भाजपकडून जवानांच्या शौर्याचा वापर राजकीय स्वार्थासाठी - शरद पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2019 02:41 PM2019-04-15T14:41:25+5:302019-04-15T17:01:08+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एअर स्ट्राईकचा वापर राजकीय स्वार्थासाठी करीत असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी बुलडाणा येथे केला.

Bjp use surgicle strike issue for political gain - Sharad pawar | भाजपकडून जवानांच्या शौर्याचा वापर राजकीय स्वार्थासाठी - शरद पवार

भाजपकडून जवानांच्या शौर्याचा वापर राजकीय स्वार्थासाठी - शरद पवार

googlenewsNext

बुलडाणा: सत्ताधारी भाजप-शिवसेनेच्या युतीकडून जवानांच्या शौर्य व त्यागाचा राजकीय स्वार्थासाठी वापर केला जात असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी बुलडाणा येथे आयोजित सभेत केला. 
बुलडाणा लोकसभा मतदार संघाचे आघाडीचे उमेदवार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या प्रचारार्थ सोमवारी त्यांची बुलडाण्यात सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून एअर  स्ट्राईकचा राजकीय स्वार्थासाठी होत असलेल्या वापराचा समाचार घेत शरद पवार यांनी म्हणाले की, पाकिस्तानच्या कैदेत सापडलेल्या विंग कमांडर अभिनंदन यांची सुटका ही छप्पन इंचाच्या छातीमुळे नव्हे तर जागतिक स्तरावरून पाकिस्तानवर आलेल्या दबावामुळे झाली. मोदी यांचा खरोखरच ऐवढा प्रभाव असले तर पाकिस्तानच्या तुरुंगात असलेल्या महाराष्ट्राच्या कुलभूषण जाधव यांचा शोध घेऊन त्यांची सुटका त्यांनी करावी, असे आव्हानच त्यांनी यावेळी बोलताना केले.
जगातील सर्वात मोठी लोकशाही ही भारतात आहे. आज पाकिस्तान, बांग्लादेशसह काही लगतच्या देशात वारंवार लोकशाही संपुष्टात आणून हुकुमशाही आणण्याचा प्रयत्न झाला. पण आपला देश आजपर्यंत लोकशाहीच्या चौकटीच्या बाहेर गेला नाही किंवा कोणी तसा प्रयत्न केला नाही. कारण घटनेने दिलेल्या दिशेतंर्गतच राज्यकर्र्त्यांनी कारभार केला. मात्र आज भाजप सत्ताधार्यांकडून वेगळे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला जात आहे. दरम्यान, आम्ही सत्तेत आल्यास आॅनलाईन फॉर्म भरून न घेता सरसगट कर्जमाफी व शेतीमाला हमीभावाच्या दीडपटी प्रमाणे किंमत देऊ आणि हे आम्ही यापूर्वी करून दाखवल आहे. ७० हजार कोटींची कर्जमाफी आम्ही दिली आहे. २००९ मधील कर्जमाफीनंतर आपण कृषी मत्री असताना दोन वर्षाच्या आत तांदुळ, गहू आणि कापूस निर्यातीत जगाच्या पहिल्या तीनमध्ये देशाचा समावेश झाला होता. मात्र सत्तेत असलेल्यांनी शेतकर्यांची दुर्दशा केली आहे. बीडनंतर राज्यात बुलडाणा जिल्हा शेतकरी आत्महत्यांमध्ये दुसर्या क्रमांकावर असल्याचा दावा त्यांनी केला. दरम्यान गुजरात मॉडेलचे २०१४ मध्ये आकर्षण होते. मात्र आज हा व्यक्ती कसा आहे, याची आता सर्वसामान्यांना जाण आली आहे. त्यामुळे परिवर्तनाचे संकेत असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, या प्रचार सभेला काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, पीरीपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, स्वाभीमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर, माजीद मेनन, आ. ख्वाजा बेग, माजी आ. कृष्णराव इंगळे, दिलीपकुमार सानंदा, आ. राहूल बोंद्रे यांच्यासह अन्य उपस्थित होते.

राफेल प्रकरणाचीही चौकशी करू
महाआघाडीचे सरकार सत्तेत आल्यास शेतकर्यांना सरसगट कर्जमाफी देण्यासोबतच राफेल प्रकरणातही सविस्तर चौकशी करू. गोपनियतेच्या नावाखाली कराराची माहिती देण्यास भाजपक  सरकारकडून विरोध दर्शविल्या गेला. त्याचीच कागदपत्रांची फोटो कॉफी प्रसारमाध्यमामध्ये येते. या उलट बोफोर्स प्रकरणात पारदर्शक चौकशी केल्यानंतर त्यातील सत्य समोर आले होते, असा दावा शरद पवार यांनी करत मोदी सरकारकडून राफेल प्रकरणात केला जाणारा बनाव निश्चितच संशयास्पद आहे. त्यामुळे या प्रकरणाची आम्ही सत्तेत आल्यास निश्चितच चौकशी करू असे शरद पवार यांनी सांगितले.

Web Title: Bjp use surgicle strike issue for political gain - Sharad pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.