Shweta Bachchan is now a career in this field, she is happy to be the family of Bachchan | श्वेता बच्चन आता या क्षेत्रात करणार करियर, तिच्या या इनिंगमुळे बच्चन कुटुंबिय झाले खूश

महानायक अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता बच्चन नंदा हिची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. श्वेता फिल्मी दुनियेत नाही. पण म्हणून फिल्मी दुनियेशी तिचे नातेचं नाहीच, असे मात्र मुळीच नाही. ग्लॅमर दुनियेपासून दूर असली तरी श्वेता कायम चर्चेत असते. श्वेता आता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. श्वेता चर्चेत येण्यामागे एक खास कारण आहे. कारण अमिताभ बच्चन यांची लेक आता अभिनयसृष्टीकडे वळली आहे. 
श्वेता बच्चन ही व्यवसायाने ज्वेलरी डिझायनर असून ती या क्षेत्रातील बरेच मोठे नाव आहे. श्वेताची आई आणि वडील दोघेही अभिनयक्षेत्रात प्रसिद्ध असले तरी तिने नेहमीच अभिनयापासून दूर राहाणेच पसंत केले होते. ती आई-वडिलांसोबत फिल्मी पार्ट्यांना हजेरी लावत असली तरी कॅमेऱ्यासमोर न येण्याचेच तिने ठरवले होते. पण आता श्वेता एका जाहिरातीत झळकणार आहे. अमिताभ बच्चन कल्याण ज्वेलर्सचे अनेक वर्षांपासून ब्रँड अम्बेसेडर आहेत. आता कल्याण ज्वेलर्सच्या जाहिरातीत अमिताभ यांच्यासोबत श्वेता झळकणार आहे. या जाहिरातीसाठी अमिताभ आणि श्वेता यांनी नुकतेच चित्रीकरण केले असून चित्रीकरणावेळेचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
बच्चन कुटुंबियातील सगळेचजण हे चित्रपटसृष्टीशी निगडित आहेत. अमिताभ बच्चन हे बॉलिवूडचे महानायक आहेत तर त्यांच्या पत्नी जया बच्चन यांनी अनेक चित्रपटात खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांना आजवर त्यांच्या अनेक भूमिकांसाठी पुरस्कार मिळाले आहेत. अमिताभ आणि जया यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा मुलगा अभिषेकही अभिनयक्षेत्रात आपले करियर करत आहे. अभिषेकची पत्नी ऐश्वर्या रायने हम दिल दे चुके सनम, ताल, देवदास असे अनेक हिट चित्रपट दिले आहेत. आता अमिताभ यांची लेक देखील या जाहिरातीद्वारे कॅमेऱ्यासमोर आली आहे. तिची ही नवी इनिंग प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी बच्चन कुटुंबियांना खात्री आहे. 
श्वेता ही अमिताभ आणि जया यांची मोठी मुलगी आहे. १९९७ मध्ये तिने निखिल नंदासोबत लग्न केले. तिला नव्या नवेली नंदा आणि अगस्त्या नंदा अशी दोन मुले आहेत. लवकरच श्वेताने लिहिलेले पहिले पुस्तक ‘पॅराडाईज टॉवर्स’ प्रकाशित होणार आहे.

Also Read : अमिताभ बच्चन यांच्याआधी या अभिनेत्यांना विचारण्यात आले होते डॉन चित्रपटासाठी
Web Title: Shweta Bachchan is now a career in this field, she is happy to be the family of Bachchan
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.