Niya Sharma says, I do not care whoever criticizes my lipstick shade | ​निया शर्मा म्हणते, माझ्या लिपस्टिकच्या शेडवर टीका करणा-यांची मला पर्वा नाही

- रूपाली मुधोळकर

बोल्ड फॅशन स्टाईल आणि तितक्याच बोल्ड भूमिकांसाठी ओळखली जाणारी ‘टेलिव्हिजन सेन्सेशन’ निया शर्मा लवकरच सुपरहिट वेबसीरिज ‘ट्विस्टेड’च्या दुस-या सीझनमध्ये झळकणार आहे. या वेबसीरिजच्या पहिल्या सीझनमध्ये निया बिनधास्त अंदाजात दिसली होती. दुस-या सीझनमध्ये ती त्यापेक्षाही बोल्ड अन् बिनधास्त अंदाजात दिसणार आहे. या वेबसीरिजच्या पार्श्वभूमीवर नियाशी मारलेल्या गप्पांचा हा प्रश्नोत्तर रूपातील सारांश, खास आपल्यासाठी....

प्रश्न : निया,‘ट्विस्टेड’चे पहिले सीझन तू गाजवलेस. दुस-या सीझनमध्ये काय खास असणार आहे?
निया :  ‘ट्विस्टेड’चे दुसरे सीझन पहिल्या सीझनपेक्षा पूर्णपणे वेगळे असेल, हे उगाच मला सांगायचे नाही. पण हो, कथा आणि माझे सौंदर्य या अंगाने हे सीझन खास असणार आहे, हे मात्र मी नक्की म्हणेल. मी माझ्या लूकवर खूप काम केले आहे. या सीझनमध्ये मी माझ्या लूकबद्दल  नवे प्रयोग केले आहेत. ‘ट्विस्टेड’पहिल्यांदा केले, तेव्हा मला फार कळत नव्हते किंवा मी स्वत:बद्दल जरा साशंक होते. पण या सीझनमध्ये मी ती सर्व कसर भरून काढली आहे. माझ्या वाट्याला आलेली भूमिका अधिक जिवंत साकारण्याचा प्रयत्नही मी यात केला आहे.

प्रश्न : या सीझनमध्ये तू आणखी बोल्ड भूमिकेत दिसणार आहे.
निया : मीडिया ‘बोल्ड’ हा शब्द का वापरतो हे मला कळत नाही. विशेषत: माझ्याबदद्ल तरी मला हा शब्द मान्य नाही. याला ‘बोल्ड’ नाही तर ‘स्टाईल’ म्हणतात. यात मी जे काही पात्र साकारले आहे, तिच्याकडून तुम्ही साडी वा सूट घालण्याची अपेक्षा करू शकत नाही.  ‘ट्विस्टेड2’मध्ये मी माझ्या कपड्यांवर बरेच लक्ष दिले आहे, हे खरे आहे. लोक त्याला बोल्ड म्हणणार असतील तर ठीक आहे.

प्रश्न : विक्रम भट्ट यांच्यासोबत काम करण्याचा तुझा अनुभव कसा राहिला.
निया : विक्रम भट्ट सरांनी  ‘ट्विस्टेड’ वा  ‘ट्विस्टेड2’ दिग्दर्शित केलेल्या नाहीत. तर लिहिलेल्या आहेत. पण असे असूनही त्यांनी मला प्रचंड प्रोत्साहन दिले. निया तू हे करू शकतेस, अशा शब्दांत त्यांनी माझ्यातील आत्मविश्वास उंचावला. खास मला डोळ्यापुढे ठेवून त्यांनी माझ्यासाठी भूमिका लिहिली. भविष्यात मला खूप प्रोजेक्ट मिळतील. पण खास माझ्यासाठी भूमिका लिहिली जाणे, हे मी माझे नशीब मानते. यासाठी मी त्यांचे आभारी आहे.

प्रश्ल :  ‘ट्विस्टेड2’नंतर तू विक्रम भट्ट यांच्या चित्रपटात दिसणार असल्याचीही चर्चा आहे?
निया : त्यांनी अद्याप मला तरी याबद्दल काहीही सांगितलेले नाही. अशा बातम्या कुठून येतात, तेच मला कळत नाही.

प्रश्न : ‘मोस्ट सेक्सिएस्ट एशियन वूमन’च्या यादीत दीपिका पादुकोणसारख्या अभिनेत्रीला पछाडून तू दुसरा क्रमांक मिळवलास. यानंतर काही जबाबदारी वाढल्याची जाणीव होते?
निया : हा किताब मिळवल्याचा आनंद आहेच. पण त्यामुळे माझ्यावर कुठलाही दबाव नाही. यानंतर मी अधिकाधिक सेक्सी दिसावे किंवा त्यासाठी मी खास प्रयत्न करावेत, असे काहीही घडलेले नाही वा घडणार नाही. कारण मी सेक्सी आहे, हे मुळातच मला माहित आहे.

प्रश्न : तुला बोल्ड, ब्युटिफुल, स्टाईलिश अशी कितीतरी विशेषणं लावण्यात येतात. पण तू स्वत:कडे कशी बघतेस?
निया : मी खºया आयुष्यात अतिशय विनोदी आहे. पण अजिबात सुंदर नाही. मी अतिशय मामुली दिसते. मला सुंदर दिसण्यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागते. स्वत:ला त्यासाठी तयार करावे लागते. पण मी जे काही करतेय त्यात आनंदी आहे. सर्वसामान्य पण आनंदी मुलगी म्हणून मी स्वत:कडे बघते.

प्रश्न : तुझ्या लिपस्टिकचा शेड, तुझे बोल्ड फोटो यावरून तू नेहमी ट्रोल केली जातेस. या टीकेकडे कशी बघतेस?
निया : ट्रोलर्स माझे कुणी नातेवाईक नाहीत. त्यामुळे सगळ्यांना स्पष्टीकरण अन् खुलासे देण्यास मी बांधिल नाही. लोक काय लिहितात, यावर माझे काहीही बंधन नाही. त्यामुळे मला त्याने फरक पडत नाही. मला पर्पल लिपस्टिक आवडते. मी इंटरनॅशन ब्रॅण्डचे लिपस्टिक मागवते. तो माझ्या आवडीचा भाग आहे आणि मला जे आवडते ते मी करणारच.

प्रश्न : निया टीव्हीवरून तुझा प्रवास झाला. आता तू वेबसीरिज करतेय. कदाचित यानंतर बॉलिवूड चित्रपट. या संपूर्ण प्रवासात कुठली एक गोष्ट सतत तुझ्यासोबत होती किंवा राहील?
निया : माझ्यातील आत्मविश्वास. मी माझे निर्णय स्वत: घेतले. माझ्या अटींवर मी जगले. यातून कमावलेला आत्मविश्वास माझ्यासोबत होता आणि असेल.

प्रश्न : भविष्यातील प्रोजेक्टबद्दल काय सांगशील?
निया : सध्या तरी काहीही नाही. मी मुळात दुस-या दिवसाचा विचार करत नाही, तिथे भविष्याचा विचार ही फार दूरची गोष्ट झाली. मी फक्त काम करत राहणार आणि निष्ठेने करणार, इतकेच.


ALSO READ : OMG! ​दीपिका पादुकोणवर भारी पडली निया शर्मा!!Web Title: Niya Sharma says, I do not care whoever criticizes my lipstick shade
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.