चिखली : उडीद खरेदीतील घोटाळा उघडकीस येणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 01:22 AM2018-01-17T01:22:42+5:302018-01-17T01:23:33+5:30

चिखली : हतबल उडीद उत्पादक शेतकर्‍यांची अक्षरश: लूट केल्यानंतर ‘नाफेड’च्या अधिकार्‍यांना हाताशी धरत चिखलीतील काही व्यापार्‍यांनी बोगस शेतकरी दर्शवून केलेल्या उडीद खरेदीतील कोट्यवधींचा घोटाळा लवकरच उघड होण्याची शक्यता आहे. याकामी सहकार विभागाच्या ७ सदस्यीय समितीकडून कसून चौकशी सुरू असून, नाफेडमार्फत खरेदीच्या चौकशी दरम्यान चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीसह येथील खासगी बाजार समितीतील व्यापारी व खरेदीदारांना नोटीस बजावल्या.

Chikhli: The scam buying scam will be exposed? | चिखली : उडीद खरेदीतील घोटाळा उघडकीस येणार?

चिखली : उडीद खरेदीतील घोटाळा उघडकीस येणार?

Next
ठळक मुद्देसहकार विभागाच्या समितीकडून कसून चौकशी काळा बाजार करणार्‍यांचे धाबे दणाणले!

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : हतबल उडीद उत्पादक शेतकर्‍यांची अक्षरश: लूट केल्यानंतर ‘नाफेड’च्या अधिकार्‍यांना हाताशी धरत चिखलीतील काही व्यापार्‍यांनी बोगस शेतकरी दर्शवून केलेल्या उडीद खरेदीतील कोट्यवधींचा घोटाळा लवकरच उघड होण्याची शक्यता आहे. याकामी सहकार विभागाच्या ७ सदस्यीय समितीकडून कसून चौकशी सुरू असून, नाफेडमार्फत खरेदीच्या चौकशी दरम्यान चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीसह येथील खासगी बाजार समितीतील व्यापारी व खरेदीदारांना नोटीस बजावल्या.
शेतकर्‍यांच्या मालाच्या भावात दिलासा मिळावा, या हेतूने नाफेडची खरेदी सुरू आहे. प्रत्यक्षात याचा शेतकर्‍यांऐवजी व्यापार्‍यांकडूनच याचा अधिक लाभ घेतला जात असल्याने चिखलीत कोट्यवधीचा घोटाळा झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले. आधारभूत किमतीत नाफेडला आपला माल न देता तो कमी किमतीत व्यापार्‍यांच्या दारात ओतणार्‍या शेतकर्‍यांनाच हाताशी धरून त्यांच्याच ७/१२ उतार्‍यावर उडीद टाकून तो नाफेडला देत अनेक व्यापार्‍यांनी आपले उखळ पांढरे करून घेतले आहे. 
तालुक्यातील उडिदाची पेरणी क्षेत्न केवळ ५ हजार ८२६ हेक्टर होते. त्यानुसार ४ हजार शेतकर्‍यांकडून सरासरी ५५ हजार क्विंटल उडिदाचे उत्पन्न ग्राहय़ आहे. शिवाय ४ हजार शेतकर्‍यांपैकी अनेकांनी आपला माल खासगी व्यापार्‍यांना विकलेला आहे. तर काहींनी बीजोत्पादक कंपन्यांना आपला माल दिलेला असताना तालुक्यात प्रत्यक्ष उत्पादीत उडीद आणि खरेदी झालेल्या आकडेवारीत मोठी विसंगती आहे. ज्या ७/१२ वर महाबीजला सोयाबीन दिले आहे त्याच गटाच्या ७/१२ वर नाफेडला उडीद दिलेला आहे. उडिदाला खुल्या बाजारात १८00 ते ३000 रुपयांपर्यंत भाव होता. 
त्यानुसार अनेक गरजू शेतकर्‍यांनी आपला माल या भावात व्यापार्‍यांना विकल्यानंतर व्यापार्‍यांनी हाच माल शासकीय खरेदीचा भाव ५४५0 रुपयांनुसार बोगस ७/१२ लावून नाफेड खरेदी केंद्रावर विकला. शेतकर्‍यांचा यार्डावर आणलेला उडीद खराब असल्याचे कारण समोर करून कमी भावात विकत घेऊन नंतर तोच माल काही शेतकरी हाताशी धरून त्यांचे ७/११, पेरेपत्नक, खाते क्रमांकासाठी पासबुक, आधार कार्ड घेऊन त्यांची नाफेडकडे नाव नोंदणी केल्या गेली आहे. यामध्ये लो ग्रेडचा उडीददेखील नाफेडच्या मस्तकी मारण्यात आलेला आहे. परिणामी, यामध्ये नाफेड केंद्रातील अधिकारी कर्मचार्‍यांसह मोठय़ा प्रमाणावर व्यापारी व ज्या शेतकर्‍यांच्या ७/१२ व तत्सम उतार्‍यांचा वापर झालेला आहे ते शेतकरीसुद्धा अडकण्याची दाट शक्यता आहे. 

