You will surely love to do the future: Respected Jain | भविष्यात दिग्दर्शन करायला नक्कीच आवडेलः आदर जैन

राज कपूर यांची मुलगी रिमा जैनचा मुलगा आदर जैन कैदी बँड या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. त्याच्या या पहिल्या चित्रपटाबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

तुझे आजोबा राज कपूर हे अतिशय नामवंत अभिनेते, दिग्दर्शक होते. तुझे मामा-मामी, तुझी भावंडं देखील याच क्षेत्रात आहेत. तू देखील या क्षेत्रात करियर करायचे असे लहानपणीच ठरवले होते का?
मी लहान असताना अभिनयक्षेत्रात यायचे असे कधीच ठरवले नव्हते. मला खेळांमध्ये अधिक रस होता. मी एक चांगला फुटबॉलपट्टू आहे. मी शाळेत असताना खेळासोबत एका बँड मध्ये देखील होतो. त्या बँडमध्ये मी ड्रम वाजवत असे. त्यामुळे खेळ आणि संगीत या दोन्ही गोष्टीत मी रमलो होतो. पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर अभिनय क्षेत्रात करियर करण्याविषयी मी विचार केला आणि ही गोष्ट माझ्या आईला आणि वडिलांना सांगितली. माझा हा निर्णय ऐकून माझी आई तर खूपच खूश झाली होती. तिने मला या क्षेत्रात येण्यासाठी प्रचंड पाठिंबा दिला. पण त्याचसोबत चित्रपटसृष्टीत काम करताना सगळे काही विसरून केवळ कामावरच लक्ष केंद्रित केल्यास तुला यश मिळेल असे तिने मला सांगितले.

तुझ्या निर्णयाबाबत तुझ्या मामांचे आणि भावंडांचे काय म्हणणे होते?
मी अनेक चित्रपटांसाठी ऑडिशन देत होतो. पण जोपर्यंत माझी चित्रपटासाठी निवड झाली नाही, तोपर्यंत मी कोणालाच काहीही सांगितले नव्हते. पण चित्रपट साईन केल्यावर मी चिंटू मामा (ऋषी कपूर), रणधीर मामा (रणधीर कपूर), रणबीर (रणबीर कपूर) यांना सांगितले. मी चित्रपटात काम करणार हे ऐकल्यावर ते सगळेच खूश झाले होते. आमच्या कुटंबातील आणखी एक सदस्य या क्षेत्रात येत आहे याबाबत त्यांना प्रचंड अभिमान वाटत असल्याचे त्यांनी मला सांगितले.

कैदी बँड या चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?
मी या चित्रपटात संजू या मुलाची भूमिका साकारत आहे. तो अतिशय महत्त्वकांक्षी आहे. तो जेलमध्ये असला तरी तो तिथे देखील काही ना काही तरी जुगाड करतो. या व्यक्तिरेखेला अनेक पैलू आहेत. त्यामुळे ही भूमिका साकारायला मला खूप मजा आली. या चित्रपटात मी गिटात वाजवले आहे. त्यासाठी मी गिटार वाजवण्याचे शिक्षण देखील घेतले आहे.

तू भविष्यात दिग्दर्शन करण्याचा विचार केला आहेस का?
मी हॅपी न्यू इयर, ए दिल मुश्कील यांसारख्या चित्रपटासाठी साहाय्यक दिग्दर्शन केले आहे. त्यामुळे मला दिग्दर्शन क्षेत्रात करियर करण्यामध्ये नक्कीच रस आहे. सध्या तरी मी अभिनयक्षेत्राकडे लक्ष केंद्रित करणार आहे. पण भविष्यात मला दिग्दर्शन करायला देखील आवडेल. 

Also Read : ​​आदर जैन आहे होम मिनिस्टरचा फॅन
Web Title: You will surely love to do the future: Respected Jain
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.