87 percent of people ignore oral health; Oral cancer risk! | ८७ टक्के व्यक्तींचे मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष; मौखिक कर्करोगाचा धोका!
८७ टक्के व्यक्तींचे मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष; मौखिक कर्करोगाचा धोका!

ठळक मुद्देशाळांमध्ये जनजागृती व पोस्टर स्पध्रेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : बालपणी मनुष्याच्या तोंडातील दुधाच्या दातांची संख्या २0 असते. आयुष्याच्या उत्तरार्धात ३२ पैकी किमान २0 दात सुस्थितीत असणे, मौखिक आरोग्याविषयी अभ्यास करणार्‍या फेडरेशन डेंटायर इंटरनॅशनल (एफडीआय) या संघटनेला अपेक्षित आहे; मात्र ८७ टक्के व्यक्ती मौखिक आरोग्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येते.
मौखिक आरोग्य दिनाच्या पृष्ठभूमीवर याबाबत जाणून घेतले असता ही माहिती समोर आली. दरम्यान, जगातील १३६ देशांमधील दंत वैद्यांच्या १९१ संघटना यंदाचा जागतिक मौखिक आरोग्य दिन ५ फेब्रुवारी रोजी साजरा करीत आहेत. यानिमित्ताने बालकांपासून वृद्धांपर्यंत मौखिक आरोग्याकडे लक्ष वेधण्याचे प्रयत्न केले जात आहेत. प्राथमिक अवस्थेत मौखिक कर्करोगाचे निदान कर्करोग पूर्व लक्षणांमध्ये झाले, तर कर्करोग बरा होण्याचा दर ७0 ते ७५ टक्के असतो. 
हे लक्षात घेऊन राज्यात डिसेंबर २0१७ मध्ये संपूर्ण महिनाभर मौखिक आरोग्य तपासणी मोही आरोग्य विभागांमार्फत टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या सहकार्याने राज्यातील ३४ जिल्ह्यांत राबविण्यात आली. 
या मोहिमेंतर्गत ३४ जिल्ह्यांमध्ये २ कोटी ८ लाख ४0 हजार ८५२ लोकांची मौखिक आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी एकूण रुग्णांपैकी २५ टक्के रुग्णांमध्ये मौखिक अस्वच्छता आढळून आली. त्यांना मौखिक स्वास्थ्य चांगले ठेवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय राज्यातील ३२ जिल्ह्यांमध्ये जागतिक कर्करोग दिन, मौखिक आरोग्य दिनानिमित्त ३ ते १७ फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

३ ते १७ फेब्रुवारीदरम्यान राबविण्यात येणारे कार्यक्रम
जिल्ह्यात जिल्हाधिकारी डॉ. पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली ३ ते १७ फेब्रुवारीदरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमानुसार ३ ते १७ फेब्रुवारीदरम्यान दररोज मौखिक आरोग्य तपासणी करण्यात येणार असून, संबंधित रुग्णांची फेरतपासणी व संशयितांची बायोप्सी करण्यात येणार आहे. तसेच ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान जिल्ह्यातील आरोग्य कर्मचार्‍यांसाठी जनजागृती कार्यशाळा, कर्करोगावर समुपदेशन व व्याख्याने, ६ ते ७ फेब्रुवारी तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत विविध विभागाशी चर्चासत्र, ८ फेब्रुवारी रोजी तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत पोलीस विभागाबरोबर बैठक, ९ ते १२ फेब्रुवारीदरम्यान तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत सर्व शाळेत माहिती देणे, पोस्टर स्पर्धा घेणे, तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी मार्गदर्शन, शिक्षकांना तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रवृत्त करणे, १४ ते १५ फेब्रुवारीदरम्यान जिल्हा माहिती अधिकार्‍यांच्या साहाय्याने कर्करोगासंबंधी जनजागृती करणे व १६ फेब्रुवारीदरम्यान स्त्रीरोग चिकित्सकांकडून गर्भाशय मुख कर्करोग, स्तन कर्करोग तपासणी शिबिराचे आयोजन करणे आदी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.

मौखिक आरोग्य संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी निगडित आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने मौखिक आरोग्याकडे लक्ष द्यावे, तंबाखू, गुटखा यासारख्या व्यसनांपासून दूर राहून आपले मौखिक व शारीरिक आरोग्य चांगले ठेवावे.
-डॉ. प्रकाश अंभोरे, 
दंत चिकित्सक, बुलडाणा.


Web Title: 87 percent of people ignore oral health; Oral cancer risk!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.