इतर बीजोत्पादक कंपन्यांकडूनही माहिती आवश्यक
येथील नाफेड खरेदी केंद्रावर उडीद खरेदीत झालेल्या घोटाळ्याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी ९ जानेवारी रोजी जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली होती. त्या तक्रारीची गंभीरतेने दखल घेत जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी त्याच दिवशी दुपारी ३ वाजता चिखली गाठून जिनिंगकडील उडीद खरेदीचे सर्व रेकॉर्ड सील करून, संपूर्ण खरेदीचे ऑडीट करण्याचे आदेश देण्यासह महाबीजचे रेकॉर्डही मागतले होते. त्यानुसार महाबीजकडून यादीदेखील सादर करण्यात आली आहे; मात्र महाबीजप्रमाणेच इतर खासगी बीजोत्पादक कंपन्यांकडूनही यादी मागविल्यास अधिक पारदर्शकता येऊ शकते. त्यानुसार तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर असलेल्या इतर खासगी बीजोत्पादक कंपन्यांकडूनही समितीने माहिती घेणे गरजेचे आहे.

प्रतीक्षा यादीतील शेतकर्‍यांना मुदतवाढ
तालुक्यातील उडिदाच्या पेरणी क्षेत्रानुसार ४ हजार उडीद उत्पादक शेतकरी संख्या ग्राहय़ धरली जात असताना नाफेडची खरेदी बंद झाल्यानंतरही तितकेच ४ हजार शेतकरी नावे प्रतीक्षा यादीत आहेत, तसेच तालुक्यातील १७६ शेतकर्‍यांनी बुलडाणा केंद्रावर उडीद दिलेला असल्याने येथेही प्रत्यक्ष शेतकरी  संख्या आणि उत्पादीत उडिदात विसंगती आढळून आली आहे. असे असताना खर्‍या शेतकर्‍यांवर अन्याय होऊ नये, यासाठी उडीद खरेदीस १६ व १७ जानेवारीपर्यंत मुदतवाढ दिल्या गेली आहे.

बुलडाणा नाफेडचे चिखली कनेक्शन
चिखली तालुक्यातील शिरपूर व किन्होळा तसेच चिखली केंद्राशी निगडित रायपूर, पिंपळगाव सराई, पळसखेड भट आदी गावातील सुमारे १७६ शेतकर्‍यांनी चिखलीत बस्तान न बसल्याने शक्कल लढवित बुलडाणा नाफेड केंद्रावर सुमारे अडीच हजार क्विंटल उडीद विकला आहे. त्यामुळे चिखली खरेदी केंद्रातील घोटाळय़ाचे कनेक्शन बुलडाणापर्यंत पोहोचले असावेत, अशी दाट शंका उपस्थित होत असल्याने चिखलीप्रमाणेच बुलडाण्यातही चौकशी होणे क्रमप्राप्त ठरते.

बाजार समित्यांना नोटीस
या घोटाळय़ाची सखोल चौकशी होण्यासाठी जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांच्या प्रमुख नेतृत्वात सहायक निबंधक गीतेशचंद्र साबळे, ए.बी.सांगळे, सहकार अधिकारी शशी नरवाडे, रवींद्र सावंत, लेखा परीक्षक नांदरे, शिवलकर आदी सदस्यांचा समावेश असलेल्या चौकशी समितीने १५ जानेवारी रोजी चिखली कृषी उत्पन्न बाजार समितीसह महाराजा अग्रसेन खासगी बाजार समिती व त्यातील व्यापारी, खरेदीदारांना सन २0१७-१८ च्या हंगामात सप्टेंबर २0१७ ते डिसेंबर २0१७ दरम्यान यार्डावर खरेदी केलेल्या व बाहेर पाठविलेल्या शेतमालाची संक्षिप्त माहिती मागितली आहे.

Web Title: Chikhli: The scam buying scam will be exposed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.