'Teacher's life results in the life of the teacher!' - Rani Mukherjee | ‘शिक्षकांमुळेच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला मिळतो आकार!’ -राणी मुखर्जी

‘हिचकी’ या आगामी चित्रपटाद्वारे अभिनेत्री राणी मुखर्जी बॉलिवूडमध्ये कमबॅक करत आहे. तिची मुलगी आदिरा हिच्या जन्मानंतरचा ‘हिचकी’ हा तिचा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात तिने ‘टरेटस सिंड्रोम’ आजाराने ग्रस्त असलेल्या शिक्षिकेची भूमिका साकारली आहे. या चित्रपटाविषयी जान्हवी सामंत 
यांनी तिच्याशी मारलेल्या या गप्पा...

* शाळेत असताना तुझ्या शिक्षकांसोबतचे तुझे नाते कसे होते?
- मला अजूनही आठवतं की, शाळेत मी माझ्या शिक्षकांची खूप लाडकी होते. मला माझ्या शाळेतील शिक्षक खूप आवडायचे. एवढेच नव्हे तर आमच्या शाळेचे मुख्याध्यापकही खूप चांगले होते. शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील नातं मैत्रीपूर्ण होतं. 

* शिक्षक-विद्यार्थी यांच्या आदर्श नात्यांतील गुणधर्म कोणते, तुला काय वाटते?
- मला असं वाटतं की, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील नातं हे अनौपचारिक पद्धतीचं असलं पाहिजे. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना समान लेखून त्यांना समान संधी देणं अपेक्षित आहे. कधीही विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव करायला नको. त्यांच्यामध्ये आदरयुक्त धाक असावा मात्र, जिव्हाळाही असावाच. त्यांच्यातील नातं इतकं  मैत्रीपूर्ण असावं की, विद्यार्थ्यांनी त्यांच्या मनातील प्रश्न खुलेपणाने शिक्षकांना विचारले पाहिजेत. शिक्षकच विद्यार्थ्यांच्या आयुष्याला योग्य आकार देऊ शकतात. 

* तुझ्या आयुष्यातील गुरूविषयी काय सांगशील?
- खरंतर, श्रीदेवी. कारण त्यांना पाहूनच मी अ‍ॅक्टिंग आणि डान्स शिकले. कामाप्रती त्यांची असलेली समर्पणवृत्ती, आवड या सर्व गोष्टींनी मला अभिनय क्षेत्रात येण्यास भाग पाडले. त्याशिवाय नर्गिस, हेलन, रेखा यांना मी माझा आदर्श मानत आले आहे. तसेच माधुरी दिक्षीत ही स्वत:च एक अभिनयाची संस्था आहे. आमिर खान, शाहरूख खान या माझ्या सहकलाकारांकडून मी अभिनयातील समर्पण, वक्तशीरपणा शिकले. ‘युवा’ चित्रपटाच्यावेळी दिग्दर्शक मनी रत्नम यांनीही मला बरंच काही शिकवलं. आयुष्यात बऱ्याचदा असं होतं की, अनेक जण आपल्याला बरंच काही शिकवून जातात. 

* तू बॉलिवूडमध्ये डेब्यू केलास तेव्हापासून आजपर्यंतचा काळ ​ संपूर्णपणे बदलला आहे. तुझ्या ‘गुलाम’ ते ‘अय्या’ या चित्रपटापर्यंतच्या प्रवासात तुझ्या व्यक्तिमत्त्वातही किती बदल झाला आहे, असे तुला वाटते?
- खरं सांगायचं तर, माझ्यासाठी सगळयात महत्त्वाचं माझा अभिनय आहे. मी माझ्या भूमिकेतून प्रेक्षकांसोबत किती संपर्क साधते, हे माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे. मी भूमिकेशी एवढी एकरूप झाली पाहिजे की, प्रेक्षकांना मला पडद्यावर पाहताना वाटावं की, अरे ही तर मी आहे. ही माझ्या अभिनयाची खरी पावती असेल. गुलामपासून ते अय्यापर्यंत माझ्या व्यक्तिमत्त्वात प्रचंड बदल झाला आहे. माझ्या अवतीभोवती असलेल्या लोकांकडून मी बरंच काही शिकले आहे. मी कष्ट घेतले, सखोल अभ्यास केला. 

* आई झाल्यानंतर तुझं आयुष्य किती बदललं? तुझा दृष्टीकोन किती बदलला आहे?
- आदिराची आई झाल्यानंतर मी पूर्णपणे बदलले. मी अत्यंत शांतपणे माझी कामं करते. एक क्षणही मी वाया जाऊ देत नाही. मला वेळेचे नियोजन करणं जमू लागले. खरंतर तुम्हाला जेव्हा आई होण्याचा आनंद अनुभवता येतो तेव्हा तुम्ही माणूस म्हणून पूर्णपणे बदलून जाता. तुमचं मन कायम तुमच्या अपत्याभोवती फिरत राहतं. त्यामुळे मी अनेकदा चित्रपटातील आईच्या भूमिकेत जास्त चांगल्याप्रकारे रमू शकते. 

* नैनाच्या व्यक्तिरेखेसाठी तुला कोणती ट्रेनिंग घ्यावी लागली?
- टरेटस सिंड्रोम आजाराने ग्रस्त ब्रॅड नावाच्या एका मुलासोबत मी बराच काळ घालवला. त्याच्याकडून त्याच्या आजाराविषयक प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. त्याच्याकडून मला बरीच मदत मिळाली. मी यूट्यूबवर अनेक व्हिडीओज पाहिले. त्यातून अनेक गोष्टी शिकले. त्यामुळे मी माझ्या भूमिकेत जास्तीत जास्त उतरू शकले.

* सध्याची शिक्षणपद्धती पाहता कशाप्रकारचे बदल तुला अपेक्षित आहेत?
- विद्यार्थ्यांमधील निकोप वाढीसाठी त्यांना निरोगी वातावरण, स्वच्छ टॉयलेट, बाथरूम्स, शिकवण्याच्या पद्धती यांच्यात बदल करणे गरजेचे आहे. त्यासोबतच शिक्षक-विद्यार्थी यांच्यातील नाते हे पारदर्शक आणि सुसंवादी असायला हवे. मैत्रीपूर्ण नाते त्यांच्यात निर्माण व्हायला हवे. 
Web Title: 'Teacher's life results in the life of the teacher!' - Rani Mukherjee
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.