ठळक मुद्देमनुष्यबळाचे कारण केले पुढे


लोणार:  बोरखेडी धरणातून बेकायदा पाण्याचा उपसा होत असल्याचे वृत्त प्रकाशीत करताच शाखाधिकारी एन. ए. बळी यांनी थेट बोरखेडी धरण गाठून आठ नोव्हेंबरला पाहणी केली. परंतू बेकायदा पाणी उपशाप्रकरणी त्यांनी कुठलीही कारवाई केली नसल्याने तर्कवितर्क व्यक्त होत आहे.
बोरखेडी धरणातून बेकायदा पाणी उपसा होत असल्याचे वृत्त लोकमते आठ नोव्हेबंरच्या अंकात प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेऊन अधिकारी तेथे गेले होते. धरणापासून अवघ्या अर्ध्या किलोमीटर अंतरावर शाखा अभियंत्यांचे कार्यालय आहे. परंतू त्यांना याबाबत फारशी माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मुळात या धरणात अत्यल्प पाणीसाठा आहे. आधीच लोणार तालुक्यातील काही गावामध्ये भूजल अधिनियम लागू करण्यात आला आहे. त्यामुळे उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे जतन करणे गरजेचे झाले आहे. मा६ त्याकडे अधिकार्यांकडून दुर्लक्ष होते. कारवाई करणार असल्याचे सांगण्यात येत आहे पण कारवाई केली जात नाही. मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने दोन दिवसानंतर कारवाई केली जाईल, असे शाखा अभियंत्यांचे म्हणणे आहे.


८ नोव्हेंबर रोजी बोरखेडी धरणावर जावून पाहणी केली. विद्युत कनेक्शन तोडलेले असताना कुठून विद्युत जोडणी करून पाणी चोरी होत आहे हे शोधण्यासाठी महावितरण अधिकार्यांशी संपर्क साधला आहे. -  एन.ए. बळी , शाखा अधिकारी, सिंचन शाखा , सुलतानपूर .
 
जिल्हाधिकारी व पाटबंधारे विभागामार्फत संबधित शाखा अधिकारी , कर्मचारी यांना पाणी चोरी थांबविण्यासाठी सक्त निर्देश देण्यात आलेले असून विद्युत वितरण कार्यालयालाही मोटार पंपाचे कनेक्शन तोडण्यासाठी पत्र देण्यात आहे. याबाबत शाखा अधिकारी एन. ए. बळी यांना कारवाईच्या सुचना देण्यात येतील. - कैलास ठाकरे , अतिरिक्त कार्यकारी अभियंता, पाटबंधारे विभाग, बुलडाणा.