... so I left the direction - Mahesh Bhat | ... म्हणून मी दिग्दर्शन सोडले - महेश भट

महेश भट यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट हे अनेकवेळा सामाजित प्रश्नांवर भाष्य करणारे असतात. सडक, जख्म, अर्थ, सारांश यांसारखे त्यांनी दिग्दर्शित केलेले चित्रपट तर प्रेक्षकांना प्रचंड आवडले होते. नव्वदीच्या दशकात त्यांनी काही मालिकांचेही दिग्दर्शन केले होते. पण गेली काही वर्षं ते छोट्या पडद्यापासून दूर होते. नामकरण या लवकरच सुरू होणाऱ्या मालिकेची कथा ही त्यांनी लिहिली आहे. या मालिकेच्या निमित्ताने त्यांच्याशी मारलेल्या गप्पा...
 
नामकरण या मालिकेची कथा तुम्ही लिहिलेली आहे. या मालिकेचे दिग्दर्शन तुम्ही का केले नाही?
मी दिग्दर्शन करणे हे 1998मध्येच सोडले आहे. प्रत्येक काळ हा वेगवेगळा असतो. काळाप्रमाणे गोष्ट सांगण्याची पद्धत ही बदलत जाते. आजच्या पिढीला आजच्या पिढीची भाषा जास्त कळते. त्यामुळे प्रत्येक काळाचा फिल्ममेकर हा वेगळा असतो. आजच्या काळाची भाषा मला तितकीशी कळत नसल्याने मी दिग्दर्शन करणे सोडले.
 
नामकरण या मालिकेत प्रेक्षकांना काय पाहायला मिळणार आहे?
नामकरण या मालिकेत एका लहान मुलीच्या नजरेतून कथा मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. ही मुलगी समाजाला काही प्रश्न विचारते. हे प्रश्न सगळ्यांनाच नक्कीच विचार करायला लावतील. आपल्या समाजात स्त्रीला लग्नाआधी वडिलांच्या आडवानाने ओळखले जाते. तर लग्नानंतर तिला नवऱ्याचे आडनाव लावावे लागते. या सगळ्यात तिला तिचे काही अस्तित्व असते हे सगळेच विसरून जातात हे या मालिकेद्वारे मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे. 
 
या मालिकेत रिमा लागू, बरखा बिश्ट आणि अश्विन हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. कलाकारांच्या निवडीमध्ये तुमचा सहभाग किती होता?
मी कथा लिहिल्यानंतर या मालिकेतील मुख्य भूमिकेसाठी रिमा लागूच योग्य आहे असे मला वाटत होते. त्यामुळे मी रिमाचे नाव सुचवले. तर इतर कलाकाराची निवड प्रोडक्शन हाऊसने केली. बरखा ही अतिशय चांगली अभिनेत्री आहे तर अश्विन ही बालकलाकार तर अफलातून अभिनय करते. तिला इतक्या लहान वयात सगळ्या गोष्टी कशा कळतात हा मला नेहमीच प्रश्न पडतो. 
 
आजच्या मालिकांविषयी तुमचे काय म्हणणे आहे?
मी आजकाल मालिका पाहाणेच सोडून दिले आहे. दूरदर्शनच्या काळातील मालिका या खूपच चांगल्या होत्या. आजच्या मालिकांचा दर्जा हा उतरलेला आहे. यासाठी कथा जबाबदार आहेत. छोटा पडदा हे सगळ्यात जास्त प्रभावी माध्यम आहे. पण त्याचा योग्यप्रमाणे वापरच केला जात नाहीये. अनेकवेळा छोट्या पडद्यावर चांगले कलाकार नाहीत असे म्हटले जाते. पण छोट्या पडद्यावर अतिशय चांगले कलाकार असून लेखक आणि दिग्दर्शकांनाच त्यांचा वापर कसा करून घ्यायचा ते कळत नाही असे माझे मत आहे.
 
या मालिकेची कथा तुमच्या आयुष्याशी निगडित आहे असे म्हटले जात आहे, हे खरे आहे का?
या मालिकेची संपूर्ण कथा ही माझ्या आयुष्याशी निगडित आहे असे मी म्हणणार नाही. पण या मालिकेतील काही भाग हा माझ्या आयुष्यावर आधारित आहे. तसेच आयुष्यात आलेले काही अनुभव या मालिकेद्वारे मी मांडण्याचा प्रयत्न केला आहे तर काही गोष्टी या काल्पनिक आहेत. 

Web Title: ... so I left the direction - Mahesh Bhat
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.