Buldhana: Investigation of 16 people in Odhiad Purchase scam | बुलडाणा : उडीद खरेदी घोटाळ्यात १६ जणांची चौकशी

ठळक मुद्देगोपनीय माहिती काढण्याचे समितीसमोर आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/चिखली : नाफेड अंतर्गत बुलडाणा आणि चिखली येथील केंद्रावर झालेल्या उडीद खरेदी घोटाळ्यात नियुक्त करण्यात आलेल्या चौकशी समितीसमोर शुक्रवारी नोटीस बजावलेल्या ३५ पैकी ३२ जणांना चौकशीसाठी बुलडाण्यात बोलविण्यात आले होते. यापैकी सायंकाळपर्यंत बुलडाण्यामध्ये १६ जणांची चौकशी समितीने केली. दरम्यान, चिखली येथे खुद्द जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी या प्रकरणात चौकशी केली. दरम्यान, चौकशी समितीला नोटीस बजावलेल्यांनी फारशी समाधानकारक उत्तरे दिली नसल्याने प्रकरणातील सत्य काढण्याचे समितीसमोर आव्हान आहे. 
बुलडाणा जिल्ह्यातच चिखली आणि बुलडाणा येथे उडीद उत्पादक शेतकर्‍यांची व्यापार्‍यांनी एकप्रकारे लूट केली होती. दरम्यान, नाफेडच्या अधिकार्‍यांना हाताशी धरून चिखली आणि बुलडाणा येथील केंद्रांवर व्यापार्‍यांनी बोगस शेतकरी दर्शवून उडीद खरेदीमध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचे समोर आले होते. या प्रकरणात मोरे नामक व्यक्तीने तक्रार केली होती. 
त्या आधारावर जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण, सहायक निबंधक अविनाश सांगळे, जिल्हा विशेष लेखा परीक्षक दीपक जाधव यांची त्रिस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली होती. ही समिती सध्या चौकशी करीत असून, प्रकरणामध्ये प्राप्त माहितीनुसार जवळपास ५0 जणांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत. यापैकी  बुलडाणा येथील खरेदी केंद्रावर तीन शेतकर्‍यांनी २९ डिसेंबर २0१७ पूर्वी शासकीय उडीद खरेदीत गैरप्रकार करून शासनाची ३ लाख ३४ हजार रुपयांची फसवणूक केल्याची बाब उघड झाल्याने प्रभारी मार्केटिंग अधिकारी शिंगणे यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुलडाणा पोलिसांत ७ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री नागेश गजानन बाहेकर, समाधान तेजराव बाहेकर, विजय राघोजी बाहेकर (रा.किन्होळा) या तिघांविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक कवास हे करीत आहेत.
याच प्रकरणात शुक्रवारी बुलडाणा जिल्हा उपनिबंधक कार्यालयामध्ये नोटीस बजावलेल्या ३२ जणांना बोलाविण्यात आले होते. सायंकाळपर्यंत या प्रकरणात १६ जणांची समितीने कसून चौकशी केली; मात्र नोटीस बजावलेल्यांकडून समितीस त्यांच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरे प्राप्त होत नसल्याने या कथित स्तरावरील घोटाळ्यात नेमके कोण सहभागी आहेत, याचा माग काढणे यंत्रणेला काहीसे आव्हानात्मक बनत आहे. दुसरीकडे याच प्रकरणात चिखली येथेही जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी ही तपासणी केली. सायंकाळी उशिरापर्यंत प्रकरणात ते चौकशी करीत होते. या प्रकरणात काही बाजार समित्यांनाही प्रारंभी नोटीस बजावण्यात आल्या होत्या. आता चौकशी समिती या घोटाळ्याच्या तपासात सखोल चौकशी करीत आहेत.

माहिती देणार्‍यांची नावे गोपनीय ठेवणार!
बोगस पद्धतीने उडीद विक्री करणार्‍यांची माहिती देणार्‍यांची नावे चौकशी समिती गोपनीय ठेवणार आहे. त्यानुषंगाने चौकशी समितीस संबंधित नावे बिनधास्तपणे सांगावीत, असे आवाहनच या पृष्ठभूमीवर जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.

महाबीजकडून रेकॉर्ड प्राप्त
उडीद खरेदी घोटाळ्यात सोयाबीनचा प्लॉट घेऊन त्याच सात-बारावर उडीद विकल्याचे प्रकारही समोर आले होते. सोबतच एकाच सात-बारावर चिखली आणि बुलडाणा येथे उडीद विक्री केल्याचेही काही प्रकार समोर आले होते. त्यानुषंगाने अशा व्यक्तींचे रेकॉर्डही चौकशी समितीने महाबीजकडून मागवले होते. तेही प्राप्त झाले आहे. त्यानंतरच आता ही चौकशी सुरू झाली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.


Web Title: Buldhana: Investigation of 16 people in Odhiad Purchase scam
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.