Shock !!! Actress Sridevi dies due to heart attack | सदमा!!! अभिनेत्री श्रीदेवी यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन

घायाळ करणारे श्रीदेवीचे नयना.... दिलखेचक अदा... आणि बेधुंद करणार डान्स... अनेक सिनेमातून  श्रीदेवी आणि जितेंद्रनं सा-यांच्या काळजाचा ठाव घेतला...सौंदर्य आणि उत्कृष्ट अभिनय यांच्या जोरावर हिंदी सिनेसृष्टीत आपली स्वत:ची अशी एक वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री ‘श्रीदेवी’ यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने आकस्मिक निधन झाले. त्या 54 वर्षांच्या होत्या. आपल्या कुटुंबीयांसह दुबईत एका लग्न समारंभासाठी गेल्या असताना शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि रूग्णालयात दाखल करण्याआधीच त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली आणि पती बोनी कपूर असे कुटुंब आहे. त्यांच्या आकस्मिक झालेल्या निधनामुळे सिनेसृष्टीत व चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.आज दुपारी दोन वाजता त्यांना मुंबईत आणले जाणार असल्याची माहिती मिळते.

श्रीदेवी यांनी बॉलिवूडमध्ये अभिनय, सौंदर्य आणि नृत्याविष्काराने स्वतःचा वेगळा असा ठसा उमटवला आहे. त्यांनी सदमा, मिस्टर इंडिया, नागिन, लम्हें, इंग्लिश विंग्लिश, मॉम यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये आपली भूमिका साकारुन रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. बालकलाकार म्हणून श्रीदेवी यांनी चित्रपटृष्टीत पाय ठेवला होता. त्यांनी वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी तमिळ चित्रपटात काम केले. 1967 साली त्यांचा एका मल्याळम चित्रपटातील भूमिकेसाठी केरळ सरकारने सर्वोत्कृष्ट बाल कलाकार म्हणून गौरव केला होता.

1978 साली सोलावा सावन या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्यांनी आतापर्यंत अनेक चित्रपटांत काम केले आहे. बॉलिवूडमधील सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमधून त्यांनी भूमिका साकारल्या. याचबरोबर, त्यांनी हिंदी चित्रपटांसह तमीळ, तेलगू, मल्याळम, कन्नड चित्रपटांमध्ये सुद्धा काम केले. त्याचबरोबर, श्रीदेवी यांना  हिंदी, तमिळ,तेलुगू भाषांतील चित्रपटातील भूमिकांसाठी सहा वेळा फिल्मफेअर पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. त्यांचा मॉम हा श्रीदेवीचा चित्रपट शेवटचा ठरला. 
Web Title: Shock !!! Actress Sridevi dies due to heart attack
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.