On this one condition Sandeep Singh gave permission to make biopic soorma | या एका अटीवर संदीप सिंह यांनी दिली ‘सूरमा’ बनवण्याची परवानगी
या एका अटीवर संदीप सिंह यांनी दिली ‘सूरमा’ बनवण्याची परवानगी

‘सूरमा’ हा चित्रपट उद्या शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. भारतीय हॉकी टीमचे माजी कर्णधार संदीप सिंह यांच्या आयुष्यावर बेतलेल्या या चित्रपटात दिलजीत दोसांज, तापसी पन्नू, अंगद बेदी मुख्य भूमिकेत आहेत. संदीप सिंह यांनी आपल्या आयुष्यात अनेक चढऊतार पाहिलेत.
हॉकीच्या मैदानावर चकाकणारा हा खेळाडू अचानक कोसळला आणि पुन्हा एकदा नव्या दमाने उभा राहिला. एका दुर्घटनेने त्याचे आयुष्य बदलले. पण त्यांनी हार मानली नाही. त्यांचा हा प्रवास ‘सूरमा’त उलगणार आहे. अलीकडे एका ताज्या मुलाखतीत संदीप सिंह यांनी ‘सूरमा’च्या पार्श्वभूमीवर एका गोष्टींचा खुलासा केला. हा खुलासा काय तर संदीप सिंह यांनी एका अटीवर आपल्या आयुष्यावर बायोपिक बनवण्याची परवानगी दिली होती.

 संदीप सिंह म्हणाले की, साद अलीला माझ्या आयुष्यावर चित्रपट बनवायचा होता. ते माझ्याकडे आलेत आणि मी त्यांना होकार दिला. पण एका अटीवर. होय, माझ्या बायोपिकमध्ये काहीही चुकीचे नसणार. सृजनात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली माझ्या कथेसोबत कुठलीही छेडखानी होणार नाही, याची हमी द्या. मगचं मी होकार देईल,असे मी त्यांना म्हटले. साद अलींनी मला तशी हमी दिली आणि मी या बायोपिकला परवानगी दिली.
संदीप यांना लहानपणी हॉकी खेळायची आवड नव्हती. संदीप यांना कपडे आणि बुट हवे होते. तुला हॉकी खेळावं लागेल, असे घरच्यांनी त्यांना म्हटले आणि येथून संदीप सिंह जिद्दीस पेटले़ 2003 मध्ये पहिल्यांदा संदीप यांना भारतीय टीममध्ये स्थान मिळाले. 2004 मध्ये ते इथेन्स आॅलेम्पिकमध्ये पोहोचले. संदीप हॉकीमध्ये नवनवीन उंची गाठत असतांनाच 22 आॅगस्ट 2006 रोजी त्यांना पोलिसांकडून चुकीने गोळी लागली आणि सर्व काही उध्वस्त झाले़ जर्मनीमध्ये होणा-या वर्ल्डकपच्या ट्रेनिंग टीममध्ये सहभागी होण्यासाठी संदीप हे कालका शताब्दी एक्सप्रेसमधून दिल्लीला जात असताना ही घटना घडली होती. या दुर्घटनेनंतर संदीप हे पॅरेलाइज झाले होते. तुम्ही आता कधीच हॉकी खेळू शकणार नाही, असे डॉक्टरांनी त्यांना सांगितले होते. पण संदीप सिंह पुन्हा जिद्दीने उभे राहिलेत.


Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.