Race 3 Movie Review: नुसताचं पोकळपणा!! | Race 3 Movie Review: नुसताचं पोकळपणा!!
Race 3 Movie Review: नुसताचं पोकळपणा!!
Release Date: June 15,2018Language: हिंदी
Cast: सलमान खान, बॉबी देओल, अनिल कपूर, डेजी शाह, जॅकलिन फर्नांडिस
Producer: रमेश तौरानी, सलमान खानDirector: रेमो डिसुजा
Duration: २ तास ४६ मिनिटGenre:

लोकमत रेटिंग्स

-जान्हवी सामंत

भाईजान सलमान खान याचा ‘रेस3’ हा चित्रपट आज शुक्रवारी ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झाला. देशातील साडेतीन हजारांवर पडद्यांवर झळकलेल्या या चित्रपटाची सलमानच्या चाहत्यांमध्ये फार उत्सुकता होती. ट्रेलरने ही उत्सुकता शिगेला पोहोचवली होती. आता हा चित्रपट रिलीज झाला आहे, तेव्हा जाणून घेऊ यात, तो कसा आहे तो...

भारी महागड्या अलिशान गाड्या, चमचमते कपडे, उंचचं उंच अवाढव्य इमारती, बिलीयन डॉलर्सच्या डील्स, एक डझनभर हिरो-हिरोईन्स आणि कथा म्हणाल तर मुंगी एवढी, असेचं ‘रेस3’चे थोडक्यात वर्णन करायला हवे. ‘रेस’ फ्रेन्चाईजीचे कथानक तसे विषयानुरूप असते. पण ‘रेस3’च्या कथानकाची एक वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे, मुळात यातली सगळी पात्र (सलमान खान, बॉबी देओल, अनिल कपूर)  पन्नाशीच्या वरचे असल्यामुळे ही ‘रेस’ खरी ‘बोटॉक्स’ आणि ‘हेअर डाय/ हेअर बॉन्डिंग’ची आहे की काय, असा संशय येतो. चित्रपट सुरू झाल्यानंतर पंधरा मिनिटांतच कथेत काहीही दम नसल्याचा अंदाज येतो.
समशेर सिंगच्या (अनिल कपूर) कुटुंबाच्या गुंतागुंतीच्या नात्यांची गोष्ट म्हणजे ‘रेस3’. समशेरला तीन मुले असतात़ एक सिकंदर (सलमान खान) आणि  दोन जुळी सूरज (साकिब सलीम) आणि संजना (डेजी शाह). खरे तर सिकंदर हा समशेरच्या मोठ्या भावाचा मुलगा असतो. पण समशेरचा त्याच्यावर प्रचंड जीव असतो. आपल्या सर्व कामांसाठी त्याला सिकंदरवरचं सर्वाधिक विश्वास असतो. साहजिकच सूरज आणि संजना यामुळे सिकंदरचा द्वेष करतात आणि त्याचे सगळे प्लान फ्लॉप करण्याच्या प्रयत्नात असतात. यासाठी ते सिंकदरचा मित्र भाई आणि बॉडीगार्ड यश (बॉबी देओल)चा वापर करण्याची योजना आखतात आणि यासाठी जेसिकाची (जॅकलिन फर्नांडिस) मदत घेतात़.
एका राजकीय नेत्याच्या सप्ततारांकित हॉटेलातील अश्लिल करामतींचे पुरावे असलेली एक हार्डडिस्क मिळवण्याचा प्रयत्न आणि त्याला ब्लॅकमेल करण्याच्या कट कारस्थानापासून चित्रपटातील ‘गुंता’ सुरू होतो. मध्यंतरापर्यंत कथेमध्ये ही गुंतागुंतचं तेवढी दिसते. सूरज आणि संजना सिकंदरला डबलक्रॉस करत असतात. यश आणि जेसिका त्यात भर घालतात. डिस्कोमध्ये नाचता नाचता हार्ड डिस्क मिळवल्यानंतर चित्रपटात आणखी काही ट्विट्स येतात. पण गाड्यांची रेसिंग, गोळीबार आणि कर्णकर्कश स्फोटांच्या आवाजात नक्की काय होतेयं, तेचं कळत नाही. मुळात अतिशय पोकळ कथा असल्यामुळे या चित्रपटाकडून फार अपेक्षा न केलेल्याचं ब-या. भाईचे चित्रपट आवडणा-यांच्या तशाही फार अपेक्षा नसतातचं. भाईने दोन-चार टाळ्या घेणारे संवाद बोलावे, चार- पाच गुंडांना हवेत उडवावे, थोडी कॉमेडी करावी, एवढेच भाईच्या चाहत्यांसाठी पुरेसे आहे. दुदैवाने ही अपेक्षाही ‘रेस3’  पूर्ण करत नाही. कलाकारांचा अभिनय अगदी जेमतेम आहेत. संवादही अतिशय अवजड आहेत. 
खरे तर या चित्रपटाचे नाव ‘रेस3’नाही तर ‘हम साथ साथ है2’ ठेवले असते तरी चालले असते. कारण ‘रेस3 या नावाला शोभेसे यात फार काहीही नाही. याऊपरही भाईजानच्या प्रेमापोटी तुम्हाला हा चित्रपट पाहायचा असेल तर जरूर पाहावा. कारण ‘युवर बिझनेस इज युवर बिझनेस, नन आॅफ अवर बिझनेस...’ ईद मुबारक!!
Web Title: Race 3 Movie Review: नुसताचं पोकळपणा!!
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.