'Padmana' Akshay Kumar, thousands of people in crowded 'Akshay' | ​गर्दीतील हजारो ‘अक्षय’ पाहून गहिवरला ‘पॅडमॅन’ अक्षय कुमार!

अक्षय आला आणि त्याने जिंकले...असेच चित्र आज सोमवारी पुण्यात आयोजित लोकमत सखी मंचच्या सोहळ्यात दिसले. बॉलिवूडचा ‘खिलाडी’ येणार म्हणून, पुणेक-यांनी एकच गर्दी केली होती.
 पुण्यातील ईशान्य शॉपिंग मॉलजवळील, महाराष्ट्र हौसिंग बोर्ड येथे असलेल्या गेनबा सोपानराव मोझे प्रशाला येथे सखी मंचचा हा कार्यक्रम पार पडला. सखी मंचचा सोहळा असला तरी या कार्यक्रमात तरूणाईचीच संख्या अधिक होती. विद्यार्थी आणि महिलांनी परिसर नुसता फुलून गेला होता. अशातच अक्षयचे आगमन झाले आणि सगळ्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी सगळ्यांत लक्षवेधी ठरले असेल तर गर्दीत बसलेले तीन हजार ‘अक्षय’. होय, गर्दीतील सुमारे ३ हजार विद्यार्थी अक्षय कुमारच्या चेह-याचा मास्क लावून समोर बसले होते. समोर बसलेले हे असंख्य ‘अक्षय’ पाहून खुद्द अक्षयही गहिवरून गेला.
स्टेजवर अक्षयच्या हाती माईक गेला आणि नमस्ते...अशा शब्दाने त्याने सुरूवात केली आणि पुढच्या वाक्याला अक्षयने पुणेकरांना अक्षरश: जिंकले. होय, अक्षय कुमारने चक्क मराठीत सुरुवात केली. मला मराठी येते. पण फार थोडी येते...त्यामुळे मी हिंदीतूनच बोलणार...अशा वाक्यांनी अक्षयने बोलायला सुरुवात केली. त्याने मराठीत केलेली सुरूवात पाहून समोरून एकच जल्लोष झाला. यावेळी अक्षयने ‘पॅडमॅन’ या चित्रपटाचे प्रमोशन केले. मासिक पाळीच्या विषयावर तो प्रबोधनही करताना दिसला. महिलांची मासिक पाळी एक पवित्र गोष्ट आहे. त्यात विटाळ असे काहीही नाही, असे अक्षय यावेळी म्हणाला.
अक्षय कुमारचा ‘पॅडमॅन’ हा चित्रपट सामाजिक मुद्यावर आधारित चित्रपट आहे. ‘पद्मावत’मुळे या चित्रपटाची रिलीज डेट लांबणीवर पडणार, अशी आधी चर्चा होती. पण मेकर्सनी आपल्या आधीच ठरलेल्या तारखेत कुठलाही बदल न करण्याचा निर्धार केला. त्यामुळे आता बॉक्सआॅफिसवर ‘पद्मावत’विरूद्ध ‘पॅडमॅन’असा सामना रंगताना आपण पाहू शकणार आहोत.
Web Title: 'Padmana' Akshay Kumar, thousands of people in crowded 'Akshay'
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.