'Like to play a variety role' - Ali Fazal | ‘विविधांगी भूमिका साकारायला आवडते’ - अली फजल

अबोली कुलकर्णी 

‘खामोशियाँ’,‘फुकरे’,‘हॅप्पी भाग जायेगी’,‘बॉबी जासूस’, ‘फ्युरियस ७’ या हिंदी चित्रपटांमध्ये उत्कृष्ट भूमिका साकारणारा अभिनेता अली फजल ‘व्हिक्टोरिया अ‍ॅण्ड अब्दुल’ या आगामी चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने आणि एकंदरितच त्याच्या आत्तापर्यंतच्या करिअरविषयी मारलेल्या या गप्पा...

* आगामी चित्रपटातील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?
- हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे. १८व्या दशकातील ही कथा असून राणी व्हिक्टोरिया यांच्यासोबत अब्दुल करीम यांचे असलेले नाते यावर चित्रपटाच्या माध्यमातून प्रकाश टाकण्यात आला आहे. मी यात अब्दुल करीम यांची भूमिका साकारलेली आहे. राणी व्हिक्टोरिया आणि अब्दुल करीम यांच्यातील नाते हे शिक्षक-विद्यार्थी, मित्र-मैत्रिण यांच्याप्रमाणे  दाखवण्यात आले आहे.

* यापूर्वी तू हॉलिवूडमध्येही काम केले आहे. बॉलिवूड आणि हॉलिवूड चित्रपटांमध्ये काम करण्याच्या पद्धतींमध्ये तुला काय फरक जाणवतो?
-  फरक एवढाच वाटतो की, हॉलिवूड चित्रपटांमध्ये प्रगत तंत्रज्ञान दाखवण्यात येते. स्पेशल इफेक्ट्सचा भरणा जास्त असतो. बॉलिवूड-हॉलिवूड चित्रपटांमध्ये जवळपास १५-२० वर्षांचा फरक असतो. बॉलिवूड चित्रपटांमध्येही आता कन्टेंट चांगला येऊ लागला आहे. वेगवेगळया थीमवरील, आव्हानात्मक चित्रपट साकारण्याचा प्रयत्न सध्याचे दिग्दर्शक, निर्माता करत आहेत.

* ‘आॅस्कर विनिंग’ अभिनेत्री ज्यूडी डेंच यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता?
- अभिनेत्री ज्युडी डेंच यांच्यासोबत मी गेल्या तीन महिन्यांपासून शूटिंग करत आहे. माझ्यासाठीच काय चित्रपटाच्या संपूर्ण टीमला त्यांच्यासोबत काम करणं ही अभिमानाची गोष्ट होती. खूप काही शिकायला मिळालं. आमच्यात चांगली मैत्री देखील झाली. 

* एखाद्या भूमिकेसाठी तू कोणती तयारी करतोस?
- हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित असल्यामुळे आम्हाला बऱ्याच गोष्टींची तयारी करावी लागली. माझ्या भूमिकेसाठी मला ऊर्दू भाषेचे ज्ञान, लिखाण, कपडे, राहणीमान या सर्व गोष्टींचा अभ्यास करावा लागला. भूमिकेसाठी हे सर्व करताना मला खूप मजा आली. तसाही इतर भूमिकांच्यावेळी कठोर मेहनत ही करावीच लागते. 

* चित्रपटाची निवड करत असताना कोणत्या बाबींचा विचार करावा लागतो?
- एखादा चित्रपट यशस्वी होणं ही संपूर्ण टीमची जबाबदारी असते. एक अभिनेता म्हणून मला चित्रपटाची निवड करत असताना दिग्दर्शक आणि निर्माता हे दोघेही तितकेच महत्त्वाचे असतात. त्याचबरोबर मला चित्रपटाची स्क्रिप्ट देखील महत्त्वाची वाटते. त्यात माझा रोल किती महत्त्वाचा आहे, हे मी पाहतो. 

* भविष्यातील तुझे प्लॅन्स काय?
- माझा मोस्ट अवेटेड ‘फुकरे रिटर्न्स’ चित्रपट येतो आहे. डिसेंबरमध्ये हा चित्रपट रिलीज होणार असून चित्रपटातील एका गाण्याचे शूटींग आम्ही नुकतेच संपवले आहे. 

Web Title: 'Like to play a variety role' - Ali Fazal
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.