Stiglors travel through WebSeries - Vipin Sharma | स्ट्रगलर्सचा प्रवास वेबसीरिजच्या माध्यमातून - विपिन शर्मा

अबोली कुलकर्णी

‘तारें जमीं पर’,‘जन्नत’,‘१९२०’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये अभिनेता विपिन शर्मा यांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. आता ते ‘अक्की, विक्की ते निक्की’ ही वेबसीरिज घेऊन १९ ऑकटोबर पासून  प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. या वेबसीरिजमधून त्यांनी बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी झगडणाऱ्या तीन युवकांची कहानी मांडली आहे. या वेबसीरिजच्या निमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या या गप्पा...

* ‘अक्की,विक्की ते निक्की’ या वेबसीरिजमधून तुम्ही दिग्दर्शनाच्या क्षेत्रात डेब्यू केला आहे. वेबसीरिजच्या या कन्सेप्टविषयी काय सांगाल?
- खरंतर मी जेव्हा माझ्या करिअरच्या सुरूवातीला बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी आलो होतो. तेव्हा मला खूप स्ट्रगल करावा लागला होता. तो संघर्ष आणि स्ट्रगलमुळेच मी आज या उंचीवर पोहोचलो आहे. थोडक्यात काय तर, मी हा स्ट्रगल जवळून अनुभवला आहे. वेबसीरिजच्या बाबतीत म्हणाल तर, हा स्ट्रगल मला कुठेतरी पडद्यावर आणावासा वाटला. ही कहानी आहे तीन युवकांची. ते इंडस्ट्रीत नाव कमावण्यासाठी किती स्ट्रगल करतात? त्यांना कोणकोणत्या प्रसंगांना सामोरे जावे लागते ? याचे सर्व चित्रण यात करण्यात आले आहे. 

* या कन्सेप्टवर वेबसीरिज बनवण्याचा विचार कसा आला?
- मुंबई ही स्वप्ननगरी आहे. मुंबईत अनेक स्ट्रगलर्स इंडस्ट्रीत काम मिळवण्यासाठी येत असतात. हे स्ट्रगलर्स गरीब घरातून आलेले असतात. ते केवळ एका संधीच्या प्रतिक्षेत असतात. ती जर त्यांना मिळाली तर ते त्याचं सोनं करतात. स्ट्रगलर्सचा हा संघर्ष मी स्वत: जवळून पाहिला आहे. गावाकडून आल्यानंतर आठ ते दहा जण  मुंबईत एका छोटया रूममध्ये राहतात. हे असे कलाकार आहेत ज्यांना अभिनयाचे कुठलेही धडे मिळालेले नाहीत. ते केवळ अभिनय क्षेत्रात नाव कमवायचे या एकाच उद्देशाने झपाटलेले असतात. त्यांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी मी या विषयावर वेबसीरिज बनवण्याचा विचार केला.

* चित्रपट आणि वेबसीरिज यांच्यामध्ये काय फरक जाणवतो?
-  वेबसीरिज हे माध्यम एपिसोडच्या रूपात असल्याने प्रेक्षक ते केव्हाही पाहू शकतात. चित्रपटांचे तसे होत नाही. चित्रपट हे तुम्हाला थिएटरमध्ये जाऊनच पाहावे लागतात. त्यासाठी तुम्हाला वेळ आणि पैसा दोन्हीही खर्च करावा लागतो. 

*  आत्तापर्यंत तुम्ही अनेक चित्रपटांमध्ये वेगवेगळया भूमिका साकारल्या आहेत. भूमिका निवडत असताना तुम्ही कोणत्या गोष्टींचा विचार करता?
- चित्रपट हे आता समाजमनाचा आरसा बनत चालले आहेत. समाजात घडणाऱ्या  गोष्टीच आपण पडद्यावर पाहतो. पडद्यावर दाखवण्यात येणारे प्रश्न, समस्या हे समाजातीलच असतात. मला असं वाटतं की, चित्रपटगृहातून बाहेर पडताना प्रेक्षकांनी थोडासा विचार करणे अपेक्षित असते. प्रेक्षक अंर्तमुख झाले पाहिजेत. त्यांना विचार करायला भाग पाडणाऱ्या  कथानकाची निवड करण्याला मी प्राधान्य देतो. 

*  तुमचे भविष्यातील प्लॅन्सविषयी काय सांगाल?
- आगामी ‘शादी मैं जरूर आना’ आणि ‘बागी २’ या दोन चित्रपटांमध्ये मी महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहे. या वेबसीरिजचे एपिसोड्स शूट करणे देखील काही दिवस सुरूच राहणार आहे.
Web Title: Stiglors travel through WebSeries - Vipin Sharma
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.