Chakli is stained with scabies; Spontaneous response to the all-party protest rally! | चिखली येथे कडकडीत बंद; सर्वपक्षीय निषेध रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद! 
चिखली येथे कडकडीत बंद; सर्वपक्षीय निषेध रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद! 

ठळक मुद्देकोरेगाव भीमा घटनेच्या निषेधार्थ जिल्हाभर रास्ता रोको

लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : कोरेगाव भीमा येथील घटनेच्या निषेधार्थ ३ जानेवारी रोजी चिखली शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. यानुषंगाने शहरातील प्रमुख मार्गावरून काढण्यात आलेल्या सर्वपक्षीय निषेध रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. काही किरकोळ बाबी वगळता रॅली व बंद शांततेत पार पडला.
कोरेगाव भीमा येथील घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी ३ जानेवारी रोजी सर्वपक्षीय बंद पाळण्यात येऊन यानिमित्ताने स्थानिक जयस्तंभ चौकापासून निषेध रॅली काढण्यात आली होती. यामध्ये सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, भीमसैनिक व भीमप्रेमी जनतेचा मोठा सहभाग होता. बसस्थानक, डी.पी. रोड, आठवडी बाजार, राजा टॉवर, चिंच परिसर, बागवान गल्ली, न.प.समोरून तहसील कार्यालयापर्यंत रॅली काढून तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर फुले-आंबेडकर वाटिकेत या रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅली मार्गावरील महात्मा जोतिबा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप आदी महामानवांच्या पुतळय़ास अभिवादन करण्यात आले, तर वाटिकेत रॅली पोहोचल्यानंतर सामूहिक बुद्ध वंदनेने सांगता करण्यात आली. यावेळी आमदार राहुल बोंद्रे, सुभाष राजपूत, मदनराजे गायकवाड, रफीक कुरेशी, पंडितराव देशमुख, डॉ.प्रकाश शिंगणे, अ.रऊफ, मो.असीफ, दत्ता सुसर, विलास कंटुले, सलीम मेमन, सुधीर चेके, समाधान गाडेकर आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व भीमसैनिक तथा भीमप्रेमी जनतेचा सहभाग होता.  

किरकोळ बाबी वगळता बंद शांततेत
शहरातील वैद्यकीय सेवा वगळता शहरातील सर्व व्यापारी व व्यावसायिकांनी स्वयंस्फूर्तीने आपापली प्रतिष्ठाने दिवसभर बंद ठेवली होती. त्यामुळे काही किरकोळ घटना वगळता कोणताही अनुचित प्रकार न घडल्याने हा शांततेत पार पडला. दरम्यान, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून शहरातील अनेक शाळा-महाविद्यालयेदेखील बंद होते, तर चिखली आगारातील सर्व बसफेर्‍या रद्द केल्याने सर्व बस वर्कशॉपच्या मैदानात उभ्या करण्यात आल्या होत्या. त्यामुळे आगारात दिवसभर शुकशुकाट होता, तर बंद व रॅलीदरम्यान अतिरिक्त पोलीस अधीक्षक संदीप डोईफोडे, डीवायएसपी महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार महेंद्र देशमुख, पीएसआय प्रल्हाद मदन, तानाजी गव्हाणे, सुधाकर गवारगुरू, मोहन पाटील, प्रवीण सोनवणो, मनोज केदारे, एपीआय राऊत यांच्यासह जलद प्रतिसाद पथक व पोलीस कर्मचार्‍यांनी ठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवला होता. 

दोघांना अटक
बंददरम्यान बसस्थानक परिसरातील शिवम ड्रायव्हिंग स्कूल व काळे कन्सलटन्सी या कार्यालयातील सामानाची तोडफोड तर धनराज जोशी यांच्या हॉटेलमधील सामानाची नासधूस करून त्यांना व त्यांचे वडील मोहन जोशी यांना मारहाण झाल्याने धनराज जोशी यांचा खांदा निखळला. याशिवाय जवंजाळ दूध डेअरीचे मालक राजू जवंजाळ यांना मारहाण झाल्याच्या तक्रारीवरून चिखली पोलिसांनी अमोल भंडारे व निंबाजी विश्‍वनाथ रा.शेलुद यांच्याविरुद्ध भादंवि कलम २९४, ३२३, ४२७, ३४ नुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे. यासह इतर काही किरकोळ बाबींवर पोलिसांनी तातडीने नियंत्रण मिळवून शहरातील शांतता अबाधित राखली. 


Web Title: Chakli is stained with scabies; Spontaneous response to the all-party protest rally!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.