स्वस्त धान्याची काळ्या बाजारात विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2017 12:25 AM2017-08-24T00:25:51+5:302017-08-24T00:26:20+5:30

बुलडाणा/खामगाव : जिल्ह्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार फोफावला असून, ऐन सणासुदीच्या दिवसात स्वस्त धान्य दुकानांऐवजी धान्याची काळ्या बाजारात विक्री होत आहे. मेहकर तालुक्यातील ६५ दुकानांमध्ये स्वस्त धान्य पोहोचले नसून, शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी खामगाव येथील पोलीस कारवाईत जप्त केलेला २0 टन तांदूळ ताब्यात घेण्यासाठी पत्र पाठविले आहे.गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

Cheap grains sell black market! | स्वस्त धान्याची काळ्या बाजारात विक्री!

स्वस्त धान्याची काळ्या बाजारात विक्री!

Next
ठळक मुद्देतांदळाचा काळाबाजार जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांचे तहसीलदारांना पत्र 

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/खामगाव : जिल्ह्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार फोफावला असून, ऐन सणासुदीच्या दिवसात स्वस्त धान्य दुकानांऐवजी धान्याची काळ्या बाजारात विक्री होत आहे. मेहकर तालुक्यातील ६५ दुकानांमध्ये स्वस्त धान्य पोहोचले नसून, शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी खामगाव येथील पोलीस कारवाईत जप्त केलेला २0 टन तांदूळ ताब्यात घेण्यासाठी पत्र पाठविले आहे.गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सध्या सुणासुदीचे दिवस असून, आगामी काळात गणेश उत्सव, दुर्गा देवी उत्सव, दसरा व दिवाळी आहे. या दिवसांमध्ये शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचा पुरवठा करण्याऐवजी काळ्या बाजारात धान्याची विक्री होत आहे. गत एक महिन्यात जिल्ह्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य मिळाले नाही. दुकानदारांसह शिधापत्रिकाधारकांनाही धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. दरम्यान, काळ्या बाजारात जाणारा २0 टन रेशनचा पोलिसांनी पकडलेला तांदूळ तत्काळ ताब्यात घ्या, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी खामगाव तहसीलदारांना दिल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. या संपूर्ण प्रकरणात दस्तुरखुद्द जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घातल्याने, रेशनमाफीयांचे धाबे दणाणले आहे.
जिल्ह्यात स्वस्त धान्य वितरणात अनियमिततेच्या गेल्या तीन महिन्यांमध्ये सात घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये खामगाव येथे घडलेली घटना ताजी असून, या संपूर्ण प्रकाराकडे जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा प्रथमदर्शनी अंदाज जिल्हाधिकार्‍यांनी काढला आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना धारेवर धरण्यात आल्यानंतर, मंगळवारी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी हालचालीस वेग देत, खामगाव येथे पकडण्यात आलेला तांदूळ ताब्यात घेण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत खामगाव येथील तहसीलदारांना पत्रव्यवहारही करण्यात आला. दरम्यान, मंगळवारी दुपारी या प्रकरणात वेगाने घडामोडी घडल्याची खात्रीलायक माहिती आहे. यासंदर्भात खामगाव तहसीलदार सुनील पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, खामगाव पोलिसांचे पत्र मिळाल्यानंतर त्यांना प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती दिली; मात्र जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांचे पत्र प्राप्त झाले नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

काळ्या बाजारात तांदूळ विकण्याच्या घटनांमध्ये वाढ!
२२ जून रोजी अमडापूरकडे जाणारा एमएच-१९-२0९७ या दहाचाकी ट्रकमधून  ३५0 कट्टे तांदूळ जप्त करण्यात आला होता. २२ जुलै रोजी बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथे १0२ कट्टे तांदूळ पकडण्यात आला होता. येथील स्वस्त धान्य दुकानदाराचे रेकॉर्डही जप्त करण्यात आले होते, तर ५ जुलै रोजी चिखली येथून ११0 कट्टे,  तर ३ एप्रिल रोजी नांदुरा येथे १८४ कट्टे तांदूळ तहसीलदारांनी जप्त केला होता. त्याचप्रमाणे आता खामगाव येथे २0 टन तर बुलडाणा येथे  ७२ कट्टे तांदूळ पकडण्यात आला. तर शेगाव येथेही मोठय़ा प्रमाणात रेशनचा तांदूळ पकडण्यात आला होता.

वाहतूक नियमांना हरताळ!
गेल्या तीन महिन्यात जप्त करण्यात आलेल्या तांदळाची वाहतूक ही शासनाने अधिग्रहित केलेल्या वाहनांतून केली जात असली तरी, या ट्रकवर कोठेही ‘सार्वजनिक वितरण प्रणाली’ तसेच संबंधित वाहनांचा रंगही हिरवा नव्हता. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांमध्ये पकडण्यात आलेला सर्व तांदूळ हा काळ्या बाजारात जात असल्याची चर्चा आहे.

खामगाव पोलिसांच्या पत्रांवर कारवाई!
खामगाव येथे तांदूळ पकडण्यात आल्यानंतर खामगाव पोलिसांनी सोमवारी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी यासंदर्भात पुढील कारवाईसाठी पत्र दिले होते. या पत्रानुसार जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी पकडण्यात आलेला २0 टन तांदूळ ताब्यात घेण्यासाठी मंगळवारी तहसीलदारांना पत्र दिले आहे.

पालकमंत्री लक्ष देतील काय? 
जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी गुरुवारी बुलडाण्यात येणार आहेत. गरिबांचे धान्य काळ्या बाजारात विकण्याचा मुद्दा सध्या जिल्ह्यात गाजत आहे. पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन संबंधीतांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी होत आहे. 

Web Title: Cheap grains sell black market!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.