बुलडाणा जिल्ह्यातील फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाड!     

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2019 05:51 PM2019-03-24T17:51:04+5:302019-03-24T18:04:03+5:30

जलस्त्रोतांनी तळ गाठला असून अनेक ठिकाणच्या विहिरी व बोअरवेल आटले आहेत. त्यामुळे फळबागा पाण्याअभावी सुकत आहेत.

Crops in buldhana hit by heat & water shortage | बुलडाणा जिल्ह्यातील फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाड!     

बुलडाणा जिल्ह्यातील फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाड!     

Next
ठळक मुद्देजलस्त्रोतांनी तळ गाठला असून अनेक ठिकाणच्या विहिरी व बोअरवेल आटले आहेत. त्यामुळे फळबागा पाण्याअभावी सुकत आहेत. फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाड कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना फळबागा वाचविण्यासाठी आटापीटा करावा लागत आहे.

बुलडाणा - जलस्त्रोतांनी तळ गाठला असून अनेक ठिकाणच्या विहिरी व बोअरवेल आटले आहेत. त्यामुळे फळबागा पाण्याअभावी सुकत आहेत. परिणामस्वरूप अनेक शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यापासून फळबागा नष्ट करण्याचा सपाटा सुरू केला आहे. जिल्ह्यातील फळबागांवर दुष्काळाची कुऱ्हाड कोसळल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. 

जिल्ह्यात पपई, आंबा, चिकू, पेरू, डाळिंब, संत्रा, मोसंबी, सीताफळ, द्राक्ष, केळी यासह वेगवेगळ्या फळबागांची लागवड करण्यात येते. परंतू सध्या या फळबागांना दुष्काळाचा फटका बसत आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीपेक्षा कमी पाऊस पडला. खरीप हंगामा पाठोपाठ रब्बी हंगामही वाया गेला. अल्प पावसामुळे फळबागांवरही पाणीटंचाईचे संकट आले आहे. दुष्काळाची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच आहे. पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना फळबागा वाचविण्यासाठी आटापीटा करावा लागत आहे. बोअरवेल, विहिरी कोरड्या पडल्यामुळे शेतकरी टँकरने पाणी पुरवठा करून फळबागा जगवत आहेत. त्यामुळे हिरव्यागार दिसणाऱ्या बागा आता पाण्याअभावी जळत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी तर या फळबागाच कुऱ्हाडीने नष्ट करण्याला सुरुवात केली आहे. शेतकरी हवालदिल झाले आहेत. संकटकाळातही काही शेतकरी विकतचे पाणी घेऊन फळबागा जगविण्यासाठी धडपड करीत आहेत. मेहकर, लोणार व सिंदखेड राजा तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी फळबागांमधून लागलेला खर्चही निघाला नसल्याने संपुर्ण बागच नष्ट केल्याचे दिसून येते. 

उन्हामुळे पपईवर डाग

वाढत्या उन्हामुळे पपईवर डाग पडत असून, त्याची चवही बदलत आहे. परिणामी ग्राहक अशी पपई खरेदी करत नाहीत. या दुष्काळाचा मोठा फटका सध्या पपई या फळबागेला बसत असल्याची माहिती ऊमरा देशमुख येथील शेतकरी प्रशांत देशमुख यांनी दिली. पपईची अनेक झाडे उन्हामुळे वाळली असून ते कुऱ्हाडीने तोडण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय उरला नाही. 

डाळींबाची साडेपाचशे झाडे नष्ट!

सिंदखेडराजा - दुष्काळात डाळींब बाग जगविणे अवघड झाल्याने गोरेगाव येथील शेतकरी अविनाश पंचाळ यांनी एक हेक्टर शेतामध्ये डाळींबाच्या ५५० झाडावर  कुऱ्हाड चालवून संपूर्ण बागच नष्ट केली. अविनाश पंचाळ यांनी अल्प भूधारक शेतकरी असून त्यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत डाळींब बागायतीचा निर्णय घेतला. डाळींब पिकवून लाखोचे उत्पन्न घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या शेतकऱ्यांच्या स्वप्नावरच दुष्काळाच्या झळा बसल्या. डाळींब बागेसाठी त्यांची ठिबक सिंचनाकरीता सुमारे १ लाख ५० हजार रुपये खर्च केले. विहिरीचे खोलीकरणही केले. नंतर हिमायतबाग औरंगाबाद येथील शासकीय रोपवाटिकेतील भगवा जातीची डाळींब रोपांची लागवड केली. झाडे वाढविली, फुलविली. पाणी कमी पडू नये, म्हणून बोअरवेल घेतली. परंतू सततच्या दुष्काळामुळे पाण्याअभावी फळबागांवर संकट आले. कांही दिवसापूर्वी हिरव्यागार दिसणाऱ्या फळबागा पाण्याअभावी सूकू लागलेल्या पाहून शेतकऱ्यांचे चेहरेही सूकू लागले आहेत. अत्यल्प पावसामुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत मोठी घट झाल्याने विहिरी कोरड्या पडत आहेत. बोअरवेलला पाणी लागत नाही. बागा जगविण्यासाठी केलेला खर्च ही निघणे अशक्य झाल्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. 


 

Web Title: Crops in buldhana hit by heat & water shortage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.