10 thousand crore development works in Buldhana district | बुलडाणा जिल्ह्यात १0 हजार कोटींच्या विकास कामांचा शुभारंभ 

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांनी घेतला विरोधकांचा समाचार जिल्ह्याला ६६५ कोटी रुपयाची मिळाली कर्जमाफी

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदूरा : ज्यांनी आभाळाला भोकं पाडली तेच आता आभाळ फाटल्याची बोंब ठोकत आहेत, असा टोला मारत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीच्या मुद्यावर विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. आमचे सरकार शेतकर्‍यांचे असून आतापयर्ंत जिल्ह्यातील १ लाख १६ हजार ८४५ शेतकर्‍यांच्या खात्यात ६६५ कोटी रुपये जमा झाल्याचे सांगून जिगाव प्रकल्पासह जिल्ह्याच्या इतिहासात एकाच दिवशी १0 हजार कोटी रुपयांच्या विकास कामांना प्रारंभ होत असल्याचे सांगत जिगाव प्रकल्पासह ८ लघु प्रकल्पाच्या कामाचा शुभारंभ त्यांनी केला. 
नांदुरा येथील कोठारी विद्यालयाच्या प्रांगणात रविवार, १७ डिसेंबर रोजी आयोजीत कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, कृषीमंत्री भाऊसाहेब फुंडकर, खासदार प्रतापराव जाधव, आ. आकाश फुंडकर, आ. चैनसुख संचेती, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आदींची उपस्थिती होती. यावेळी सरकारने सर्व प्रलंबीत प्रकल्पांना संजीवनी देण्याचे काम हाती घेतले आहे. यासाठी पंतप्रधानांना प्रत्यक्ष भेटून यासाठी निधी खेचून आणला. १0८ प्रकल्पामुळे सिंचनाच्या सोयी शेतकर्‍यापयर्ंत पोहचू शकणार आहे. यासाठी प्रामुख्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तत्काळ मान्यता दिली. ३0 हजार कोटी रुपये यासाठी मंजूर झाले. जी कामे अर्धवट सोडली आहेत. ती कामे हातात घेवून पुर्णत्वात नेण्यासाठी येत्या २ वर्षात प्रयत्न केले जातील. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी आम्ही कटाक्षाने काळजी घेत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

तीन पिढ्या रस्त्यात खड्डे पडणार नाही : नितीन गडकरी 
३१ ऑक्टोबर रोजी केलेल्या कामाचा शुभारंभ झाला होता ही कामे आज पुर्णत्वास येत आहेत. नांदुरा, शेगाव, संग्रामपूर, खामगाव आदी तालुक्यातील रस्ते, पूलाचे काम सुरु झाले आहे. खामगाव, नांदुरा, जळगाव आदी शहरातील रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. तीन पिढ्या रस्त्यात खड्डे पडणार नाही असे १00 टक्के गुणवत्ता असलेले रस्ते आम्ही देवू अशी ग्वाही गडकरी यांनी दिली. 

२२ हजार कोटी रुपये शेतकर्‍याच्या खात्यात : कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर 
राज्यातील २२ हजार कोटी रुपये शेतकर्‍याच्या खात्यात पैसे जमा झाले आहेत. जिल्हयातील शेतकर्‍यांना प्राधान्य देत ६६५ कोटी रुपयाची कर्जमाफी दिली आहे. त्यामुळे कुणीही दिशाभूल करू नका असा इशारा कृषीमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी लगावला.