापरुन त्यांचेकडे पाणी उरते. शिवारात कोठेच पाणी नाही. तेथील पाण्याचा साठा पाहून माकडांनी बाळाभाऊ यांचे शेताकडे मोर्चा वळविला. सुरुवातीला त्यांनी माकडांना हाकलून देण्याचा प्रयत्न केला .मात्र तहानेने व्याकूळ झालेल्या माकडांना हाकलून देऊनही ती तेथून जाईनात. अत्यंत व्याकूळ चेहऱ्यांनी विनवणी करीत असल्याची जाणीव त्यांना झाली. मंदोदरी खरात यांच्यातील भूतदया जागृत झाली.
स्वत: पुढे होऊन त्यांनी माकडांना पाणी पिण्यासाठी भांडी भरुन ठेवली. सर्व माकडे भितभित लगबगीने पाणी पिऊन तृप्त होऊन निघून गेले. दुसरे दिवशीही माकडांची टोळी पाणी पिण्यासाठी तेथे पुन्हा येऊन थडकली. दुसरे दिवशीही त्या माऊलीने त्या माकडांना सह्रदयतेने पाणी पाजून तृप्त केले.
गेली दोन महिन्यांपासून मंदोदरी बाळाभाऊ खरात, सून गीता किरण खरात, किरण बाळाभाऊ खरात, रावसाहेब रामराम खरात हे संपूर्ण कुटुंबीय दररोज माकडांना पाणी पाजतात. पाण्यावाचून तडफडणाºया माकडांना पाणी पाजण्याचे पूण्यकर्म करतात. हीच ईश्वरसेवा आहे असे त्यांना वाटत असून मनाला समाधान लाभते. पाणी पाजणे हे पुण्याचे काम असल्याचे कुटूंबीय सांगतात.

Web Title: Farmer's family give water to monkeys everyday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.